घरदेश-विदेशजेम्स हॅरिसन...लाखो बाळांना नवजीवन देणारा 'मसीहा'!

जेम्स हॅरिसन…लाखो बाळांना नवजीवन देणारा ‘मसीहा’!

Subscribe

ऑस्ट्रेलियाचे रहिवासी असलेले जेम्स हॅरिसन सध्या चांगलेच चर्चेत आहेत. रक्तदानाच्या माध्यमातून एक-दोन नव्हे तर तब्बल अडीच लाख बाळांचे जीव वाचवणाऱ्या या ‘मसीहा’चे नाव जगभरात घेतले जात आहे.

सन १९५१ मध्ये जेम्स १४ वर्षांचे असताना त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेमध्ये त्यांचे एक फुफ्फुस काढून टाकण्यात आल्यामुळे ते जवळपास ३ महिने हॉस्पिटलमध्येच होते. दरम्यानच्या काळात, आपल्या शरीराला केवळ बाहेरुन मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यामुळेच आपण आज जिवंत राहिल्याचे जेम्स यांना समजले. यानंतर समाजाने आपल्यावर केलेल्या या उपकारांची योग्य प्रकारे परतफेड करायची, असा त्यांनी दृढ निश्चय केला.

- Advertisement -

आजारपणातून पूर्णपणे बरे झाल्यावर जेम्स यांनी रक्तदान करण्याचा समाजोपयोगी निर्णय घेतला. परंतु, कायद्यानुसार १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत अधिकृतरित्या रक्तदान करु शकत नसल्याने त्यांना आणखी ४ वर्षे थांबणं क्रमप्राप्त होते. ४ वर्षांचा काळ हळूहळू सरला. मात्र, जेम्स स्वत:ला दिलेले वचन विसरले नाहीत. १८ वर्षांचे होताच त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या रेड क्रॉस ब्लड सर्व्हिसमध्ये जाऊन आपले पहिले रक्तदान केले. कौतुकाची बाब म्हणजे गेली ६० वर्षे जेम्स सातत्याने रेड क्रॉस ब्लड सर्व्हिसमध्ये रक्तदान करत आहेत.

फोटो सौजन्य- इमेज 9

सन १९६७ पर्यंत ऑस्ट्रेलियात दरवर्षी हजारो बाळांचा रक्तातील काही त्रुटींमुळे मृत्यू होत होता. Rhesus नावाच्या डिसीजमुळे हे प्रकार घडत असल्याचे निदान झाले होते. यादरम्यान रक्ताचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने अनेक महिलांचे गर्भपातसुद्धा होत होते. तर काही ठिकाणी गर्भातच ब्रेन हॅमरेज झालेली बाळं जन्माला येत होती. अशा कठीण काळात डॉक्टरांनी जेम्सना खूप मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

रक्तदानामुळे स्वत:ला नवजीवन मिळालेले जेम्स, रक्तदानासाठी लगेचच तयार झाले. त्याप्रमाणे रक्तदान करत जेम्स यांनी जवळपास अडीच लाख बाळांचे प्राण वाचवले. त्यांच्या दोन्ही हातांमधून रक्तदान करत लाखो चिमुकले जीव वाचवणाऱ्या जेम्सना ‘द मॅन विथ द गोल्डन आर्म’ अशी ओळख मिळाली. याविषयी बोलताना जेम्स म्हणतात की, ”यामध्ये मी कोणतेही महान कार्य केलेले नाही. मला ज्या समाजामुळे जीवनदान मिळाले, त्याची ही छोटीशी परतफेड असल्याचं मी समजतो.”

जेम्सना त्यांच्या या अतुलनीय कार्यासाठी १९९९ साली ‘मेडल ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा खिताब बहाल करत गौरवण्यात आले आहे. ‘जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत मी रक्तदान करत राहीन’, असं जेम्स अभिमानाने सांगतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -