जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये अंबानी, इम्रान, ट्रम्प; पण मोदींचा समावेश नाही

टाईम मासिकाच्या १०० प्रभावशाली यादीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या यादीत यावर्षी उल्लेख नाही.

Mumbai
imran khan and narendra modi on time cover
प्रातिनिधिक फोटो (सौजन्य - टाईम मासिक)

अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘टाईम’ मासिकाने वर्ष २०१९ मधील प्रभावशाली १०० व्यक्तिमत्वांची यादी जाहीर केली आहे. भारतामधून फक्त तीन लोकांचा या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, जनहित याचिकाकर्त्या तसेच कलम ३७७ काढून टाकण्यासाठी ज्यांनी लढा दिला अशा अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी यांच्या नावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे लिडर कॅटेगरीमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश आहे. २०१४, २०१५ आणि २०१७ साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख टाईमच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वामध्ये होता. मात्र यावेळी नरेंद्र मोदी यांचा समावेश या यादीत झालेला नाही.

टाईम मासिकातर्फे दरवर्षी त्या त्या वर्षातील १०० प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांची यादी जाहीर केली जाते. यामध्ये राजकीय पुढारी, विचारवंत, कलाकार, खेळाडू आणि उद्योजकांचा समावेश करण्यात येत असतो. यावेळी जगभरातील राजकीय नेत्यांमधून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इम्रान खान यांच्यासोबत चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इतर नेत्यांचाही समावेश आहे. मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यावेळी या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे २०१९ साली भारतात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. भाजपकडून यंदाही मोदीच पंतप्रधान पदाचे दावेदार असतील अशी चिन्ह दिसत आहेत. मात्र याचा प्रभाव टाईमच्या निवड समितीवर पडलेला दिसत नाही.

पुलवामाचा संदर्भ होता, पण…

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना टाईमने प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत घेतले आहे. इम्रान खान पाकिस्तानमध्ये कसे सकारात्मक बदल करत आहेत, याचाही उल्लेख त्यांच्या प्रोफाईलमध्ये करण्यात आला आहे. १४ फेब्रुवारी रोजी भारतात पुलवामा येथे हल्ला झाला होता. तेव्हापासून भारत – पाकिस्तानमध्ये तणाव सुरु आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरून जगभरातील सर्व देशांनी भारताच्या बाजूने उभे असल्याचे सांगितले. तर दहशतवाद्यांना शरण दिल्याबद्दल पाकिस्तानला खडसावले होते. इम्रान खान यांनी पुलवामा नंतर दिलगीरी व्यक्त न करता निर्वाणीची भाषा वापरली होती. याउलट बालाकोटचा स्ट्राईक केल्यानंतर मोदींची प्रतिमा उजळून निघाली होती. मात्र याचा प्रभाव टाईमच्या यादीवर पडलेला दिसत नाही.

कशी होते प्रभावशाली व्यक्तींची निवड

टाईम मासिकातर्फे दरवर्षी त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून पोल चालवला जातो. जगभरातील कलाकार, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, उद्योजक आणि खेळाडू ज्यांनी मागच्या वर्षभरात जगामध्ये बदल घडतील अशी कामे केलेल्या लोकांना या यादीत घेतले जाते. त्यानंतर टाईमचे संपादकीय मंडळ यादीतील नावे अंतिम केल्यानंतर त्यावर वाचकांची मते जाणून घेते. यावर्षी २७ मार्च रोजी ही प्रक्रिया सुरु झाली होती, ती १६ एप्रिल पर्यंत सुरु होती आणि काल १७ एप्रिल रोजी त्याचा निकाल जाहीर झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here