घरमहाराष्ट्रअलिबागमध्ये युती-आघाडीत धूसफूस

अलिबागमध्ये युती-आघाडीत धूसफूस

Subscribe

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी अलिबाग-मुरुड मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांत इच्छुक उमेदवारांच्या नावांची भाऊगर्दी झालेली पहावयास मिळत असून, उमेदारीवरून महायुती व महाआघाडीतही धूसफूस सुरू असल्याचे दिसत आहे.

अलिबाग मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2004 च्या निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयाचा अपवाद वगळता शेकापचेच वर्चस्व राहिलेले आहे. मात्र 2009 च्या तुलनेत 2014 मध्ये पक्षाची घटलेली मते लक्षणीय असून, विरोधकांची वाढलेली ताकद दखल घेण्याजोगी निर्माण झालेली आहे. गेल्या निवडणुकीत मतदारसंघात सेनेला शेकापकडून १६ हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव पत्करावा लागला. मात्र अलिकडच्या काळात या मतदारसंघात सेना व भाजपकडे अन्य पक्षांतून मोठे इनकमिंग झाल्यामुळे 2019 साठी सेनेचा हक्क असला तरी भाजपनेही या जागेवर दावा ठोकला आहे. तसेच महाआघाडीत शेकाप व काँग्रेस एकत्र असले तरी काँग्रेसकडूनही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. परिणामी काहीसे गोंधळाची परिस्थिती येथे पहावयास मिळते.

- Advertisement -

शेकापकडून सुभाष ऊर्फ पंडित पाटील यांचे नाव जवळ-जवळ नक्की आहे, तर काँग्रेसकडून राजेंद्र ठाकूर इच्छुक आहेत. मागच्या निवडणुकीत पराभव झालेले महेंद्र दळवी हेच सेनेचे पुन्हा उमेदवार असणार यात शंका नसली तरी भाजपने यात खोडा घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. पक्षाचे या मतदारसंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी पद्धतशीरपणे कामाला सुरूवात करून आपणच युतीचे उमेदवार असणार असे वातावरण तयार केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महेश कुनुमल, तर समाजवादी पक्षाकडून अश्रफ घट्टे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

गेली निवडणूक प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढवली होती. पंडित पाटील यांनी दळवी यांचा पराभव केला तेव्हा माजी आमदार व काँग्रेस उमेदवार मधुकर ठाकूर 45 हजार 853 मते मिळवून तिसर्‍या स्थानावर होते. भाजपचे प्रकाश काठे यांना अवघी 6 हजार 54, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. महेश मोहिते यांना 3500 मते मिळाली होती. आघाडीच्या मतांची गोळाबेरीज केली तर ती युतीच्या मतांपेक्षा मोठी आहे. मधल्या काळात सेना-भाजपची ताकद वाढली असली तरी शेकाप व काँग्रेसचा पारंपरिक मतदार या मतदारसंघात असल्याचे नाकारता येणार नाही. त्यामुळे आघाडी होऊ नये यासाठी युतीचे वरिष्ठ नेते देव पाण्यात बुडवून बसले असल्यास नवल नाही.

- Advertisement -

पाणी प्रश्न, तसेच रस्त्यांची दुरवस्था, बेरोजगारी या मुद्यांवरून विद्यमान आमदार पंडित पाटील यांच्याबद्दल नाराजीची भावना अनेकजण बोलून दाखवतात. परंतु, याचा आमच्या पारंपारिक मतांवर काहीच परिणाम होणार नसल्याचे शेकापचे नेते छातीठोकपणे सांगत आहेत. भाजपने या मतदारसंघात वेगवेगळे विकास निधी आणून जनतेची सहानभूती मिळविण्याचा अतिशय पद्धतशीरपणे प्रयत्न चालवला असून, त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेली मते दुर्लक्षण्यासारखी नाहीत. इच्छुकांच्या भाऊगर्दीतून महाआघाडी व युतीचे उमेदवार कोण असणार, इथपासून आघाडी व युती झाली नाही तर कोण उमेदवार रिंगणात उतरतील याची मतदारांना कमलीची उत्सुकता आहे. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार्‍यांसह अन्य युवा मतदारांचा कौलही येथे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

2014 ची निवडणूक आकडेवारी

सुभाष ऊर्फ पंडित पाटील (शेकाप) 76959
महेंद्र दळवी (शिवसेना) 60865
मधुकर ठाकूर(काँग्रेस)45853

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -