८ वर्षांच्या चिमुरडीने संयुक्त राष्ट्र सदस्यांना सुनावलं!

ग्रेटा थनबर्गनंतर आता आणखीन एका चिमुरडीने संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित सदस्यांना बालहक्कांवरून सुनावलं आहे.

New York
Unisef Child Convention

अवघ्या काही दिवसांपूर्वीच ग्रेटा थनबर्ग या १६ वर्षांच्या मुलीने संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलासंदर्भातल्या परिषदेमध्ये जगातल्या दिग्गज नेत्यांना वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगवरून सुनावलं होतं. आता संयुक्त राष्ट्रांच्या बालहक्कासंदर्भातल्या परिषदेमधला असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये एका ८ वर्षांच्या मुलीने जगातल्या देशांच्या प्रमुखांना बालहक्कांवरून एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. अप्रत्यक्षपणे या मुलीने संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांचे कानच टोचले आहेत. अमाया पिजा मासाकीसा असं या मुलीचं नाव असून ती इक्वॅडोर देशातली नागरिक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बालहक्कांसदर्भातल्या सर्वसाधारण सभेमध्ये तिला बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी तिने सर्व सदस्यांना उद्देशून आपलं म्हणणं मांडलं.

८ वर्षांची अमाया म्हणते…

इथे तुमच्यासमोर बोलण्याची संधी मिळाल्यामुळे मला फारच आनंद झाला आहे. इथे विविध देशांचे नेते उपस्थित आहेत. आम्हा मुलांच्या वतीने मला तुम्हाला या प्रसंगी आठवण करून द्यावीशी वाटते की बालहक्क करारामध्ये नमूद केलेल्या मूलभूत हक्कांचं स्मरण ठेवणं आवश्यक आहे. त्या सर्व मुलांच्या वतीने मला तुम्हाला सांगावसं वाटतं की जेव्हा तुम्ही या करारावर सही कराल, तेव्हा तुम्हाला तुमचं वचन पाळावंच लागेल. आणि जरी तुम्ही ते विसरलात, तरी तुम्हाला मुलांना अशी वागणूक द्यावी लागेल, जशी तुम्हाला मिळावी अशी तुमची अपेक्षा आहे. धन्यवाद!

एकीकडे अमायाचा हा व्हिडिओ व्हायरल होत असतानाच स्वीडनच्या ग्रेटाच्या त्या कानउघाडणी करणाऱ्या भाषणाची देखील चर्चा होऊ लागली आहे. जागतिक तापमानात वाढ होत असताना जगातली नेतेमंडळी इतकी शांत कशी बसू शकतात? असा अगतिक सवाल ग्रेटानं उपस्थित केला होता.


काय होता ग्रेटाचा तो प्रश्न? वाचण्यासाठी क्लिक करा!

दरम्यान, अमायाच्या व्हिडिओसोबतच युनिसेफने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर बालहक्कांच्या जपणुकीचं आवाहन करणारे अजून काही व्हिडिओ ट्वीट केले आहेत.