काँग्रेसचे बोगस हिंदुत्व प्रेम!

Mumbai
राजकारणी

सत्ता गेल्यानंतर उपभोगी राजकारणी कसे अस्वस्थ होतात, त्याचे सोनिया गांधी हे उदाहरण आहे. भाजपचे हिंदुत्व प्रेम आणि कर्मकांडावर कायम टीका करणार्‍या काँग्रेसला आता कुठल्याही रंगलेल्या तोंडाने बोलण्याचा अधिकार उरलेला नाही. आपली आई होमहवन करत असताना राहुल गांधी आणि काँग्रेससाठी सध्या संकटमोचक म्हणून जमिनीवर फिरणार्‍या प्रियंका गांधी हजर होत्या. त्यांनाही धागेदोरे बांधले आणि कुंकू बिंकू लावले… पुन्हा एकदा सत्ता येऊ दे, सत्तेशिवाय आम्ही राहू शकत नाही, अशी गार्‍हाणीही घालून झाली.

नरेंद्र मोदी यांच्या लाटेत 2014 मध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाल्यानंतर सत्तेचा माज आलेली काँग्रेस जमिनीवर आली आणि गेल्या 5 वर्षांत लोकांमध्ये जाऊन आपण बदलत आहोत, हे आता दाखवत आहे. त्यापैकी एक बदल म्हणजे आम्हालाही हिंदुत्व प्रेम असल्याचे नाटक करण्याचा प्रयोग. 60 वर्षे सत्ता उपभोगताना कायम अल्पसंख्याक प्रेमाचा आव आणत मतांचे राजकारण करणार्‍या काँग्रेसला याआधी कधी हिंदू आणि हिंदुत्व आठवले नव्हते. पण, आता देव, देऊळ, जानवे, धागे, दोरे, कुंकू आणि आरती ओवाळाव्याशा वाटतात, म्हणजे चमत्कार झाल्याचे म्हणायला हवे.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपला धर्म, देव याचे कधी प्रदर्शन करू नये आणि कुठल्या एका धर्माचे लांगुलचालन करू नये, अशी साधी आणि सोपी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या असताना आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मंदिरात जाऊन भेटी द्याव्याशा वाटतात आणि त्यांच्या आईला म्हणजे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रायबरेलीमधून अर्ज भरताना होमहवन करावे लागतात, हातात दोरे बांधावे लागतात, हा सारा प्रकार म्हणजे काँग्रेसचे बोगस हिंदुत्व प्रेम झाले. निवडणुकीसाठी मतांचा जोगवा मागण्याची ही ढोंगबाजी झाली.

सत्ता गेल्यानंतर उपभोगी राजकारणी कसे अस्वस्थ होतात, त्याचे सोनिया गांधी हे उदाहरण आहे. भाजपचे हिंदुत्व प्रेम आणि कर्मकांडावर कायम टीका करणार्‍या काँग्रेसला आता कुठल्याही रंगलेल्या तोंडाने बोलण्याचा अधिकार उरलेला नाही. आपली आई होमहवन करत असताना राहुल गांधी आणि काँग्रेससाठी सध्या संकटमोचक म्हणून जमिनीवर फिरणार्‍या प्रियंका गांधी हजर होत्या. त्यांनाही धागेदोरे बांधले आणि कुंकू बिंकू लावले… पुन्हा एकदा सत्ता येऊ दे, सत्तेशिवाय आम्ही राहू शकत नाही, अशी गार्‍हाणीही घालून झाली. 2004 पासून सोनिया रायबरेलीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी तीनवेळा निवडणूक लढवली; पण अर्ज दाखल करताना कधीही होमहवन केले नव्हते. सोनिया यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी होमहवनात सहभागी होणे आणि त्याची छायाचित्रे काढण्यास प्रसारमाध्यमांना संधी देणे, यामागे सरळसरळ हिंदुत्वाचा जाहीरपणे प्रदर्शन करण्याचा प्रकार झाला. गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील विधानसभेच्या निवडणुकांवेळीही मंदिरांना भेटी देण्याची राहुल यांची मंदिर यात्रा ही याच बोगस हिंदुत्व प्रेमाची साक्ष होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही चेहर्‍यावर आतापर्यंत बरेच लिहून झाले आणि आम्हीही लिहिले. पण, उगाच खोटा आव आणून हिंदूंबद्दल आम्हाला किती प्रेम आहे हे दाखवणार्‍या काँग्रेसचा बोगस चेहराही लोकांसमोर येणे गरजेचे आहे. मोदींच्या कार्य पद्धतीबाबत बरेच आक्षेप घेता येतील; पण एक बरे झाले सत्तेबाहेर राहून काँग्रेसला रस्त्यावर तर उतरावे लागले आणि त्यांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा तर फाटला गेला, हे खूप बरे झाले. पक्षश्रेष्ठी आणि दिल्ली दरबारचे राजकारण करत सत्तेच्या गाद्या उबवणार्‍या गांधी घराण्याला आणि काँग्रेसच्या नेत्यांना संघर्ष काय असतो, हे गेल्या 5 वर्षांत भारताने शिकवले, हे अतिशय उत्तम झाले. लोकशाहीचा हा खरा विजय आहे.

आपल्याकडे भ्रष्टाचार, लोकशाहीवाद आणि धर्मनिरपेक्षता या तीन प्रमुख मुद्यांवर एखाद्या राजकीय पक्षाची सर्वसाधारण चिकित्सा होते. पैकी भ्रष्टाचाराच्या परीक्षेत एकही पक्ष १०० गुणांनी उत्तीर्ण होऊ शकत नाही. काँग्रेस अधिक भ्रष्ट वाटते. कारण सर्वाधिक सत्ता त्या पक्षाने चाखली आहे. जर भाजप पुढची टर्म पूर्ण सत्तेत राहिला, तर त्या पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या कथा बाहेर येतीलच. धर्मनिरपेक्षता हे तत्वदेखील कोणत्याही पक्षाने प्राणपणाने जपलेले नाही. निवडणूक आल्यावर त्या त्या क्षेत्रातील जात-धर्माचे गणित बघून उमेदवारी ठरवणे हा जणूकाही सर्वमान्य सोपस्कार होऊन बसला आहे आणि यात कोणताच पक्ष कमी-जास्त नाही. काँग्रेस तर वर्षानुवर्षे हाच खेळ करत आलाय. केंद्रात सत्ता गेल्यानंतर आता त्यांना नव्याने हिंदूंचे देव आठवायला लागलेत, हा सुद्धा एक खेळ म्हणावा लागेल.

सत्ता गेल्यानंतर देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे काँग्रेस धर्मसंकटात सापडला होता. म्हणूनच धर्माचे प्रदर्शन करण्यासाठी राहुल यांना आपणही जानवेधारी असल्याचे दाखवावे लागले होते. गंमत बघा सत्ता गेल्यानंतर काय काय करावे लागले आणि काय काय बघावे लागते. 2014 पासून काँग्रेसच्या आत मोठा बदल झाला. यापैकी एक म्हणजे राहुल गांधी यांना पक्षाचा आदेश देणे आणि दुसरा म्हणजे पक्षाची प्रतिमा बदलणे. विशेषतः अँथोनी कमिटीने काँग्रेस पक्ष हा “हिंदुविरोधी प्रतिमा”ला बळी पडला होता, असे आपल्या निवडणुकीच्या आढावा अहवालात म्हटले होते आणि यानंतर गेली पाच वर्षे काँग्रेसचे सॉफ्ट का होईना हिंदूकरण सुरू झाले.

सध्या देशाच्या राजकीय पक्षांमध्ये काही गोष्टी स्पष्ट आहेत. सध्याच्या व्यवस्थेत कम्युनिस्ट पक्षापेक्षा जास्त कम्युनिस्ट कोणी असू शकत नाही, बहुजन समाज पक्षापेक्षा दलिताच्या जवळ जाणारा दुसरा पक्ष दिसत नाही आणि त्याचप्रमाणे भाजपही हिंदुत्वाच्या प्रेमात. आताही त्यांच्या निवडणूक संकल्पपत्रात म्हणजे जाहीरनाम्यात (जुन्या सरकारी योजनांना नवे नाव देऊन स्वतःच्या नावावर खपवण्याचे उद्योग यात भाजपचा हात कोणी धरणार नाही. तसेच जाहीरनाम्याचे संकल्पपत्र झाले आहे) राम मंदिर उभारणीचा उल्लेख आहेच. काँग्रेसही आता हिंदू प्रेमाचे भरते आल्याप्रमाणे अयोध्येत आम्ही राम मंदिराचे टाळे उघडले होते, असे बिनदिक्कतपणे सांगत आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवेळी स्वतः राहुल यांनी तसा प्रचार केला होता. यापेक्षा काँग्रेसचे वैचारिक अधःपतन काय असू शकेल.

गुजरात भाजपसाठी हिंदुत्व प्रयोगशाळा आहे, अशी आतापर्यंत काँग्रेस ओरड करत आला आहे; पण, भाजपच्या याच प्रयोगशाळेत राहुल यांनी गुजरात निवडणुकीवेळी मंदिर भेटी आणि टिळे प्रयोग केले होते. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाले तर काँग्रेसने आपला नैसर्गिक खेळ करण्याऐवजी भाजपच्या शैलीत खेळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

काँग्रेसने या देशावर सहा दशके राज्य केले त्याची सर्वात मोठी डोंगराएवढी गोष्ट म्हणजे कुठलेच प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचे नाहीत. मग तो गरिबी हटाव असो की तलाक असो किंवा शेतकर्‍यांचा किंवा काश्मीर प्रश्न असो. नाही तर मग गरीब गरीब कसे राहणार आणि शेतकरी आपल्या दारात प्रश्न सोडवण्यासाठी कसे येणार. स्वामीनाथन आयोग लागू करायला इतकी वर्षे काँग्रेसचा कोणी हात धरला नव्हता. एकीकडे जय किसान म्हणायचे आणि दुसरीकडे शेतकर्‍यांना भिकेकंगाल करायचे हे उद्योग काँग्रेसचे. अशा अनेक गोष्टी काँग्रेसच्या बिनकामाच्या कारभाराच्या सांगता येतील; पण, त्यासाठी एक पुस्तक काढावे लागेल. मी फार लांब जात नाही. कोकणात रेल्वे आली त्यासाठी जॉर्ज फर्नांडिस आणि मधू दंडवते यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. तीच गोष्ट मृत्यूचा महामार्ग बनलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची आहे. आज नितीन गडकरी यांच्या इच्छाशक्तीमुळे हा महामार्ग तयार होत आहे. डाव्या उजव्या विचारांच्या लढाईचे विश्लेषण होऊ शकते, तसेच ते विकासाचेही झाले पाहिजे. कोकणाप्रमाणे विदर्भ आणि मराठवाडा भकास राहिला त्याला काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही कारणीभूत आहे.

काँग्रेसच्या भकास कारभारावर बरेच खूप काही लिहिता येऊ शकते; पण या लेखाचा तो मुद्दा नाही. आज सत्तेवरून लोकांनी खाली खेचल्यानंतर काँग्रेसला विकास आणि हिंदुत्व आठवू लागले आहे आणि मग यासाठी त्यांचे हिंदुत्वाचे प्रयोग सुरू झाले आहेत. पण, हे प्रयोग बोगस आहेत हे न कळायला जनता खुळी नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here