तिने प्रायव्हेट फोटो कॉमन मैत्रिणीला शेअर केले पण, ब्लॅकमेलिंग सोबतच कोट्यावधी रूपये खात्यातून जात राहिले

प्रायव्हेट फोटो कॉमन मैत्रिणीला शेअर करणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे.

बऱ्याचदा कॉमन मैत्री खूपच फायद्याची ठरते, असे म्हटले जाते. तर कधीकधी हीच कॉमन मैत्री महागात देखील पडू शकते. अशीच एक घटना समोर आली आहे. बंगळुरु येथे एका कॉमन मैत्रिणीने ब्लॅकमेल करत एका तरुणीला कोट्यावधीचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका २८ वर्षीय अनुश्री महिलेला बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे.

नेमके काय घडले?

बंगळुरु येथे आरोपी महिला अनुश्री विवाहित असून ती पती आणि मुलासोबत कालकेरे येथे राहते. तर महेशची एक्स गर्लफ्रेंड कोलार येथे राहायची. महेश आणि त्याच्या प्रेयसीचे कॉलेजमध्ये असताना प्रेमसंबंध होते. मात्र, कालांतरांनी दोघांचे नाते तुटले आणि महेशच्या गर्लफ्रेंडचा बंगळुरुमधल्या एका उद्योजकासोबत ११ वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना एक मुलगाही आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार; मधल्या काळात महेश आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड परस्परांच्या संपर्कात नव्हते. पण, जुलै २०१९ मध्ये महेशने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोबाईल नंबर मिळवला आणि तिला मेसेज पाठवला. दोघांचे whatsappवर चॅटिंग सुरु झाले. त्यानंतर अनुश्रीने महेशच्या एक्स गर्लफ्रेंडला मेसेज पाठवला. मी आता महेशची गर्लफ्रेंड आहे, असे सांगून तिने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिघांचे whatsappवर बोलणे सुरु झाले.

त्यानंतर काही दिवसांनी अनुश्रीने महेशच्या एक्स गर्लफ्रेंडला तिचे फोटो पाठवायला सांगितले. महेशच्या एक्स गर्लफ्रेंडने देखील विश्वास ठेवून अनुश्रीला फोटो पाठवले. त्यानंतर अनुश्रीने एकदिवस महेशच्या एक्स गर्लफ्रेंडला मेसेज केला. कॉलेजच्या दिवसातले तुमचे पर्सनल काही फोटोज आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत, असे सांगितले. तसेच अनुश्रीने पुरावा म्हणून मॉर्फ केलेले फोटो सुद्धा महेशच्या गर्लफ्रेंडला पाठवले आणि पैशांची मागणी पूर्ण केली नाही, तर ते फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची अनुश्रीने धमकी दिली. आपला संसार मोडेल म्हणून घाबरलेल्या महेशच्या एक्स गर्लफ्रेंडने अनुश्रीच्या मागणीनुसार पैसे पाठवायला सुरुवात केली. मागच्या दीड वर्षात तिने तब्बल १.३ कोटी रुपये अनुश्रीला पाठवले.

त्यानंतर पुन्हा एकदा अनुश्रीने १५ लाखाची मागणी केली. पण, तोपर्यंत महेशच्या एक्स गर्लफ्रेंडचे अकाऊंट रिकामे झाले होते. याबाबत महेशच्या एक्स गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला एक बाब लक्षात आली. सातत्याने मोठमोठी रक्कम एकाच खात्यातून एका खातेदाराला जात असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत पत्नीला जाब विचारला असता आपल्याला ब्लॅकमेल केले जात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पतीच्या सल्ल्यावरुन तिने पोलिसात अनुश्रीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.


हेही वाचा – लग्नाआधीच झाला मोठा राडा, व्हिडिओ कॉलवरच घेतला गळफास