घरफिचर्ससैन्यदल, नैतिकता आणि हनी ट्रॅप

सैन्यदल, नैतिकता आणि हनी ट्रॅप

Subscribe

पाकिस्तान अनैतिकतेच्या माध्यमातून भारतीय जवानांना जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करू लागला आहे. दर वर्षी एक अधिकारी पाकच्या हनी ट्रॅपमध्ये अडकत असल्याचे दिसत आहे. हे रोखण्यासाठी सैन्यदलाने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जवान, अधिकारी जेव्हा सुट्टीवर घरी जातात, तेव्हा त्यांच्यावर नियमांचे बंधन नसते आणि नियंत्रणही नसते. नेमके त्याच काळात त्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

भारताविरुद्ध पाकिस्तान प्रत्यक्ष संघर्षात नेहमीच धूूळ खात असतो. त्यामुळे 1971 च्या लढाईनंतर पाकिस्तानने भारताच्या विरोधात दहशतवादाच्या मार्गाने संघर्ष करण्याचे धोरण स्वीकारले. त्यासाठी दहशतवाद्यांची आत्मघातकी पथके पाठवणे, नागरी क्षेत्रात घातपात घडवून आणणे, काश्मिरात कायम अशांतता निर्माण करणे अशा प्रकारांबरोबर पाकिस्तान त्यांच्या मुलींना भारतातील सैन्य अधिकारी आणि जवानांशी फोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील बोलायला लावून त्यांना जाळ्यात फसवून त्यांच्याकडून गुप्त माहिती मिळवण्याचे कारस्थान रचत आहे. हनी ट्रॅप हा भारतीय सैन्यदलासाठी आव्हानाचा विषय बनला आहे.

पाकिस्तान अनैतिकतेच्या माध्यमातून भारतीय जवानांना जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करू लागला आहे. दर वर्षी एक अधिकारी पाकच्या हनी ट्रॅपमध्ये अडकत असल्याचे दिसत आहे. हे रोखण्यासाठी सैन्यदलाने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जवान, अधिकारी जेव्हा सुट्टीला घरी जातात, तेव्हा त्यांच्यावर नियमांचे बंधन नसते आणि नियंत्रणही नसते. नेमके त्याच काळात त्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. भारतासाठी ‘हनीट्रॅप’ हा विषय काही नवीन नाही. आतापर्यंत देशातील अनेक अधिकारी त्याच्या जाळ्यात पुरते अडकून पडले आहेत.

- Advertisement -

बनावट नावाच्या अनेक महिलांनी, नव्हे नव्हे गुप्तहेरांनी भारतातील अधिकार्‍यांना स्वतःकडे वळवून घेतले. हे भयावह प्रकरण सेजल कपूर नावाच्या महिलेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तिचे षड्यंत्र तर देशासाठी पुष्कळच हानीकारक ठरणार आहेे. सेजलने म्हणजे तिच्या माध्यमातून पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असणार्‍या आयएसआयने फेसबुकच्या खोट्या खात्याद्वारे भारतातील ९८ अधिकार्‍यांचे संगणक ‘हॅक’ केले आणि देशाच्या सुरक्षेच्या संदर्भातील माहिती सहज मिळवली. या अधिकार्‍यांमध्ये भूदल, नौदल, वायूदल यांसह पॅरामिलिट्रीच्या अधिकार्‍यांचाही समावेश आहे. सेजल कपूर तिची आकर्षक छायाचित्रे आणि चलचित्रे पाठवून अधिकार्‍यांशी मैत्री करायची. त्यानंतर पुढील बोलण्यासाठी त्यांना काही ‘अ‍ॅप इन्स्टॉल’ करायला सांगायची, पण ते ‘अ‍ॅप’ म्हणजे ‘मालवेअर’ असल्याने त्यातून संगणकांतील सर्व माहिती, पासवर्ड हे गुप्तहेरांना अगदी सहजरित्या मिळायचे. सेजलच्या ‘हो’ ला ‘हो’ म्हणत एकेक पाऊल टाकून अधिकार्‍यांनी देशद्रोहच केलेला आहे. या देशद्रोहाचे मूळ अनैतिकतेत दडलेले आहे, याकडे दुर्लक्षून चालणार नाही.

अनैतिकतेने संरक्षण क्षेत्राला आतून पूर्णपणे पोखरून टाकलेले आहे. देशाचे शत्रूराष्ट्रांपासून रक्षण करणे, गुप्तहेरांना सुगावाही लागू न देता शत्रूसैन्यावर चाल करणे आणि देशाच्या सीमा अबाधित अन् सुरक्षित ठेवणे, ही सैन्य दलाची कर्तव्ये आहेत, पण आज हेच अधिकारी सुरक्षेला वार्‍यावर सोडून नैतिकतेची लक्तरेही वेशीवर टांगत आहेत. सामान्य जनतेला तर या घटनांचा थांगपत्ताही नसतो. जेव्हा या घटना समोर येतात, तेव्हा सामान्य माणूस भांबावून जातो आणि विचार करत बसतो, ‘देशात चाललंय तरी काय ?’

- Advertisement -

केवळ हुशार असून उपयोग नव्हे. जर हुशारीला संस्कार आणि नीतीमत्ता यांचे बळच नसेल, तर ती हुशारी देशद्रोहासाठीच वापरली जाणार, हे निश्चित ! सैन्य दलात भरती होण्यापूर्वी विविध स्तरांवरील कठोर प्रकारच्या स्पर्धा-परीक्षा घेण्यात येतात. त्यात बुद्धीमत्ता आणि शारीरिक क्षमता यांच्या बळावर उत्तीर्ण झालेले हेच सैनिक पुढे अधिकारी होतात, पण ‘हनी ट्रॅप’सारख्या जाळ्यात सैनिक अडकू नयेत, यासाठी त्यांच्या नैतिकतेची परीक्षा घेणेही अतिमहत्त्वाचे आहे.

4 वर्षांपूर्वी असेच पाकिस्तानने ललनेचा वापर करून भारतीय हवाई दलातील एका अधिकार्‍याला गद्दारी करण्यास भाग पाडले. या अधिकार्‍यानेही केवळ फोनवर सेक्स चॅट करण्यासाठी भारताची गुपितं पाकिस्तानला फोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. अरुण मारवाह असे या अधिकार्‍याचे नाव होते. तो भारतीय हवाई दलाचा ग्रुप कॅप्टन होता. पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेला भारतीय हवाई दलाची गुप्त माहिती दिल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. मारवाह हा हवाई दलाच्या मुख्यालयातील महत्त्वाच्या कागदपत्रांचे फोटो मोबाईलवर काढून व्हॉट्सअ‍ॅपवरून आयएसआयला पाठवायचा. गेल्या काही दिवसांपासून मारवाहच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर त्याला 31 जानेवारी 2015 रोजी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेे. त्याच्या अटकेनंतर ‘हनी ट्रॅप’चा पर्दाफाश झाला. आयएसआयने फेसबुकवरून मारवाहला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले होते.

आयएसआयची एजंट किरण रंधवा हिने मॉडेल असल्याचे भासवून त्याला भुरळ घातली. चॅटवरून आठवडाभर अश्लील गप्पा मारल्यानंतर तो आयएएफच्या युद्ध सरावाची माहिती द्यायला तयार झाला. या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची माहिती उघड झालेली नाही. फक्त सेक्स चॅटच्या मोहापायी तो ही गुप्त माहिती आयएसआयला देत होता. युद्धाशी संबंधित लढाऊ विमानांच्या सरावाच्या माहितीची कागदपत्रे त्याने आयएसआयला पुरवली. त्याच्यामुळे ‘गगन शक्ती’ या इंडियन एअरफोर्सच्या सरावाची माहिती पाकिस्तानला मिळाली असल्याचे तपासातून उघड झाले. 20 वर्षीय किरण रंधावाशी फेसबुकवर चॅट केल्यानंतर तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाहण्यासाठी तो बैचेन झाला होता. त्याने किरणला व्हॉट्सअ‍ॅपवरून चॅट करायला सांगितले, पण आपल्याकडे सिम कार्ड नसल्याचे तिने सांगितले. तेव्हा त्याने तिला सिम कार्डही मिळवून दिले.

जगभरात अनेक देश हे शत्रू राष्ट्रामधील अंतर्गत गुप्त माहिती मिळवण्यासाठी अशा अनेक क्लुप्त्या लढवत असताना दिसतात. कारण आजच्या काळात युद्ध हे केवळ जमिनीवरच खेळले जात नाही, तर त्याचे अनेकविध पदर निर्माण झाले आहेत. शत्रू राष्ट्राच्या घरात घुसून त्यांची गुप्त माहिती मिळवणे हेदेखील आता युद्धाचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. एकदा का शत्रू राष्ट्राची गुप्त माहिती किंवा युद्धसामुग्रीबाबत अथवा युद्धनीती किंवा संरक्षण दलाच्या आगामी योजनांसंबंधीची माहिती मिळाली की, त्यायोगे त्याविरोधात सक्षम रणनीती बनवणे सहज शक्य होत असते. यासाठीच सुंदर दिसणार्‍या महिला गुप्तहेरांची नेमणूक केली जाते. पाकिस्तानातील गुप्तहेर संघटना आयएसआय या संघटनेने दोन दशकभरापासून भारतातील संरक्षण दलातील गुप्त माहिती मिळवण्यासाठी असे कटकारस्थान वारंवार रचले आहे. याला हनी ट्रॅप म्हणून संबोधले जाते.

2014 साली अशाप्रकारे हनी ट्रॅपच्या दोन घटना उघडकीस आल्या होत्या. ज्यात स्पष्ट झाले होते की, आयएसआय या संघटनेशी जोडलेल्या दोन महिलांनी फेसबुकच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलातील जवानांशी मैत्री केली होती. फेसबुकवर झालेली ही मैत्री कधीच समोरच्या व्यक्तीचे वास्तव स्पष्ट करत नसते. फेसबुकवर झालेली मैत्री पुढे अनेकदा प्रेमसंबंध आणि विवाह बंधनासाठीच्या शपथा-वचनांपर्यर्ंत जाते. मात्र, तो केवळ एक आभास असतो. खरे तर मनुष्याची खरी ओळख हेच त्याचे अस्तित्व असते. मात्र, हनी ट्रॅपमध्ये खरी ओळख कधीच होत नसते. हनी ट्रॅपसाठी नियुक्त केलेली महिला गुप्तहेर मैत्रीच्या आड केवळ गुप्त माहितीच मिळवत नाही, तर अनेकदा त्यांना शत्रू राष्ट्राच्या सैन्य अधिकार्‍यांकडून महत्त्वाचे दस्तऐवजही प्राप्त होत असतात.

सुरुवातीच्या काळात गोड आणि अश्लील संभाषण करणार्‍या या महिला गुप्तहेर जेव्हा त्यांच्याकडे पुरावाजन्य दस्तऐवज हाती लागतात, तेव्हा मात्र संबंधित अधिकार्‍याला ब्लॅकमेल करू लागतात. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या कोणा अधिकार्‍याचा आपत्तीजनक फोटो प्राप्त झाला किंवा विशेष चर्चा करतानाची सविस्तर माहिती प्राप्त झाली, तरीही ती जगजाहीर करण्याची धमकी देऊन त्याला ब्लॅकमेल केले जाते. सुरुवातीच्या काळात अश्लील संभाषणात गुंंतून भडाभडा ओकणारा अधिकारी नंतर मात्र बदनामी होणार या भीतीपोटी माहिती देऊ लागतो. त्यावेळी मात्र अधिक संंवेदनशील आणि महत्त्वपूर्ण माहिती महिला गुप्तहेर प्राप्त करून घेतात.

कांगडा आणि हैदराबाद या ठिकाणच्या संरक्षणदलातील जवानांच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता. पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये हे दोन जवान अडकले आणि त्यांनी बोलताबोलता महत्त्वाची माहिती देऊन टाकली. त्यानंतर मात्र जेव्हा ते जवान सावध झाले, तेव्हा त्यांना भरपूर पैसे देण्याची लालूच दाखवण्यात आली. अनेकदा अशा प्रकारांमध्ये फसलेल्या जवान अथवा अधिकार्‍यांना फार उशिरा वास्तवाची जाणीव होत असते. जेव्हा सुंदर महिला गुप्तहेर एखाद्या जवान किंवा अधिकार्‍याला लक्ष्य करतात आणि त्याला त्यांच्या जाळ्यात फसवतात, तेव्हा संबंधित सेना अधिकारी त्या महिलेच्या सौंदर्यावर इतका भाळलेला असतो की, त्या माध्यमातून महिला गुप्तहेर सर्व माहिती सहज मिळवते.

पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय सध्या या हनी ट्रॅपचा वारंवार वापर करताना आढळून येत आहे. त्यासाठी भारतीय भूदल, वायुदल आणि नौदलाशी संबंधित अधिकार्‍यांशी ते संपर्क साधण्याचा प्रयत्न करून त्यांना हनी ट्रॅपच्या माध्यमातून फसवण्याचा प्रयत्न करत असतात.

आजवरच्या घटना पाहिल्या, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सैन्यदलाशी संबंधित लोकांना फसवण्याचा प्रयत्न झालेला आहे. कारण सोशल मीडियातून संपर्कात येणारी व्यक्ती स्त्रीच असतेे हे निश्चितपणे सांगता येत नाही, अनेकदा स्त्रीचा प्रोफाईल बनवून पुरुषदेखील संपर्क ठेवू शकतो. अनेकदा सैन्यदलाशी जोडलेल्या अधिकार्‍यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मोबाईल नंबरचे आदानप्रदानही केले जाते. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅपद्वारे चॅटिंग सुरू होते. अशाप्रकारे चॅटिंगच्या माध्यमातून मग अंतर्गत महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटो, दस्तऐवज पाठवले जातात. त्यानंतर मात्र त्याच माहितीचा संबंधित अधिकार्‍याला ब्लॅकमेल करण्यासाठी वापर केला जातो, काही घटनांमध्ये दिसून आले आहे की, महिला गुप्तहेर स्वत:ला युरोप देशातील किंवा अमेरिकेतील नागरिक सांगतात. अनेकदा महिला गुप्तहेर स्वत:ला सैन्य दलाशी संबंधित एखाद्या मॅगझिन किंवा वर्तमानपत्राचे पत्रकार म्हणूनही दाखवतात. त्यातून ते थोड्याशा माहितीच्या बदल्यात मोठी रक्कम देण्याचा वायदा करून सैन्य दलातील गुप्त ठिकाणांंचे फोटो पाठवण्यासही सांगत असतात.

2016 साली याबाबत भारताची गुप्तहेर संघटना रॉनेही अशाप्रकाराचा पर्दाफाश केला होता. आयएसआयचे अधिकारी फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्वीटर यांचाही याकरता वापर करतात. त्यामाध्यमातून अर्धनग्न फोटो पाठवतात. याकरता आयएसआयने खास सुंदर महिलांची भरती केली आहे. एकदा का सैन्य अधिकारी किंवा जवान या हनी ट्रॅपमध्ये फसला की, त्याला पैशाच्या आमिषेपासून ते शरीरसंबंध करण्याचीही ऑफर केली जाते. 2015 सालीही अशाच एका घटनेत वायुसेनेचे एअरमॅन रंजीत केके यांना अटक करण्यात आली होती. ज्यांनी वायुसेनेची संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या महिला गुप्तहेराला हनी ट्रॅपच्या माध्यमातून पुरवली होती. विशेष म्हणजे या प्रकरणातील सगळा खेळ कोलंबो येथील पाकिस्तानी दुतावासात तैनात एका कर्नलच्या इशार्‍यावरून खेळण्यात येत होता. ज्याला महमूद अख्तर हा रिपोर्ट करायचा. या प्रकरणाचे अनेक धक्कादायक कंगोरे बाहेर पडले होते.

विशेष म्हणजे हनी ट्रॅपचा वापर भारताविरोधात केवळ पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय हीच नव्हे, तर आयएसआयएस ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादी संघटनाही करत आहे. 2016 मध्ये गुजरातमधील कच्छ भागातून आयएसआयएसच्या दोन एजंटला अटक करण्यात आली होती. त्यांतील एकाचे नाव अलाना समा आणि दुसर्‍याचे शकूर सुमरा असे होते. गुजरात एटीएसने त्यांची चौकशी केली असता हनी ट्रॅपचा प्रकार उघडकीस आला. अलाना समा नावाचा व्यक्ती पाकिस्तानातील एका मुलीच्या प्रेमात वेडा झाल्याचे समोर आले. त्या मुलीशी 2014 साली त्याचा संपर्क झाला होता. त्यानंतर त्याने त्या मुलीसोबत पाकिस्तानात चार दौरे केले होते.

त्याचवेळी तो आयएसआयएसशी संपर्कात आला आणि त्यांच्यासाठी एजंट म्हणून काम करू लागला. त्यानंतर त्याने भारतीय सैन्यदलाशी संबंधित काही ठिकाणांचे आणि सैन्य दलाच्या हालचालींची माहिती देणारे फोटोही वारंवार पाकिस्तानात बसलेल्यांना पाठवू लागला होता. त्या बदल्यात त्याला आयएसआयएसकडून जी रक्कम मिळायची तो ती स्वत:साठी न घेता हनी ट्रॅपमध्ये अडकवलेल्या रजिया नावाच्या मुलीच्या नावे पाकिस्तानात पाठवायचा. या रजियाला अशाप्रकारे आयएसआयएसनेच प्लान्ट केले होते. हनी ट्रॅप हा विषय आता भारतीय सैन्यदलासाठी आव्हान बनला आहे. पाकिस्तान अनैतिकतेच्या माध्यमातून भारतीय जवानांना जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करत आहे. सैन्यदलाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -