घरठाणेकल्याणमध्ये पत्नी आणि मुलाची तोंडावर उशी दाबून हत्या

कल्याणमध्ये पत्नी आणि मुलाची तोंडावर उशी दाबून हत्या

Subscribe

हत्या करून व्यावसायिक पती फरार

कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील एका सोसायटीत कुटुंबासह राहत असलेल्या पतीने आपल्या पत्नीची आणि लहान बालकाची तोंडावर उशी दाबून हत्या केली आहे. या घटनेनंतर पती फरार झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा प्रकार उघडकीला आला. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. अश्विनी गायकवाड (२७), आदिराज गायकवाड (७) अशी हत्या केलेल्या आई, मुलांची नावे आहेत. दीपक गायकवाड असे फरार पतीचे नाव आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. आर्थिक विवंचनेतून किंवा घरगुती वादातून हा प्रकार घडला असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, दीपक गायकवाड हे पत्नी अश्विनी गायकवाड, मुलगा आदिराज यांच्यासह कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील ओम दीपालय सोसायटीत राहत होता. शुक्रवारी संध्याकाळी त्याने घरगुती वादातून किंवा आर्थिक विवंचनेतून पत्नी, मुलाच्या तोंडावर पाठोपाठ उशी ठेऊन श्वास कोंडून ठार मारले. पत्नी, मुलाला मारल्यानंतर दीपकने स्वताहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी झाला. त्यानंतर तो घराला कुलूप लावून पळून गेला.

दीपक गेल्या सहा वर्षापासून एक वित्तीय कंपनी चालवितो. पती, मुलाला मारल्यानंतर दीपकने आपल्या कार्यालयातील आकाश सुरवाडे या कर्मचाऱ्याला दुपारी दीड वाजता संपर्क करून आपण पत्नी, मुलाला मारले असल्याचे सांगितले. तू घरी जाऊन ये. मी पण आता आत्महत्या करत आहे, असा निरोप दिला. आकाश तातडीने दीपक यांच्या घरी पोहचला. तेथे दरवाजाला कुलूप होते. त्याने तात्काळ दीपक, अश्विनी यांच्या नातेवाईकांना संपर्क केला. त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कुटुंबीयांनी घरात प्रवेश केला. तेव्हा अश्विनी, आदिराज यांचे मृतदेह बिछान्यावर, जमिनीवर पडले होते. पोलिसांना तातडीने ही माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली. दीपकने आपण आत्महत्या करत असल्याचा निरोप दिल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचा मोबाईल बंद येत आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याची पथके त्याचा शोध घेत आहेत. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दीपकने पत्नी, मुलाची हत्या केल्याचे सांगितले. आर्थिक विवंचनेतून त्याने हा प्रकार केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला. मिळालेली माहिती अशी की, आरोपी दीपक हा नानूज वर्ल्ड हे खेळण्याचे दुकान चालवित होता. त्याच बरोबर तो एक खासगी वित्तीय कंपनी चालवित होता. शेअर बाजारात त्यांची गुंतवणूक होती. त्यामुळे आलेल्या आर्थिक विवंचनेतून त्याने हा प्रकार केला असावा असा प्राथमिक अंदाज देखील वर्तविला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -