सोशल मीडियावरील शिक्षण!

Mumbai

सोशल मीडियामुळे आजच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याद्वारे एक वेगळी आणि विस्तृत देवाणघेवाणीची संस्कृती उदयास येत आहे आणि तीच संस्कृती आजच्या युवकांत रुजू पाहत आहे. कालपर्यंत वाचन कमी करत असणारी पिढी.. असा आपण ज्यांचा उल्लेख करायचो, किंवा काही प्रमाणात करतो.. तेच युवक आज सांगतात की आम्ही फक्त चॅटिंग किंवा टाईमपाससाठी सोशल मीडियाचा वापर करत नाही, तर आमच्या शैक्षणिक कामासाठीसुद्धा त्याचा वापर करतो.

सोशल मीडियाद्वारे उदयाला आलेला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक माहिती पुरवणारा व रोजगार मिळवणारा गट…हा गट आजघडीला कोणतीही गोष्ट सहजपणे उपलब्ध करून देत आहे. वाटेल तेव्हा, वाटेल तिथं हवी असणारी माहिती आपण आज मिळवू शकतो. हे सर्व शक्य होत आहे इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे…. कोणत्याही गोष्टीचा योग्य असा वापर करून घेतला तर त्यातून फायदा होत असतो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जसजशी क्रांती होत आहे अगदी त्याच प्रमाणात सोशल मीडिया एक नवा ग्राहक शोधत असतो आणि त्याला विद्यार्थी हा ग्राहक म्हणून मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे आजच्या कोचिंग क्लासेसच्या युगात क्लासची फी न भरू शकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मोफत क्लासेसची सुविधा वेगवेगळे अ‍ॅप्स देत आहेत. कोणत्याही समस्येचं उत्तर मिळवण्यासाठी गुगलचा वापर होतोय. एकूणच माहितीचा खजिना सोशल मीडियाद्वारे प्रत्येकांच्या हातात आहे.

खरे पाहता काही बाबतीत सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. सोशल मीडियामुळे आजच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याद्वारे एक वेगळी आणि विस्तृत देवाणघेवाणीची संस्कृती उदयास येत आहे आणि तीच संस्कृती आजच्या युवकांत रुजू पाहत आहे. कालपर्यंत वाचन कमी करत असणारी पिढी.. असा आपण ज्यांचा उल्लेख करायचो किंवा काही प्रमाणात करतो.. तेच युवक आज सांगतात की आम्ही फक्त चॅटिंग किंवा टाईमपाससाठी सोशल मीडियाचा वापर करत नाही, तर आमच्या शैक्षणिक कामासाठीसुद्धा त्याचा वापर करतो.(?) आपण बघत आहोत की ज्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी वाचता येत नाही. त्या अंध मुलांसाठी वेगळ्या अ‍ॅप्सद्वारे ऑडिओ बुक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सोबतच अशी अनेक पुस्तकं आहेत जी महाग असतात ती पुस्तकं सवलतीच्या दरात काही विशेष अ‍ॅप्सवर सहजपणे डाऊनलोड करता येतात. एक प्रकारे ही सर्व बदलाची नवी वाट आहे. आजपासून काही वर्षांपूर्वी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी एका विषयाची किमान दोन ते तीन पुस्तके वाचत असत. संदर्भग्रंथ शोधले जात असत, पण आज यासाठी गुगल आहे. गुगल वर दोन अक्षरं जरी टाईप केली तरी त्या विषयाच्या संदर्भातील फोटो, लेख, पुस्तक, व्हिडिओ हजारोंच्या संख्येने उपलब्ध आहेत आणि ते पण काही क्षणात आपल्यासमोर हजर…… (अर्थात यामुळे अवलंबित्व वाढत आहे हे तितकेच खरे….)

सोशल मीडियाच्या संदर्भात दोन संकल्पना समोर येत आहेत. त्यामध्ये Before social media आणि After social media… आजच्या आफ्टर सोशल मीडिया पिढीसाठी शिक्षण (वापरापूर्वी आणि नंतरही…) सोशल मीडियावरच आहे. आणि पुस्तकांच्या चौकटीबाहेर ज्ञान आहे. ते घ्यायला हवे असा समज जास्तीत जास्त प्रमाणात वाढतोय. केजीपासून पीजीपर्यंत, पीएचडी किंवा नंतरही शिक्षण घेणार्‍यांसाठी त्यांच्या अभ्यासासाठी सोशल मीडियाने अनेक मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. प्राथमिक शाळेतील, नर्सरीतील मुलांना शाळेबद्दल एकूणच शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळे अ‍ॅप्स तयार करण्यात आले आहेत. त्याद्वारे अतिशय रंजक पद्धतीने अभ्यासक्रम शिकवला जातो. लहान मुलांसाठी कार्टूनचा वापर करून, त्यांचे वेगळ्या प्रकारचे संभाषण एकवून… व्हिडिओ स्वरूपात गोष्टी दाखवून.. मनोरंजनासोबत आजचे अ‍ॅप्स नैतिकता आणि मूल्यांची शिकवण रुजावी याकडेही लक्ष देत आहेत. एकूणच आचार-विचार, संभाषणकौशल्य व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणार्‍या सर्व बाबींचे मार्केटिंग सोशल मीडियाद्वारे होत आहे आणि ग्राहक डोळे झाकून त्याचा स्वीकार करत आहेत. कामात व्यस्त असणार्‍या पालकांसाठी तर या काही अ‍ॅप्सचा, यूट्यूब चॅनेलचा मोठा आधार मिळतोय. हे सर्वेक्षणाअंती सिद्ध झालं आहे.

युवकांचा सर्वात मोठा गट हा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दिसतो आहे. एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन या आणि अशा इतर परीक्षांची तयारी करणारे… अभ्यासासाठी सध्या डिजिटल गोष्टींवर भर देतायत. ऐतिहासिक संदर्भ, विज्ञान क्षेत्रातील प्रगती, चालू घडामोडी, भूगोलाचा अभ्यास या सर्वांची माहिती पुरवणारे एकूणच त्याचे विश्लेषण करणारे अनेक व्हिडिओ हा वर्ग शोधत असतो आणि सर्च इंजिन ही सर्व माहिती त्यातील तज्ज्ञांना पुरवत असते. त्याद्वारे त्या क्षेत्रातील अभ्यासकांना माहिती देण्यासाठी परावृत्त केले जाते. त्याचे दोन फायदे आहेत पहिला म्हणजे अभ्यासाचे साहित्य उपलब्ध होते आणि ज्या लोकांनी त्या संदर्भात माहिती देण्याचं काम केलं आहे, व्हिडिओ उपलब्ध करून दिले आहेत त्यांना रोजगार मिळतो. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा कल हा डिजिटल स्टडी करण्याकडे वाढतो आहे. यातूनच सोशल मीडिया एज्युकेशनल हब ही संकल्पना समोर येत आहे.

वर उल्लेख केला त्या सर्व सकारात्मक गोष्टी जरी सोशल मीडियाद्वारे घडून येत असल्या..तरी याची एक दुसरी बाजू पाहायला मिळते. ती म्हणजे या सर्व गोष्टींचा भडीमार… एकाच वेळी एका अभ्यास विषयासाठी उपलब्ध असणार्‍या विविध वेबसाईट्स, ऑनलाइन लेक्चर सोबतचे हजारो लेख, व्हिडिओ यामध्ये अभ्यासकांची वेगवेगळी मते विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण करतात. यामध्ये कोणते सत्य याचा संभ्रम निर्माण होतो. माहिती मिळते पण ज्ञान मिळते का..? पुस्तक डाउनलोड करण्याची संख्या वाढत आहे, पण ते वाचलं जातं का…? या सर्व गोष्टी तपासणे गरजेचे आहे. फक्त संग्रहासाठी आणि शेअर करण्यासाठी विविध शैक्षणिक अ‍ॅप्स मोबाईलमध्ये दिसत आहेत. हे नाकारून चालणार नाही…. यामध्ये अलीकडे आणखी एक मोठी समस्या उभी राहिली आहे. ती म्हणजे स्मार्टफोनचा वापर करून, परीक्षा सुरू असताना प्रश्नपत्रिका परीक्षा कक्षाबाहेर पाठवणे. त्याद्वारे कॉपी करणे. हे सर्व पर्यवेक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्या परीक्षार्थ्यावर गुन्हा नोंदवला जातो. त्यानंतर पुन्हा त्या विषयाचा पेपर घ्यावा लागतो. नवीन यंत्रणा राबवावी लागते. जे विद्यार्थी अभ्यास करून परीक्षेला सामोरे जातात त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. स्मार्ट वापराबरोबरच त्याचा स्मार्ट दुरुपयोग करणारा वापरकर्ता दिसत आहे. यालासुद्धा आळा बसला पाहिजे. शाळेपासून मुलांना मोबाईलद्वारे शिक्षण दिलं गेलं तर त्याच्या अतिवापरामुळे मानसिक ताणतणाव वाढून आरोग्य धोक्यात येऊ शकतं. याचा परिणाम घातक आहे. तेच युवकांच्या बाबतीत होताना दिसतं. अखेर कोणत्याही गोष्टींचा अतिवापर शारीरिक, आणि मानसिक आरोग्यासाठी वाईटच असतो. अखेर सोशल मीडियाद्वारे सर्वच क्षेत्रातील माहिती मिळत आहे. या सर्वांची सत्यता तपासणे तितकेच महत्त्वाचे.

धम्मपाल जाधव