वर्षा नागरे, मावळी मंडळाला मनोहर विचारे प्रतिष्ठानचा पुरस्कार

Sports
प्रातिनिधिक फोटो
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची सामनाधिकारी ठाणेकर  वर्षा नागरे आणि ठाण्यातील जुनी संस्था श्री मावळी मंडळ यांना मनोहर विचारे प्रतिष्ठानचा मराठी गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या रविवारी, १९ मार्चला मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात हे दोन्ही पुरस्कार देण्यात येईल. याच कार्यक्रमात ५० वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पहिला भारत केसरी किताब मिळवून देणारे जेष्ठ शरीरसौष्ठवपटू, राष्ट्रीय कबड्डीपटू अभिनेते विजू पेणकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय विचारे यांनी सांगितले.
महिला क्रिकेटपटू वर्षा नागरे हिची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सामनाधिकारी (मॅच रेफरी)  म्हणून गतवर्षी निवड केली. तर श्री मावळी मंडळ गेली आठ हून जास्त दशके ठाणे जिल्ह्यातील कबड्डीचा दादा संघ म्हणून ओळखला जातो. त्यांच्या तर्फे आयोजित होणारी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आदर्श स्पर्धा म्हणून ओळखली जाते. जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी विजू पेणकर यांनी क्रीडा, कला, राजकारण अशी विविध क्षेत्रात मुशाफिरी करताना माझगाव विभागात मराठी शाळेला नावारूपाला आणले आहे.
इतर पुरस्कार विजेत्यांमध्ये  विश्वविजेता मल्लखांबपटू दिपक शिंदे, विश्वविजेता शरीरसौष्ठवपटू सागर कातुर्डे, जेष्ठ खो-खो क्रीडा संघटक मनोहर साळवी, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मिलिंद पूर्णपात्रे, जेष्ठ कबड्डीपटू-प्रशिक्षक शशिकांत कोरगांवकर, लीला कोरगांवकर, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर मनाली साळवी, जेष्ठ छायाचित्रकार मोहन बने, सह्याद्री-दूरदर्शन वाहिनीचे राजेश दळवी आदींचा समावेश आहे. पांडुरंग चाटे (आय.आर.एस.), प्रादेशिक निर्देशक, भारतीय खेल प्राधिकरण, डॉ. नरेंद्र कुंदर, भारतीय खो-खो संघाचे प्रशिक्षक, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आणि बुजुर्ग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त रघुनंदन गोखले यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. बाळकृष्ण तुकाराम साळवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल, श्रीफळ, भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.