घरताज्या घडामोडीकाँग्रेस नेत्यांमध्ये धुसफूस

काँग्रेस नेत्यांमध्ये धुसफूस

Subscribe

एकनाथ गायकवाडांविरोधात चंद्रकांत हंडोरेंची दिल्लीत तक्रार

माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. यासाठी त्यांनी थेट दिल्ली गाठत महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांची भेट घेतली. काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष कार्यकर्त्यांसोबत भेदभाव करतात. विधानसभा निवडणुकीत त्यांना माझ्याविरोधात उमेदवार उतरवून माझा पराभव केला. त्यामुळे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नव्या व्यक्तीची नेमणूक करावी, अशी मागणी चंद्रकांत हंडोरे यांनी केली आहे.

मी सध्या काँग्रेस पक्ष सोडणार नाही. महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांच्यासमोर मी स्वत:ची बाजू मांडली आहे. त्यांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना 15 दिवसांत दलित नेत्यांची बैठक घेऊन राज्यातील दलित नेत्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिल्याची माहितीही यावेळी चंद्रकांत हंडोरे यांनी दिली. त्यामुळे आता मुंबई काँग्रेसमध्ये काही बदल होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून मुंबई काँग्रेसच्या पाठीशी वादांचे शुक्लकाष्ठ लागले आहे. गेल्यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय निरुपम आणि मिलिंद देवरा गटातील वादामुळे मुंबईतील संघटना खिळखिळी झाली होती. उर्मिला मातोंडकर यांनीही याच अंतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेसला रामराम ठोकला होता. मात्र, त्यानंतरही मुंबई काँग्रेसमधील परिस्थिती फारशी सुधारलेली नाही.

बिहार विधानसभा निवडणूक आणि देशभरातील पोटनिवडणुकांमधील पक्षाच्या निराशाजनक कामगिरीनंतर राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी नुकतीच उघड झाली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा पक्षनेतृत्वाच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हा वाद कमी होतो की काय म्हणून आता मुंबई काँग्रेसमध्येही पुन्हा धुसफूस सुरू झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -