डॉन बॉस्को, सेंट तेरेसाला जेतेपद

मुंबई शाळा क्रीडा संघटना आंतरशालेय हॉकी

Hockey interschool

माटुंग्याच्या डॉन बॉस्को शाळेच्या मुलांच्या संघाने बांद्र्याच्या सेंट स्टॅनिस्लासचा पराभव करत मुंबई शाळा क्रीडा संघटना आंतरशालेय हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. मुलींच्या अंतिम सामन्यात सेंट तेरेसाने कारमेल ऑफ जोसेफला पराभूत केले.

मुलांच्या अंतिम सामन्यात डॉन बॉस्कोने सेंट स्टॅनिस्लासचा २-१ असा पराभव केला. या सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी चांगला खेळ केला, पण डॉन बॉस्कोने पहिला गोल करत सामन्यात आघाडी मिळवली. डॉन बॉस्कोनेच आपला आक्रमक खेळ सुरू ठेवत दुसराही गोल केला. यानंतर सेंट स्टॅनिस्लासच्या संघाने १ गोल करत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतर त्यांना गोल करता आला नाही आणि त्यांनी सामना गमावला. मुलींच्या अंतिम सामन्यात सेंट तेरेसाने कारमेल ऑफ जोसेफला २-० असे पराभूत केले.

विजेत्या संघांना भारताचे महान हॉकीपटू धनराज पिल्ले तसेच ऑलिम्पिकमध्ये खेळलेले हॉकीपटू एमएम सोमैया, मार्सेलस गोमेझ, मर्विन फर्नांडिस यांच्या हस्ते चषक आणि पदके देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा भरवण्यात मुंबई शाळा क्रीडा संघटनेचे हॉकी सचिव लॉरेंस बिंग यांनी मोलाचे योगदान केले.