शास्त्रीय संगीताचे बादशहा!

एक प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक म्हणून नावलौकिक असलेले पंडित जितेंद्र अभिषेकी यांची आज जयंती. गोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणार्‍या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यामुळे जन्मजात त्यांना गायनाचा वारसा मिळाला.

Mumbai
Pt-Jitendra-Abhisheki

एक प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक म्हणून नावलौकिक असलेले पंडित जितेंद्र अभिषेकी यांची आज जयंती. गोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणार्‍या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यामुळे जन्मजात त्यांना गायनाचा वारसा मिळाला. पंडीत जितेंद्र अभिषेकींचे वडील कीर्तनकार असले तरी त्यांना शास्त्रीय संगीताचाही अभ्यास होता. त्यामुळे पंडीतजींच्या बालमनावर कीर्तनातील अभंगाचे आपोआपच संस्कार झाले. वडिलांचे स्वर कानी पडूनच पंडीतजींच्या जडणघडणीला सुरुवात झाली. वयाच्या १३ व्या ते १४ व्या वर्षापर्यंत त्यांना वडिलांकडून संगीताची तालीम लाभली. या तालमीत कीर्तनाव्यतिरिक्त शास्त्रीय संगीताचे धडे जितेंद्र अभिषेकी यांनी गिरवले. दुर्गा, देस, काफी, खमाज असे संगीतातील राग पंडीतजी वडिलांकडून शिकले. त्यामुळे लहानपणीच पंडीतजींना मूळ रागांची ओळख झाली. पंडीतजींच्या संगीत शिक्षणाबरोबर त्यांच्या शालेय शिक्षणाकडेही वडिलांचे लक्ष होते. त्यावेळी गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य होते. पोर्तुगीज शाळेत चार वर्षं शिक्षण घेतल्यानंतर तत्काळ महाविद्यालयात प्रवेश मिळत असे. त्यामुळे हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर म्हापुश्यात पोर्तुगीज कॉलेजमध्ये त्यांनी दोन वर्ष शिक्षण घेतले. या काळात ख्रिस्ती संगीताचे संस्कारही कळत-नकळत त्यांच्यावर झाले. लहानपणी त्यांनी नाटकातदेखील काम केले.
सुरुवातीला पंडीतजी गिरीजाबाई केळकरांकडे शिकण्यासाठी जात. पंडीतजींनी ४ ते ५ वर्षे गिरीजाबाईंकडे संगीताचे धडे गिरवले. त्यांचे शालेय शिक्षणही व्यवस्थित सुरू होते, पण त्यांना उच्च संगीताची ओढ होती. संगीताच्या उच्च शिक्षणासाठी पंडीतजी गोवा सोडून पुण्यात आले. येथे पंडीतजींनी अनाथाश्रमात आसरा घेतला. वारावर जेवत, माधुकरी मागत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. तब्बल २१ गुरुंकडून पंडीतजींनी संगीताचे ज्ञान आत्मसात केले. त्यांच्याद्वारे मिळालेले संस्कार आत्मसात करून त्यांनी स्वतःची स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. संगीताची आराधना सरू असतानाही त्यांनी शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षणाकडे कानाडोळ केला नाही. संस्कृतचे पदवीधर झालेल्या पंडीतजींचे वाचनही अफाट होते. अभिषेकी पुढे मुंबईत आले. येथे त्यांनी मोठ्या भावाकडे राहून मुंबईतील भवन्स महाविद्यालयातून बीएचे शिक्षण पूर्ण केले. मुंबईतील मुक्कामात त्यांनी आकाशवाणीत तब्बल ९ ते १० वर्षं नोकरी केली. आकाशवाणीतील कोकण विभागात रुजू झाल्यानंतर पंडीतजींनी विविध कामे केली. येथे त्यांनी गाण्यांना चाली देणे, नाटके बसविणे, डबिंग करणे, गीतांचे गायन करणे याबरोबरच बातम्या आणि बातम्यांचे भाषांतर करणे अशी चौफेर कामे केली. येथेच त्यांना मोठमोठ्या गायकांची रेकॉर्ड्स ऐकणे, जुन्या लोकांची गाणी ऐकून त्यावर विचार करणे तसेच साहित्य वाचनाची गोडी निर्माण झाली. अशाप्रकारे पंडीतजींच्या व्यक्तिमत्वाला अधिक तेज प्राप्त झाले.
अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी दिलेले योगदानही मोलाचे आहे. १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकातील पदांना अभिषेकींनी संगीत दिलं होतं. त्यांनी तब्बल १७ नाटकांना संगीत दिलं. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाचा मुख्य गाभा प्रयोगशीलतेवर आधारित होता. त्यांच्या संगीत दिग्दर्शनातील प्रयोग प्रेक्षकांना, संगीत रसिकांना खूप आवडले. कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात पंडीतजींनी भैरवीने केली. १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्र या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. विशेष म्हणजे या नाटकात सर्वप्रथम रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरण्यात आले होते. संगीत दिग्दर्शनात हातखंडा असलेल्या पंडीतजींचा आवाजही गोड होता. त्यामुळे दुसर्‍यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणीत काम करत असताना त्यांची पु. ल. देशपांडेंसोबतची ओळख वाढली. पुढे आकाशवाणीच्या बिल्हण या संगीतिकेत पु. लं. च्या संगीत दिग्दर्शनात मंगेश पाडगावकर लिखित गाणी पंडीतजींनी गायली. आकाशवाणीत कामाला असताना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांना संगीत दिले. एवढेच नाही तर वैशाख वणवा या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’ हे गीतही त्यांनी म्हटले. १९८६ मध्ये पंडीतजी पुण्यात स्थायिक झाले. १९८६ ते ९५ या काळात त्यांनी पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवात गायन केले. १९९५ रोजी ७६व्या नाट्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले. संगीतकलेची लाभलेली भेट त्यांनी स्वतःपूरती मर्यादित न ठेवता आपल्या शिष्यांना मुक्तहस्ताने पंडीतजींनी बहाल केली. त्यांच्या सांगीतीक कार्यामुळे अजरामर झालेले पंडीत जितेंद्र अभिषेकी यांनी ७ नोव्हेंबर १९९८ रोजी जगाचा निरोप घेतला.