घरफिचर्सराजकारणातील ‘काळ्या-बाहुल्या’!

राजकारणातील ‘काळ्या-बाहुल्या’!

Subscribe

संतांनी अथक प्रयत्नांनी वर्णवर्चस्वाचा दाह कमी करून अंधश्रद्धांची बजबजपुरी आणि धर्माचा दुरुपयोग करणार्‍या धर्ममार्तंडांची मगरमिठी प्रबोधनातून कमी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला; पण या प्रयत्नांवर पाणी फिरवण्याचे काम सांप्रतकाळात राजकीय पटलावर पद्धतशीरपणे सुरू आहे. याच पटलावर पदोपदी वैज्ञानिक दृष्टीकोन ‘भस्म’ करण्याचे काम जे होते ते लोकशाहीची आहुती देण्यास पोषक ठरणारे आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त राजकारण्यांतील अंधश्रद्धांचा हा परामशर्र्.

फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेत महाराष्ट्राने पुरोगामित्वाची ठाशीव ओळख निर्माण केली आहे. संत परंपरेने मानवतावादी, समतावादी समाज-माणूस घडवण्याचा प्रयत्न केला. पण निर्जीव भिंती चालवणे, रेड्याकडून वेद पठण करुन घेणे, पुष्पक विमानाने स्वर्गाकडे प्रवास करणे यांसारख्या भंपक कल्पनांचेही याच संतांच्या नावाने उदात्तीकरण करण्यात आले हेदेखील लक्षात घ्यावे लागेल. कदाचित या अवैज्ञानिक कल्पनांमागील भावना वेगळी असेल. भोळ्या जनतेला सत्कर्माच्या मार्गाला लावण्यात रस निर्माण करण्याच्या हेतूने हे लिहिले गेले असावे. पण हे हेतू कालांतराने पुढे आलेच नाहीत. ते येऊ नये म्हणून ज्यांनी मोलाचा वाटा उचललाय त्या राजकारण्यांच्याही अंधश्रद्धांची भांडाफोड होणे गरजेचे ठरते.

सत्तालोलूप राजकारण्यांनी श्रद्धेचे श्राद्ध घालत अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याचे काम आजवर केले आहे. त्यास अपवाद ना राष्ट्रीय नेते आहेत ना ग्रामपंचायतीचे सदस्य. ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. त्या अनुषंगाने विषय विवेचनाला प्रारंभ करणे क्रमप्राप्त ठरते. या निवडणुकीत ठिकठिकाणी अंधश्रद्धांचा अक्षरश: बाजार मांडलेला बघायला मिळाला. करणी करणे, मूठ मारणे, टाचणी मारलेले लिंबू अथवा काळ्या बाहुल्या विरोधकांच्या दारात टाकणे असे कितीतरी हिडीस आणि विकृत प्रकार नित्याचेच होते. ठाणेे जिल्ह्यातील वाघेरे पाडा येथे स्मशानभूमीत एका जळणार्‍या चितेजवळ पीठाचा गोळा दिसून आला. त्या गोळ्यात असलेल्या चिठ्ठीवर चक्क एका पॅनलच्या उमेदवारांची नावे आढळून आली. भिवंडीतील भिनार ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना हरविण्यासाठी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्या प्रचार पत्रकात अर्धा लिंबू कापून, कुंकू व तांदूळ असा उतारा करून तो झाडाखाली फेकून दिला होता. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कोलगावच्या रस्त्यावर लिंबू, हळद, पिंजर आणि तांदूळ टाकण्यात आले होते. बेळगावातील गोकाक तालुक्यातील तपसी येथे अबीर गुलाल फासलेला तांदूळ, मटकी, डाळ, मतदारांच्या घरासमोर टाकल्याचे आढळून आले. तर हिंडलगा भागात जिवंत कोंबडा, मटकी, गुलाल, नारळ, कोहळा, कोवळा रस्त्यावर टाकण्यात आला होता.

- Advertisement -

सातारा जिल्ह्यातील राजापुरी गावात तर ‘सरपंच, नको रे बाबा’ असे म्हणण्याची वेळ आली. सरपंचपद स्वीकारणार्‍यावर काळ घाला घालतो अशी अंधश्रद्धा गावकर्‍यांमध्ये पसरली आहे. त्यामुळे पाच वर्षांपासून कोणीही सरपंच होण्यासाठी तयार नाही. पलूस तालुक्यातील नागठाणे गावात एका मडक्याने भलतीच खळबळ उडवून दिली. लाल कपड्यात एखादा अस्थीकलश वाटावा, असे मडक्याला सजवले होते. त्यातून भानामतीचा प्रकार करण्यात आला. काही महिने आधी याच गावातील एका धार्मिक स्थळावर ४० देशी कोंबड्या, तितकेच लिंबू, खिळे, सुया, विशिष्ट रंगाचे कापड, भात असा उतारा टाकला होता. कराड तालुक्यातील एका नेत्याला तर ‘भुताटकी’ची भारी हौस आहे. कोणतीही निवडणूक लागली की हे महाशय डोंगररांगात भुतांच्या शोधात फिरतात म्हणे. आमदारकीच्या एका निवडणुकीसाठी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात एका भुताचा व्यवहार केला. मात्र, भूत काही आले नाही. परिणामी भूत तर रुसलेच आणि जोडीला आमदारकीही रुसली. निवडणूक काळात अंधश्रद्धांचा बाजार अखेर मांडला का जातो? प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या मनात भीती बसावी, जेणेकरुन त्याने प्रचार थांबवावा किंवा मतदार बाहेरच पडू नये हा त्यामागील अंतस्थ हेतू असतो. पण त्यातून साध्य काय होते? गावातली भाबडी जनता अशा अंधश्रध्दांना बळी पडते आणि ग्रामविकासाचे मुद्दे मागे राहून बुवा, बाबांच्या तुंबड्या तेवढ्या भरतात.

अर्थात हा प्रकार केवळ ग्रामपंचायतीतच चालतो असेही नाही. त्याला राजाश्रय असतो तो बड्या पदाधिकार्‍यांचा आणि मंत्र्यांचाही. त्यातून मग मुख्यमंत्रीही सुटत नाहीत. पहाटेच्या वेळी शपथ विधी उरकून मुख्यमंत्री बनणार्‍या देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेण्याआधी मुंबईतल्या निवासस्थानी होम हवन केल्याचा प्रकार साधारणत: दीड वर्षापूर्वी पुढे आला होता. राजकीय घडामोडी टोकाला पोहचल्या त्या रात्री एक ते दीडच्या सुमारास फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता यांनी हवन आणि अनुष्ठान केले. मध्य प्रदेशातील माळव्यातल्या एका मंदिरातल्या तंत्रविद्या पंडितांनी हे हवन केले आणि आहुतीही दिली होती. माळव्यातल्या नलखेडा येथील बललामुखी मंदिरातले चार पंडित हे अनुष्ठान करण्यासाठी आले होते. हे मंदिर तंत्रविद्येसाठी (अशा थोतांड क्रियांना विद्या म्हणणे हीदेखील अंधश्रद्धाच) प्रसिद्ध आहे. हा प्रकार इथवरच थांबला नाही.

- Advertisement -

मुख्यमंत्रीपदावरुन फडणवीस काही दिवसातच पायउतार झाल्यावरही वर्षा बंगल्यात काही अघोरी पूजा केल्याचे पुढे आले. या पूजेचाच एक भाग म्हणून या बंगल्यावरील भिंतींवर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काही वाक्यं लिहिण्यात आली होती. या वाक्यांचा समाचार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘लिहिणार्‍यांचे तोंड काळे झाले’, असा टोला लगावत घेतला. मात्र हे प्रकरण येथेच थांबले नाही. मुख्यमंत्र्यांच्या कथित अडचणी दूर करण्यासाठी याच वर्षा बंगल्यावर दिवाळीच्या आधी मोठी पूजा झाल्याचे बोलले जाते. त्यात काही पंडित बोलवण्यात आले होते. या पंडितांच्या मते, वर्षावर आधी केलेल्या पूजेत इतकी ताकद होती की, त्याचा त्रास उद्धव ठाकरेंना होत होता. त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी आणि आधी केलेल्या तंत्र-मंत्रांची ताकद कमी करण्यासाठी वर्षावर ही पूजा करण्यात आली. पण या पूजेविषयी वाच्यता करण्यास कुणाला मुभा नव्हती. अंधश्रद्धांविरोधात सदैव आसूड ओढणार्‍या प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांशी ही प्रतारणा आहे आणि तिही त्यांच्याच नातवाकडून होणे यापेक्षा वाईट ते काय? राज्यकर्त्यांचे अनुकरण करणारी असंख्य मंडळी असते. पण हे राज्यकर्ते भोंदू लोकांच्या नादाला लागतात तेव्हा ते आपल्याबरोबर समाजालाही अंधश्रद्ध आणि दैववादी बनवत असतात हे मुख्यमंत्र्यांना कधी कळणार? अर्थात वर्षावर पूजापाठ केवळ दोन-पाच वर्षातच झाले असेही नाही. अशोक चव्हाण यांनीही आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात ‘वर्षा’ वर सत्यसाईबाबांची पाद्यपूजा वगैरे केली होती.

काही दिवसांनी चव्हाणांनी आणखी कुणातरी न्यूमरॉलॉजिस्ट किंवा आध्यात्मिक गुरुंच्या सल्ल्याने आपले नाव अशोक चव्हाणऐवजी अशोकराव चव्हाण असे करून घेतले. मंत्रालयापासून निवासस्थानापर्यंत तशा पाट्या लागल्या आणि काही दिवसांतच त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले. राजकीय पद मिळणे आणि जाणे ही एक प्रक्रिया आहे. यात कर्तव्य आणि कर्तृत्वाचे संदर्भ अधिक महत्वपूर्ण ठरतात. मात्र, त्याचा विचार न करता राज्यकर्ते जेव्हा जाहीरपणे अंधश्रद्धांपुढे माना झुकवतात तेव्हा, तोे विज्ञाननिष्ठ विचार पुढे नेण्यातला मोठा अडथळा ठरतो. अर्थात सर्वच राजकारणी भोंदू असतात असेही नाही. प्रशांत बंब यांच्यासारखे काही नेते आहेत, जे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरतात आणि भरघोस मतांनी निवडूनही येतात. कम्युनिस्ट चळवळीतील बहुतांश नेते अंधश्रद्धांना खतपाणी घालत नाही. शरद पवारांसारखे नेते आपल्या श्रद्धेचा बाजार मांडताना दिसत नाहीत.

असे असताना दुसरीकडे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील कृषी मंत्रालयाच्या केबिनमध्ये ज्या नेत्याची वर्णी लागते, त्याची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते, अशीही चर्चा आपल्याकडे सहजपणे होते. दोन महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर होतो आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काळजातही धस्स होते. महत्वाचे म्हणजे अशा बाजारगप्पांवर विश्वास ठेवणार्‍यांमध्ये सुशिक्षितांची संख्या लक्षणीय असते. महाराष्ट्राचे पुरोगामित्व सिद्ध करायचे असेल आणि लोकशाहीची आहुती पडू द्यायची नसेल, तर केवळ जादूटोणा विरोधी कायदे करुन भागणार नाही. तर राजकारणातील ‘काळ्या बाहुल्यां’वर अर्थात अंधश्रद्धांवर तुटून पडण्याचे कर्तव्य आपल्या सगळ्यांनाच बजावावे लागेल. इतकेच.

राजकारणातील ‘काळ्या-बाहुल्या’!
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -