घरदेश-विदेशकेरळमध्ये पावसाचे २० बळी

केरळमध्ये पावसाचे २० बळी

Subscribe

केरळमध्ये मुसळधार पावसाने २० बळी घेतले आहेत. तर अनेक जण बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे विमानसेवेवर देखील त्याचा परिणाम झाला अाहे.

मुसळधार पावसाने केरळमध्ये २० जणांचा बळी घेतला आहे. राज्यभरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी लोक बेपत्ता झाल्याचे प्रकार देखील आता समोर येत आहेत. पावसाचा जोर वाढल्याने कोची विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमान सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे . कोची विमानतळावरून होणारी काही उड्डाणे इतरत्र वळवण्यात आली आहेत. रन वेवर पाणीच पाणी असे चित्र सध्या कोची विमानतळावर पाहायला मिळत आहे. इडुक्की धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात आल्याने परिसरामध्ये पाणीच पाणी असे चित्र आहे. पेरियार नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील पुरस्थिती पाहता प्रशासनाला देखील सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. एनडीआरएफची टीम देखील पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

वाचा – केरळमध्ये पावसाने घेतला ४३ जणांचा बळी

अनेक जण बेपत्ता

इडुक्की जिल्ह्यामध्ये ११ जण बेपत्ता झाले आहेत. मल्लापूरमध्ये ६, कोझीकोडेमध्ये २ आणि वयांदमध्ये १ जण बेपत्ता झाला आहे. तर, राज्यातील इतर भागांमध्ये देखील अनेक जण बेपत्ता झाले आहेत. एर्नाकुलम जिल्ह्यातील दोन गावांमध्ये रिलीफ कॅम्प उघडले गेले आहेत. इडुक्की धरणातून सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इडुक्की जिल्ह्यातील आदीमाली गावामध्ये एकाच कुटुंबातील ५ जण ढिगाऱ्याखाली गाढले गेले. तर दोन जणांना वाचवण्यात आले आहे. पूरस्थिती पाहता एनडीआरएफची टीम कोझीकोडेकडे दाखल झाली आहे. दरम्यान, राज्य सरकारने लष्कर आणि नौदलाकडे देखील मदतीचा हात मागितला आहे. इडुक्की धरणाचे दरवाजे जवळपास २६ वर्षांनी उघडण्यात आले आहेत.

- Advertisement -

शाळा कॉलेज बंद

मुसळधार पावसामुळे राज्यातील शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या तीन एनडीआरएफच्या टीम्स या युद्धपातळीवर काम करत असून आणखी दोन टीम्स केरळमध्ये दाखल होतील. नौदलाकडून देखील लोकांना वाचवण्याचे काम सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -