घरUncategorizedविधानपरिषदेच्या ४ जागांसाठी मतदान; पैसे वाटल्याचा आरोप

विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी मतदान; पैसे वाटल्याचा आरोप

Subscribe

विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी आज निवडणूक होणार असून मुंबई आणि कोकणातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान नाशिकमध्ये शिवसेनेने पैसे वाटल्याचा आरोप भाजपने केला आहे.

विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी आज मतदान होणार आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदरसंघातील या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. मुंबई आणि कोकण मतदार संघात शिवसेना आणि भाजप हे दोन्ही मित्रपक्ष विरोधात उभे राहिले असून परस्परांविरोधात दोन्ही मित्र पक्षांनी कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत विजय प्राप्त करायचा अशी खुणगाठ मनाशी बांधत शिवसेना – भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नाशिकमध्ये निवडणुक प्रचारादरम्यान मतदारांना खुश करण्यासाठी पैसे आणि पैठणी वाटल्याचा आरोप शिक्षकांनीच केला आहे. तर मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे कोकणातील मतदानाबद्दल उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुंबई, कोकण आणि नाशिकमध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवसेना – भाजपसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघामधील लढत ही लक्षणीय आहे. सद्यस्थितीमध्ये मुंबईची जागा शिवसेनेकडे आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेनेला चारी मुंड्या चीत करण्यासाठी भाजपने आता कंबर कसली आहे. मुंबईतून शिवसेनेचे विलास पोतनीस विरूद्ध भाजपचे अमित मेहता अशी लक्षणीय आणि प्रतिष्ठेची लढत आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेने डॉ. दीपक सावंत यांना उमेदवारी नाकारत विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. तर, कोकण मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे विरूद्ध शिवसेनेचे संजय मोरे अशी लढत आहे. निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. परिणामी, डावखरे यांच्या पराभवासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील कंबर कसली आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही तिरंगी होणार नक्की! मात्र, कोकण मतदारसंघामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये समझोता झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. कोकण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये पैसे वाटल्याचा आरोप

नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेने मतदारांना येवला पैठण्या आणि पैसे वाटल्याचा आरोप भाजपने केला आहे. नाशिकमधून शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, भाजपचे अनिकेत पाटील, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार संदीप बेडसे यांच्यासह १६ जण नशीब आजमावत आहेत.

शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना आज सुट्टी

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षण विभागाकडून विशेष सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यासाठी ही सुट्टी असेल.

- Advertisement -

कशा आहेत लढती

कोकण पदवीधर मतदारसंघ

निरंजन डावखरे ( भाजप ) विरूद्ध संजय मोरे ( शिवसेना ) विरूद्ध नजिब मुल्ला ( राष्ट्रवादी काँग्रेस )

मुंबई पदवीधर मतदारसंघ उमेदवार

विलास पोतनीस ( शिवसेना ) विरूद्ध अमित मेहता ( भाजप ) विरूद्ध राजेंद्र कोरडे ( शेकाप ) विरूद्ध राजू बंडगर ( नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष पुरस्कृत ) विरूद्ध जालिंदर सरोदे ( शिक्षक भारती ) विरूद्ध दीपक पवार ( अपक्ष )

मुंबई शिक्षक मतदारसंघ उमेदवार

कपिल पाटील ( शिक्षक भारती ) विरूद्ध अनिल देशमुख ( भाजप ) विरूद्ध शिवाजी शेंडगे ( शिवसेना )

नाशिक शिक्षक मतदारसंघ

संदीप बेडसे ( महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी ) विरूद्ध किशोर दराडे ( शिवसेना ) विरूद्ध अनिकेत पाटील ( भाजप )

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे विद्यामन आमदार
1) मुंबई पदवीधर मतदारसंघ : डॉ. दीपक सावंत
2) कोकण पदवीधर मतदारसंघ : निरंजन डावखरे
३) मुंबई शिक्षक मतदारसंघ : कपिल पाटील
४) नाशिक शिक्षक मतदारसंघ : डॉ. अपूर्व हिरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -