उत्तराखंड: वीजेच्या तारेत अडकून मदतीसाठी गेलेले हेलिकॉप्टर कोसळले; ३ ठार

मदतीची सामग्री घेऊन जात असताना एका वीजेच्या तारेत अडकून हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त

Uttarakhand

उत्तराखंडमध्ये बुधवारी एक हेलिकॉप्टरचा अपघात झाला. उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झालेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या मदतकार्य आणि सहाय्य करण्यासाठी हे हेलिकॉप्टर आले होते. उत्तरकाशीमध्ये ओढवलेल्या अपत्तीनंतर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेले एक हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. मदतीची सामग्री घेऊन जात असताना एका वीजेच्या तारेत अडकून हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. या घटनेची माहिती मिळताच शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये संततधार पाऊस कोसळत आहे. टेहरी आणि गढवालसारख्या भागातील टेहरी धान तलावाच्या पाण्याचा स्तर ८१३. ६५ मीटर पर्यंत पोहोचला आहे.

अशी घडली घटना

उत्तराखंड या ठिकाणी असणाऱ्या उत्तरकाशी या भागातील मोरी तालुक्यात मदतकार्य सुरू होते. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तीन हेलिकॉप्टर कार्य करत होते. यावेळी हेलिकॉप्टर सहाय्याने पिण्याचे पाणी आणि खाण्याचे पदार्थ पूरग्रस्तांना पोहचविण्याचे काम सुरू होते. मंगळवारपासून ही तीन हेलिकॉप्टर सेवेत रुजू झाली होती.

बुधवारी सकाळी हे तीन हेलिकॉप्टर मदतकार्यासाठी देहराडूनहून उत्तरकाशीमधील मोरी येथे मदत घेऊन जाण्यासाठी उड्डाण केले होते. या उड्डाणादरम्यान मोरीहून मोलदीला जात असताना हे हेलिकॉप्टर एका वीजेच्या तारेला धडकल्याने त्यातच अडकले. त्यानंतर ते खाली कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण ३ जण होते. त्या तिघांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.