‘सकाळी सात’च्या आत घरात…पण

Mumbai
संपादकीय

सपनों का शहर मुंबई, कहते है, ये शहर कभी सोता नही, वीस वर्षांपूर्वी आलेल्या ‘सत्या’ चित्रपटाची सुरुवात सूत्रधाराच्या या वाक्याने होते. या मुंबई स्वप्ननगरीत मुंबईकरांकडून पाहिली जाणारी स्वप्ने ही बहुतांशी दिवास्वप्नेच असावीत, ती पूर्ण करण्यासाठी सामान्य मुंबईकर घड्याळाच्या काट्यावर धावत असतो. झोपेत पडणार्‍या स्वप्नांसाठी मुंबईकरांसाठी वेळ असतोच कुठे? मुंबई उपनगरातल्या एखाद्या स्टेशनवर सकाळी ८.३५ ची एखादी लोकल…बँक, खासगी कंपन्या, सेवा क्षेत्रात काम करणार्‍या पगारदार सामान्य मुंबईकराची रोज वाट पाहत असते. हा सामान्य मुंबईकर बॅकऑफिस, बँकेत, खासगी किंवा एखाद्या सेवा क्षेत्रात कामाला असतो. एखाद्या छोट्या मोठ्या संस्थेतही काम करणारे लाखो मुंबईकर स्टेशनवरून सकाळची लोकल पकडून दक्षिण मुंबईकडे धावत असतातच. या अशा मुंबईकरांना मुंबईत राहण्यासाठी आवश्यक त्या नागरी सुविधाही मिळवाव्या लागतात, त्यासाठी कर भरावा लागतो. कमी वेतनमान असलेला कामगार, श्रमिक असा जुना मुंबईकर बहुतांशी एसआरए योजनेच्या घरांमध्ये सामावलेला असतो. याशिवाय मुंबईत नव्या घराचे स्वप्न पाहणार्‍या जुन्या रहिवाशांमधील काही मुंबईकरांना इमारत पुनर्विकासात ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये स्थलांतरीत होऊनही बरीच वर्षे उलटून गेलेली असतात. मुंबईतच स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणारे, स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी, निम किंवा सरकारी कर्मचारीही मुंबईच्या उपनगरात असतात.जुन्या जाणत्या मुंबई उपनगरकरांची अशी परिस्थिती असताना मुंबईतून दूर फेकले गेलेल्या अत्यल्प आर्थिक गटातील मूळ मुंबईकरांनी वसई-विरार, नालासोपारा आणि मध्य रेल्वेच्या कल्याण-डोंबिवलीला जवळ केलेले असते. त्याहून पुढे टिटवाळा, कसारा आणि बदलापूर, कर्जतपर्यंतही स्वतःच्या मालकीच्या घरांच्या स्वप्नाने मुंबईकरांना नेलेले असते. संध्याकाळी आणि रात्री उशिरापर्यंत मुंबई जागी असते. त्यामुळे मुंबईच्या चर्चगेट किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ठाण्याकडे निघालेल्या लोकल्स रात्रीही भरलेल्या असतात. अशी ही लोकलट्रेनमधून डुलक्या न घेता परतणारी मुंबई रात्रीच्या वेळेत आता पूर्णपणे चक्क जागी राहणार आहे. मुंबईतल्या ‘नाईटलाईफ’ला अधिकृत मान्यता देण्याविषयी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पावले उचलली आहेत. मात्र, याचा सर्वात मोठा परिणाम मुंबईच्या सुरक्षा यंत्रणेवर पडणार आहे. पोलीस, अग्निशमन दल किंवा आपत्काळातील सेवांवर पडणारा ताण, याचा त्याआधी अभ्यास व्हायलाच हवा. आपल्या रोजीरोटीसाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत किंबहुना रात्री उशिरापर्यंत स्वतःला कामाच्या हवाली करणार्‍या मुंबईकरांसाठी नाईटलाईफमुळे थोडी मनाजोगत्या जगण्याची ‘स्पेस’ मिळेल, हे खरेच. यात सेवा क्षेत्रात रात्री उशिरापर्यंत काम करणारे कर्मचारी, पत्रकारिता किंवा माध्यमक्षेत्रात काम करणार्‍यांची संख्या मोठी आहे. सेवेला वेळेचे बंधन नसल्यामुळे या नाईटलाईफचा अशा कर्मचार्‍यांना लाभच होणार आहे. रात्री उशिरा कामावरून सुटल्यावर मुंबईत अगदी दादरसारख्या मध्यवर्ती भागातही रात्रीच्या जेवणासाठी हॉटेल शोधावे लागते. त्यावेळी चायनीस किंवा भुर्जीपावच्या मोजक्या ठिकाणच्या गाड्याच रात्रीच्या वेळेत उपलब्ध असतात. रात्री उशिरापर्यंत सेवा क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी नाईटलाईफची मुंबई सोयीची ठरणार आहे. परंतु मुंबई पोलिसांच्या बलाच्या उपलब्धतेचा विचार करता या नाईटलाईफचा ताण त्यांच्यावरच सर्वाधिक पडणार आहे. रात्रीच्या वेळी बिनतारी पोलीस यंत्रणेवर या ‘रात्रीच्या जागणार्‍या’ मुंबईचा अधिकृत ताण पडणार आहे. मुंबईत तसेही रात्री अपरात्रीही जीवाची मुंबई केली जाते. मुंबईतील गर्दीची रेल्वेस्थानके, बस स्टँड किंवा हॉस्पिटल परिसरातही वर्दळ कायम असते. जे.जे. हॉस्पिटल, सायनचे लोकमान्य टिळक रुग्णालय, केईएम हॉस्पिटल परिसरातील अल्पोपहाराची दुकाने खुलीच असतात. मुंबईत दिवस रात्र सुरू असणारी काही मेडिकल स्टोअर्सही आहेतच. अनेकदा रात्री अपरात्री मुंबईतल्या रस्त्यांवर वावरणार्‍या संशयितांना पोलिसांकडून हटकले जाते. रस्त्यावर गर्दी नसल्यामुळे अशी मंडळी पोलिसांच्या नजरेतून सुटत नाहीत. निर्जन रस्त्यावरील संशयितांना शोधणे त्यामुळेच सोपे जाते, रात्रीच्या मुंबईत ही नाईटलाईफची गर्दी झाल्यास अशा संशयितांना त्यातून शोधणे पोलिसांना अवघड जाणार आहे. दुसरीकडे मुंबईत ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हची प्रकरणेही अधूनमधून समोर येत असतात. मुंबईतील रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली मदिरागृहे ही भांडण तंट्यामुळे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असतानाच विविध घटनांच्या तपासाच्या दृष्टीनेही महत्त्वाची असतात. रात्रीच्या वेळेत अशा ठिकाणच्या जवळपासच असामाजिक घटकांचा वावर अनेकदा आढळतो. नाईटलाईफमुळे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मदिरागृहांमधली बेकायदा गर्दीही वाढण्याचा धोका आहे. हा निर्णय तरुणाईला समोर ठेवून घेतला गेल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे ‘संध्याकाळी सातच्या आत घरात’ ही संकल्पना आता अडगळीत पडून ‘सकाळी सातच्या आत घरात’ अशी नवी संकल्पना यातून तयार होईल. रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरापर्यंत झोपण्याची सवय मुंबईकरांना मुंबईतील धावपळीने अंगवळणी पाडली आहे. या नाईटलाईफने त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. आपल्या कामाच्या व्यग्र दिनक्रमातून पर्सनल आणि सोशल लाईफसाठी नाईटलाईफ सोयीस्कर ठरणार आहे. आर्थिक मंदीच्या काळात नोकरी टिकवण्यासाठी संबंधित संस्थेसाठी स्वतःला झोकून देणार्‍या सामान्य मुंबईकरांसाठी या नाईटलाईफचाच दिवस ठरणार आहे. शिवाय रोजगाराच्या दृष्टीनेही काही लाभ संभावतील. या सकारात्मक बाबी असल्या तरी येत्या २६ जानेवारीपासून नाईटलाईफ सुरू करण्याचा निर्णय कमालीचा घाईचा ठरेल. राज्याच्या गृहमंत्र्यांनीही तसे संकेत दिले आहेत. मुंबईतील अनिवासी भागातील सर्व थिएटर्स, मॉल्स, रेस्ट्रॉरंट २४ तास खुली ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. यानुसार मुंबईतील उच्चभ्रू मानल्या जाणार्‍या नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल, कमला मिल अशा भागात हे नाईट लाईफ अनुभवता येणार आहे. मंत्रिमंडळातील इतर सदस्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या या निर्णयाचे स्वागत केले असले तरी या निर्णयाशी संबंधित खात्यांच्या मंत्री किंवा प्रमुखांसोबत याबाबत चर्चाच झाली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मत व्यक्त करताना जे मुद्दे मांडले ते महत्त्वाचे आहेत. सद्य स्थितीत मुंबई पोलीस १२ ते १४ तास रोज काम करत आहेत. नाईटलाईफमुळे आवश्यक सुरक्षा यंत्रणा अद्यापही पुरेशी तयार नाही. यासाठी संबंधित सर्वच यंत्रणा आणि खात्यांचाही या निर्णयाच्या परिणामांबाबत विचार केला जाईल. हा आढावा घेणे २६ जानेवारीपर्यंत शक्य नाही. त्यामुळे तूर्तास हा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. येत्या २२ जानेवारीला होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार असून त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता देशमुख यांनी वर्तवली.नाईटलाईफ सुरू करण्याच्या निर्णयासोबत नियमही येतीलच. मात्र, त्यांची अंमलबजावणी कितपत होईल, हा प्रश्न आहेच. मुंबईत ऑर्केस्ट्रा बारच्या नावाने चालवल्या जाणार्‍या लेडीज बारवर छापे पडल्याच्या बातम्या नव्या नाहीत. पब्ज, बार, मॉल खुले ठेवल्यानंतर खाद्यविक्रीचा सामान्य व्यावसाय करणार्‍या वडापावच्या गाड्या, भेळ, चहाची दुकाने, छोटी कार्यालये, इतर उद्योगही सुरू ठेवण्याबाबतही संबंधितांकडून मागणी होईल, टॅक्सी, रिक्षा, बसेस या सेवांबाबतही धोरण निश्चित करावे लागेल. रात्री डुलक्या घेणार्‍या मुंबईला टक्क जागे ठेवताना या स्वप्ननगरीच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल…