Ayodhya Ram Mandir: अयोध्येच्या सीमा सील; मोदींच्या कार्यक्रमापर्यंत कडेकोट सुरक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. दुपारी १२.३० वाजता हा सोहळा पार पडेल. या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

राम मंदिर भूमीपूजनानिमित्त अयोध्येच्या सीमा सील; पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापर्यंत कडेकोट सुरक्षा तैनात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. दुपारी १२.३० वाजता हा सोहळा पार पडणार असून या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. मंदिर परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे. या द्वारेच निमंत्रितांना भूमीपूजनाच्या स्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान मोदींच्या हस्ते भूमीपूजन होईपर्यंत अयोध्येत एसपीजी (SPG) आणि एनएसजी (NSG) जवानांचा कडेकोट पहारा असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.

दरम्यान कोरोनामुळे निमंत्रितांची संख्या मर्यादित असून, १७५ मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात १३५ संत-महंत असून, उर्वरित ४० विशेष पाहुणे असतील. निमंत्रणपत्रिकेवर सुरक्षाकोड असल्याने समारंभाच्या ठिकाणी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश मिळू शकेल. गर्दी टाळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले असून त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण अयोध्या सील करण्यात आली आहे.

राम मंदिर भूमीपूजनाच्या आजच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज हे मंचावर उपस्थित असणार आहेत.

राम जन्मभूमी परिसरासह आजूबाजूच्या भागाला रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागाच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे देण्यात आली आहे. या ठिकाणच्या सुरक्षेसाठी प्रवेश करताना सिक्यूरिटी कोडची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११.३० वाजता अयोध्येत दाखल होणार असून भूमीपूजनचा शुभ मुहूर्त १२.४४ असल्याचे सांगितले जात आहे.

भूमीपूजनाच्या कार्यक्रमाआधी संपूर्ण अयोध्या सील करण्यात आली आहे. कोणत्याही वाहनाला येण्याजाण्यासाठी परवानगी नाही. पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम होईपर्यंत कुणालाही अयोध्येत जाण्याची परवानगी नाही. तर उपस्थितांना कार्यक्रमादरम्यान पोलीस तपासात ओळखपत्रही दाखवावे लागेल. मोदींच्या आगमनाच्या २ तासापूर्वीपर्यंत आमंत्रितांना पोहचायचे आहे.


Photo: भूमीपूजनापूर्वी अयोध्या लाखो दिव्यांच्या रोषणाईने लखलखली