मोठी बातमी: यंदाच्या मोसमातली थंडीही कडकडीतच, हवामान खात्याचा इशारा

भारतीय हवामान विभाग (IMD) ने आगामी दोन महिन्यांमध्ये थंडीची लाट आणि तीव्र स्वरूपाच्या अशा चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. यंदाची थंडीही जास्त जाणवणारी अशी असेल, असे भारतीय हवामान विभागाचे प्रमुख एम मोहपात्रा यांनी स्पष्ट केले आहे. यंदाच्या आगामी मोसमामध्ये ला नीनाचा प्रभाव कायम असणार आहे. त्यामुळेच अधिक तीव्रतेची वादळे ही बंगालच्या उपसागरात निर्माण होतील असा अंदाज आहे. यंदाचा हिवाळा अधिक कडकडीत असण्यासाठी अनेक कारणांचा समावेश आहे. पण प्रामुख्याने प्रभाव हा ला नीनाचा असेल असा उल्लेख त्यांनी केला. ला नीनामुळेच यंदाचा हिवाळा अधिक जाणवेल असेही त्यांनी स्पष्ट केले. ला नीनासाठीचे वातावरण तयार झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय हवामान विभागामार्फत प्रकाशित झालेल्या बुलेटिनमध्ये ही माहिती समोर आली आहे.

भारतात EI Nino या हवामानाच्या संकेताचा थेट संदर्भ हा दुष्काळ आणि कमी पावसासोबत असतो. तर ला नीनाच्या परिस्थितीचा संबंध हा अधिक मॉन्सून आणि कडाक्याच्या थंडीशी असतो. यंदाच्या ऑक्टोबरमध्ये अजुन कोणतेही वादळ निर्माण झालेले नाही. भारतात अनेक भागात सुरू असलेला पाऊस जेव्हा थांबेल तेव्हाच परतीचा पाऊस संपला असे स्पष्ट होईल. ला निना या वातावरणातल्या पॅटर्नच्या बदलामुळे अनेक भागात पावसाचे वातावरण कायम आहे. तर काही ठिकाणी थंड वाऱ्याचे वातावरण आहे. अनेक भागात वाहणारे थंड वारे हा ला नीनाचा परिणाम असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

यंदाच्या वर्षीही ओडिसातून काही वादळे तयार होण्याचा अंदाज आहे. ओडिसासोबतच पश्चिम बंगाल, बांगलादेश याठिकाणी वादळे तयार होण्यासोबतच तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश याठिकाणी वादळांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षअखेरीस ला नीनाचा प्रभाव कायम असेल असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. म्हणूनच यंदाच्या हंगामात ला नीनाचा प्रभाव हा सरासरी असेल असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.