त्या अधिकार्‍यांनी ‘माणुसकी’ ठेवली गहाण

खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्याच्या कुटुंबाची विचारपूसही नाही?

कल्याण-मुरबाड महामार्गावर म्हारळपाडा ते पाचवा मैल पर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावशेपाडा येथील शेतकरी नारायण महादू भोईर यांचा खड्ड्यात पडून नुकताच मृत्यू झालाचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. परंतु गेल्या पंधरावीस दिवसापासून त्यांच्या कुंटूबियाची साधी विचारपूस किंवा चौकशी देखील या नॅशनल हायवे अ‍ॅथोरीटीच्या अधिकार्‍यांनी केली नसल्यामुळे त्यांच्या मध्ये कमालीचा संताप निर्माण झाला आहे. या रस्त्याच्या जबाबदार अधिकार्‍यांना निंलबित करून त्यांच्यार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृतांचे नातेवाईक माझी पोलीस पाटील संजय जनार्दन भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

कल्याण-मुरबाड महामार्गवर म्हारळपाडा, वरप कांबा आणि पाचवा मैल परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. कांबा पावशेपाडा येथील शेतकरी नारायण महादू भोईर हे दूध देऊन उल्हासनगरहून घरी येत असताना, म्हारळपाडा येथील खड्ड्यात पडले. प्रथम त्यांना केडिएमसीच्या रुक्मिणी बाई रुग्णालयात आणि नंतर खडकपाडा येथील वेंदात हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दुग्ध व्यवसाय करुनच ते पत्नी आणि दोन मुलांचा सांभाळ करत होते. परंतु आता घराचा कर्ता व्यक्ती गेल्यामुळे भोईर कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

यातून कसेबसे राख भरणी, दहावे, उत्तर कार्य आदी विधी पार पाडले. परंतु आतापर्यंत पंधरा ते वीस दिवसानंतर देखील या कुंटूबियाची साधी चौकशी किंवा विचारपुसही या अधिकार्‍यांकडून झाली नाही. नारायण भोईर यांचे पुतणे माझी पोलीस पाटील संजय जनार्दन भोईर, यांनी वारंवार या रस्त्याचे काम पाहणार्‍या अधिकार्‍यांशी वारंवार संपर्क केला, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. असे भोईर यांनी सांगितले. यानंतर या भागाचे आमदार कुमार आयलानी यांनी देखील या अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे केली. परंतु कार्यवाही झाली नाही. माणुसकी गहाण टाकलेल्या या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे असे पत्र माझी पोलीस पाटील संजय भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. तसेच भोईर कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास भविष्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मृत्यू खड्ड्यांमुळे नाही, हा अपघात
या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे संबंधित ठेकेदाराने सांगितले. तर या संदर्भात नॅशनल हायवे अ‍ॅथोरटी, ठाणेच्या कार्यकारी अभियंता तृप्ती नाग यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, हा मृत्यू खड्यामुळे झाला नसून तो अपघात आहे. तसे पुरावे आमच्याकडे आहेत.