अविष्कारचा ‘स्मृतीमहोत्सव’

Mumbai
Smruti Mahotsav

प्रायोगिक नाटके आता व्यावसायिक रंगमंचावर होऊ लागली असली तरी साधारण वीस वर्षांपूर्वी स्वतंत्र अशा रंगमंचावर ती सादर केली जात होती. मनन, चिंतन असं बरंच काही या प्रयोगात असायचे. काही वेगळे केल्याचा दिलासा या प्रायोगिक नाटकात होता. त्यामुळे त्यासाठी काम करणारा कलाकारवर्गही स्वतंत्र असा होता. नाना पाटेकर, अमोल पालेकर, जब्बार पटेल, सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, विजय तेंडुलकर यांनी त्यावेळी आपल्या पद्धतीने या रंगभूमीला चालना दिली. त्यांच्याच विचारसरणीचे कितीतरी कलाकार अलीकडे या चळवळीत सहभागी होऊन प्रायोगिक रंगभूमीचे सातत्य टिकवण्याचे प्रयत्न करीत आहेत. साधारण चार दशकांपूर्वी अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे यांनी पुढाकार घेऊन ‘अविष्कार’ या संस्थेची स्थापना केली. बालनाटकांबरोबर प्रायोगिक नाटके रंगमंचावर आणण्यात या संस्थेने पुढाकार घेतला. इतकेच काय तर छबिलदासमधील सभागृह या नाटकांनीच ओळखले जाईल इतके कार्यक्रम इथे होत होते. अविष्कारचा अठ्ठेचाळिसावा ‘वर्धापनदिन’ आणि अरविंद देशपांडे यांचा बत्तीसावा ‘स्मृतीदिन’ लक्षात घेऊन निर्माते, सूत्रधार अरुण काकडे यांनी आपल्या संपूर्ण टीमसह या ‘स्मृती महोत्सवा’चे आयोजन केलेले आहे. 1 ते 12 फेब्रुवारी या दरम्यान पार्ल्याच्या साठ्ये महाविद्यालयात हा महोत्सव होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय राऊत आणि 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

स्मृती महोत्सवात नाटक, विजय तेंडुलकर यांनी लिहिलेली स्वगते इथे सादर केली जाणार आहेत.‘मौनराग’ हे महेश एलकुंचवार यांचे लिहिलेले नाटक जे चंद्रकांत कुलकर्णीने दिग्दर्शित केलेले आहे. या नाटकात चंद्रकांतबरोबर अभिनेते सचिन खेडेकर हेसुद्धा सहभागी आहेत. युगंधर देशपांडे लिखित, दिग्दर्शित ‘चार दोन तुकडे’ हे नाटक सादर केले जाणार आहे. शुभांगी भुजबळ, सोनल खळे, शिल्पा साने, दीपल जोशी यांच्यासोबत सुषमा देशपांडे यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे. ‘भूमीकन्या सीता’ हे मामा वरेरकर लिखित नाटक आहे ज्याचे दिग्दर्शन विश्वास सोहनी यांनी केलेले आहे. संजीव पंडीत, पुष्कर सराड, मिहीर पुरंदरे, श्रृती पाटील, सुमीत सासणे, विश्वजित सावंतफुले, मानसी कुलकर्णी यांच्या भूमिका यात पहायला मिळतील. शेवटच्या दिवशी 11 फेब्रुवारीला प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांनी नाटकातून तसेच विपुल लेखनातून आपले स्वत:चे विचार व्यक्त केलेले आहेत. त्यातील काही स्वगते इथे सादर केली जाणार आहेत. त्याचे दिग्दर्शन विश्वास सोहोनी यांनी केलेले आहे.

चिन्मयी सुमीत, मानसी कुलकर्णी, सुशील इनामदार, सुनिल जोशी, दीपक राजाध्यक्ष हे सेलिब्रिटी कलाकार अभिवाचनात सहभागी होणार आहेत. नाटककार, पत्रकार जयंत पवार याने तेंडुलकरांवर प्रदीर्घ लेख लिहिला होता. त्याचेसुद्धा वाचन इथे होणार आहे.