बिस्कीटाचे पुडे देऊन आजीबाईंच्या अंगावरचे सोन्याचे दागिने लुटले!

thief- Robbery

७२ वर्षीय आजीबाईचा मोफत शिधावाटप देण्याच्या आमिष दाखवून तीन पार्लेजी बिस्कीटचे पुडे देऊन आजीबाईच्या अंगावरील लाखभर रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याचा प्रकार उल्हासनगर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर १ येथे राहणाऱ्या ७२ वर्षीय आजीबाई गुरुवारी दुपारी दत्तवाडी येथील पोस्ट कार्यालयात जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. दरम्यान वाटेत त्यांना एक अनोळखी इसम भेटला आणि त्याने ‘‘आजी तुम्हाला राशन पाहिजे का?’ असे विचारले असता आजीबाईच्या होकार दिला आणि तो इसम आजीबाईचा दत्तवाडी येथील एका इमारतीजवळ घेऊन गेला, त्या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या इसमाने आजीबाई तुमच्या अंगावरचे सोन्याचे दागिने काढून ठेवा नाहीतर तुम्हाला मोफत रेशन मिळणार नाही असे सांगून एकाने आजीबाईच्या अंगावरील दागिने काढून एका पिवळ्या रंगाच्या पिशवी पिशवी आजीबाईच्या हातात दिली. आजीबाईच्या ती पिशवी दुसऱ्या पिशवीत ठेवली, दरम्यान हे दोघे अनोळखी इसम राशन आणतो म्हणून निघून गेले.

बराच वेळा झाला हे दोघे रेशन घेऊन आले नाही म्हणून आजीने दागिन्यांची पिशवी बाहेर काढून ती उघडून बघितली असता त्यात दागिन्यांऐवजी तीन पार्लेजी बिस्कीटचे पुडे आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच आजीबाईने उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहती पोलिसांनी दिली.


हे ही वाचा – रियाला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक, सीबीआयने लावला ‘हा’ आरोप!