घरफिचर्सशेतीत पुन्हा रंग भरायला हवेत

शेतीत पुन्हा रंग भरायला हवेत

Subscribe

जुनी एक म्हण आहे. ‘पेराल ते खाल.’ पण आज शेतीत अशा गोष्टी पेरल्या जातात ज्या खाता येत नाहीत. आपल्या खाण्यातसुद्धा अशा गोष्टी आल्या आहेत ज्या आपण पेरत नाहीत. यातून एक खूप मोठे परावलंबन आलं आहे. हे परावलंबन निराशेचे खूप मोठे कारण आहे. कृषकजीवनातील ही रुखरुख आणि उदासीनता घालवायची असेल तर शेतीत परत बहुविध पिकांचे रंग भरायला हवेत.

खूप दिवसांनी गावी गेलो. गावी गेल्यावर शेताकडं जात नाही असं कधी होत नाही. याहीवेळी शेताकडे जाण्यास निघालो. घरातील कोणीही शेतात येण्यास उत्सुक नव्हते. मीही जाऊ नये, असं त्याचं मत होत. त्यामुळं शेतात न जाण्याचा आग्रह धरत होते. हे असं पहिल्यांदाच होत होतं. कारण या आधी शेतात जायचं म्हटलं तर घरातील एकदोन जण तरी तयार असायचे. या उदासपणाचे व नकाराचे अर्थ मला नीटसे कळले नाही. याबाबत मी फारसा विचारही केला नाही. माझी उत्सुकता, शेतीकडे जाण्याची ओढ कायम होती. ‘एकला चलो’ म्हणत मी निघालो. शेती तीच होती. रस्ता तोच होता.

वाटेतली प्रमुख ठिकाणं तीच होती. मात्र, मला सगळं नवं नवं वाटत होतं. हे नुसतं नवं नव्हतं तर त्यात खूप फरक जाणवत होता. सगळंच नवीन. पर्यावरण क्षेत्रात काम करीत असल्यानं छोटी मोठी गवतं, वनस्पती, फुलं, किडे मुंगी पाहत शेत जवळ करीत होतो. घरचे शेतीत जाण्यास का उदासीन होते, ते आता थोडं थोडं उमगत होतं. शेतीकडे जावं असं शेत शिवारात विशेष काही दिसत नव्हतं. शेत शिवारातील रानमेवा नाहीत इतक्या प्रमाणात कमी झाली होती. ज्या बांधावर एके काळी आठ दहा जनावरे चारायची त्या बांधावर चालणे अवघड होते. बांधावरील अमोन्या कामोन्या तर दूर दूर पर्यंत दिसत नव्हती.लहानपणी शाळा सुटली की शेताकडे धावायचो. मामाच्या गावाला गेलं तरी मामासोबत शेतात पळायचं. लहान मोठ्या सगळ्याच मुलांना शेतात जाण्याची ओढ असायची. गावाची वस्ती ओलांडली, शिवार सुरु झालं की हातातोंडाचं भांडण सुरु व्हायचं. गावाच्या वस्तीलगतच गुच्छात लागलेल्या कामोन्या खायचं. ते संपतात न संपतात गोटीच्या आकाराचे, गुच्छात डोरली टमाटे लगडलेली असायचे. आंबट डोरली टमाटे खाऊन कधी कधी पोट भरायचे. थोडं पुढं गेल्यावर विहिरी शेजारी, ओढ्या शेजारी उंबराच्या झाडाला भरभरून उंबर तयारच असायचे. काही उंबर फोडून फुक मारून तर काही तसेच अख्खे पस्त करायचे. उंबर फोडून बघितलं की त्यात किडे तयार होतात असं आजीकडून ऐकलेलं असल्यानं बरेचजण अख्खेच उंबर खायचो. उंबर खाऊन झालं की विहिरीत किंवा ओढ्यात पाणी पिऊन पुढील रस्ता पकडायचं.
ओढ्याच्या कडेनं असलेल्या सीताफळाच्या झुडूपातून डोळे आलेली दहाबारा सीताफळं तोडून तिथेच जवळपास गवतामध्ये ठेवायचे. आधी पिकत घातलेली सीताफळं चाचपून बघायचं. पिकलेले दोनचार सीताफळं सोबत घेऊन थेट शेतामध्ये. घरचेही असं कोणी आलं की काम सोडून थोडं विश्रांतीला यायची. एक दोन सीताफळं खाऊन पुन्हा सर्वजण कामाला लागत असू.

- Advertisement -

शेतातील कामाचा कंटाळा अजिबातच यायचा नाही का? तर असे नव्हते. कंटाळाही यायचा. पण शेताच्या अवतीभवती असलेल्या रानमेव्यामुळं हा कंटाळा कधीच जाणवायचा नाही. जाणवला तरी त्याची तीव्रता तितकी नसायची. बारकी मोठी जांभळं, करवंद, सार्वजनिक ठिकाणचे गावठी आंबे, अमोन्या-कामोन्या, कारे, बोरं, चारं, बिबे, सीताफळ, चिंच, बेहडा किंवा घोटफळ, टेंबरून, ही यादी सहज पन्नासीचा आकडा गाठेल. कोणत्याही हंगामात यापैकी पाच-सहा प्रकार नाहीत असे कधी होत नाही.अमोन्या-कामोन्या नुकत्याच संपल्या आहेत. कारे-बोरे अजून पिकली नाहीत. बिबे अजून यायची आहेत. अशा वेळी प्रत्येक शेताच्या बांधालगत एक ‘पाट’ हमखास असायचाच. पाट म्हणजे ओळी. पेरणी करताना पहिल्यांदा दहा-बारा प्रकारचं मिश्र धान्य बांधाला पेरलेल असायचं. मका, ज्वारी, चवळी, भेंडी, काकडी, शेलनी (काकडीवर्गीय एक प्रकार), वाळूक, दोडका, गिलके/चोपड/घोसावळे, कारले, भादली (तृणधान्य), राळा, तूर, मुग, उडीद, कारळ, तीळ, अंबाडी असे धान्य असायचे. ही सर्व धान्य एकत्रितपणे मिसळवून शेतीमध्ये एका बांधाच्या कडेला तिफणीने दोन ओळी पेरल्या जातात. त्यालाच मिश्र पाटा म्हटले जाते.

यातील काही पिके उंच वाढणारी असतात, तर काही मध्यम आकाराची. काही वेली या उंच पिकाच्या सहाय्याने वर जाणारी असतात. त्यामुळे या सर्व धान्यांचा एक चांगला मिलाप या मिश्र पाट्यात असते. या पाट्यातील पिके पेरणीनंतर दोन महिन्यांत खाण्यास किंवा काढणीस येण्यास सुरुवात होऊन शेतीमध्ये ओलावा असेपर्यंत येत असतात. यामध्ये काही कच्च्या स्वरुपात लगेच खाण्यासाठी उपयुक्त असतात. उदा. काकडी, वाळूक, भेंडी, मुग-तुरीच्या शेंगा, शेलनी. काही रोजच्या जेवणातील भाजीसाठी उपयुक्त असतात.दिवस मावळतीला गेलं, घरी निघायच्या अर्धा तास आधी पाट्यातील कारली, भेंडी, दोडका, भोपळा, कारळाची कोवळी पाने यापैकी जे तयार आहे ते भाजीसाठी निवडलं जायचं. पाट्याची उपयुक्तता घरातील माणसांना तसेच जनावरांनाही असायचंच. पाट्यातील ज्वारी ही जनावरांच्या चार्‍यासाठीच असायची. त्याला बाटूक असं म्हटले जाते. ज्वारी मधील पापडी वालाची वेल ज्वारीसोबत कापून जनावरांना खायला दिली जायची. यांनी जनावरं खूश व्हायची. पोरं सोरं खाऊन झालं, भाजीपाला झालं, जनावरांचा चारा झालं मग उरलेलं पीक आलं की आजी किंवा आई त्यातील पुढील वर्षाचं बियाणं काढून ठेवत असे. उरलेलं बाजारात विकलं जायचं. असा पाटा बहुतेकांच्या शेतात असायचाच. पाटा नाही असं शेतं खूप कमी असायची. त्यामुळे घरातील लोकांना शेतीकडे जायला कारणे लागत नसत. शेतीकडे जायचा कंटाळा खूप कमी असायचं. याचं खूप मोठं कारण म्हणजे शेताभोवती असलेली रानमेवा व पाट्यातील मेवा.आज शेतीत कोणती पिकं आहेत? एका लग्नाच्या निमित्ताने जमलेल्या काही नातेवाईक यांच्याशी चर्चा केली. सहा ते सात लोकांशी बोलून झाले. दोन एकरपासून २० एकर शेती असणार्‍या सहा-सात लोकं मिळून सुद्धा सहा सात प्रकारची पिकं घेत नाहीत. कापूस, सोयाबीन, काही प्रमाणात तूर ही पिकं त्यांच्या शेतात आहेत. ज्यांना पाण्याची सोय आहे ते भात पिकवतात.

- Advertisement -

जवस, राळा, मोहरी, लाखोली, वाटणा, वाळूक या पिकांचे नावे फक्त त्यांच्या स्मृतीत आहेत. शेतात मात्र दोन तीन फक्त प्रकारचीच पिके. ही पिकं का सोडली? कोणी सोडली? अनेकांकडे याची उत्तरं नाहीत. काहींनी त्या पिकाच्या मशागतीत खूप कष्ट आहेत म्हणून सोडलं असे सांगितले. तर काहींनी बाजारातील किमतीचा मुद्दा सांगितला. हे सर्व सांगताना मात्र जवसाची चटणी, राळ्याचा भात, लाखोळीच्या वड्या हे किती रुचकर असायच्या. किती आणि कसे आवडीने त्या त्या धान्याचे ते ते पदार्थ ते खायचे हे न विसरता सांगितले. दोन-तीन पिके असतील तर काढणीसाठी प्रत्येकाला वेगवेगळी वेळ द्यायची गरज नाही. एकच धान्य मोठ्या प्रमाणात निघालं तर बाजारात नेणे सोयीचे होईल. ही अशी सगळी कारणे समोर येतात.

एकसुरी पीक पद्धतीतून संपूर्ण शिवाराला एक रुखरुखपणा येतो. शेतात असलेली जवळपास सर्व पिके कॅशक्रॉप असल्याने त्यातून खाण्यासाठी काही मिळत नाहीत. अलीकडे तननाशक मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. त्यातून शेतीमधील मुख्य पिकासोबत येणार्‍या कैक वनस्पती मुळासकट नाहीशा होत आहेत. शेतात खुरपणी करून झाल्यावर त्यातील बर्‍याच वनस्पती खुरपणी करणारे भाज्या म्हणून घरी घेऊन जात असत. भाजी करून झाल्यावर उरले तरी त्या वाळवून उन्हाळ्याची सोय केली जायची. काही वनस्पती हे भाज्याही नाहीत व पीकही नाहीत मात्र त्या राखल्या जायच्या. जसे दगडी पाला. शेतीकाम करीत असताना हाताला कापले गेले तर लगेच दगडीपाला किंवा जखमजोडी चोळली की रक्त थांबायचे. मात्र तणनाशकांच्या वापरानंतर शेतीतला फक्त एकच रंग उरला आहे. माझ्या लहानपणीची शेती ही बहुरंगी होती. त्यातूनच माझ्याही जीवनात अनेक रंग आले होते. आज शेती आणि शेती करणार्‍यांचे जीवन रंगहीन बनत चालले आहे. दरवर्षी शेतीतून बाहेर पडणार्‍यांची संख्या वाढत आहे. मुग, उडीद, गहू, ज्वारी व बाजरीचा या अन्नधान्य पिकाकडून कापूस, ऊस, सोयाबीन ही पिके निवडण्याचे प्रमाण वाढत आहे. सर्वात जास्त सोयबीन पिकविणार्‍या राज्याच्या यादीत महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

ही पिके घेताना त्या पिकांना पाणी किती लगते. आपली शेती कोणती आहे. आपल्या कुटुंबाला खाण्यासाठी पुढील वर्षभर काय काय लागणार आहे? या कोणत्याच गोष्टीचा विचार केला जात नाही. या शेतीमधील पीक पद्धतीच्या बदलाची अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण मिळणारे बाजारभाव हे आहे. वरवर पाहता शेतीत काय पेरायचे हे निर्णय शेतकरी स्वतः घेतो असे दिसते. मात्र या प्रश्नाच्या मुळाशी गेलो तर खूप मोठे षड्यंत्र किंवा मार्केटतंत्र या निर्णयाच्या पाठीमागे असल्याचे दिसते. पिकासोबतच वेगवेगळ्या रानभाज्या सुद्धा शेतीत डोलायला हवेत. या भाज्या व बहुविध रंगाची पिके आणि बांधावरील व गावशिवारातील रानमेवा हे आपले पोषणमूल्य वाढवतील. आपले जीवन रंगीत होईल.
बसवंत विठाबाई बाबाराव
प्रकल्प समन्वयक, पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -