गँग्ज ऑफ मीडिया

देशात सध्या कोरोनासारखा जीवनमरणाचा गंभीर प्रश्न आ वासून उभा असताना भारतीय माध्यमे मात्र वास्तवापासून दूर जाऊन वेगळ्याच प्रश्नात लोकांना व्यस्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या वर्तमानपत्र घराघरात पोहोचत नाहीयेत. याचा व्यावसायिक फायदा निश्चितच वृत्तवाहिन्यांना होतोय. मात्र, आपल्या वाचकांना सजग, जागृत विचार देण्याऐवजी वृत्तवाहिन्या त्यांची दिशाभूल करताना दिसत आहेत. याआधीही तुकडे तुकडे गँग, देशद्रोही, पाकिस्तानचे चमचे अशी विशेषणे एका विचारधारेच्या लोकांवर लावण्यात वृत्तवाहिन्यांनी धन्यता मानली होती. यावर्षी कोरोनाचे संक्रमण होत असताना तबलिगी जमातीला याबाबत जबाबदार धरण्यात आले होते. लोकांना खरी बातमी आणि उपाय सुचविण्याऐवजी हल्लीच्या वृत्तवाहिन्या लोकांचा संभ्रम वाढविण्यातच अधिक महारत मिळवत आहेत.

काही वर्षांपूर्वी आलेला अनुराग कश्यपचा ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ चित्रपट आठवतो का? झारखंडमध्ये असलेल्या वासेपूर येथे गुन्हेगारी टोळ्यांचा संघर्ष या चित्रपटात दाखवलेला आहे. टोळीयुद्धासाठी अलीकडच्या काळात गँग्ज ऑफ वासेपूर अशी एक टर्म प्रचलित झाली आहे. हे टोळीयुद्ध प्रत्येक क्षेत्रात दिसून येते. लोकशाहीचा चौथा खांब समजल्या जाणार्‍या माध्यमात देखील हे टोळीयुद्ध आता रंगायला लागले की काय? अशी शंका येते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे वार्तांकन करताना भारतीय वृत्तवाहिन्यांमध्ये गट-तट पडले आहेत. एक गट उघडपणे दुसर्‍या गटाचे नाव घेऊन आरोप करतोय. तर आम्हीच कशा खर्‍या आणि सर्वात आधी ब्रेकिंग बातम्या दिल्या, याचा जाहीर प्रचार देखील करत आहे. राजकीय पक्ष ज्याप्रकारे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात, त्याप्रमाणे या वृत्तवाहिन्या भाष्य करताना दिसतायत. लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य तसेच न्यायपालिका, प्रशासन, कायदे मंडळ आणि माध्यमे यांच्यात लोकशाहीला पूरक असलेली रेषा आता धूसर झाली आहे की काय? अशी शंका येते.

भारतात माध्यमांना एके काळी गौरवशाली परंपरा होती. पारतंत्र्यात असताना इंग्रजांनी भारतात वृत्तपत्रांची मुहुर्तमेढ रोवली. बंगाल प्रांतात १७८० साली ‘द बंगाल गॅझेट’ या इंग्रजी वृत्तपत्राची सुरुवात झाली होती. तर १८३२ साली मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते. पारतंत्र्यात असताना भारतीय माध्यमे लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, स्वातंत्र्याचा अग्नी लोकांमध्ये धगधगता ठेवण्याचे काम करत होते. लोकमान्य टिळकांनी केसरीच्या माध्यमातून इंग्रजांना धारेवर धरले. तर फुलेंच्या दीनबंधूने सामाजिक प्रेरणा देण्याचे काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यासारख्या वृत्तपत्रांमधून दबलेल्या, पिचलेल्या समाजाच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. एकूणच भारतीय पत्रकारिता आणि माध्यमे ही समाजाचं देणं लागत होते. समाजातील पीडितांना न्याय देण्यासाठी आणि शासन, सरकारला जाब विचारण्याची हिंमत त्यांच्यात होती.

१९९० नंतर भारतात खाउजा (खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण) धोरण स्वीकारल्यानंतर ज्याप्रकारे अनेक उद्योग, सेवा क्षेत्रांत बदल झाले. त्याप्रमाणे माध्यमांनीही कूस बदलली. आधी रेडिओ आणि दुरदर्शन पाहणार्‍यांना यापुढे खासगी वाहिन्यांचे दर्शन दिसू लागले. १९९२ मध्ये झी टीव्ही ही पूर्णवेळ खासगी मनोरंजन वाहिनी सुरू झाली होती. तर ३० सप्टेंबर १९९५ रोजी Asianet या वाहिनीवर पहिल्यांदा मल्याळम भाषेत अर्ध्या तासाचे न्यूज बुलेटिन सुरू झाले होते. त्याच वर्षात आज तक, बिझिनेस आज तक, न्यूजस्ट्रॅक, आँखो देखी असे न्यूज बुलेटिनही सुरू झाले. तर पुढच्या काही वर्षात २४ तास पूर्णवेळ बातम्या देणार्‍या वृत्तवाहिन्या सुरू झाल्या होत्या. सुरुवातीच्या वृत्तावाहिन्यांच्या टप्प्यात बातम्या देणे, राजकीय-सामाजिक विषयांवर ज्येष्ठांची मते जाणून घेण्यासारखे कार्यक्रम चालत असत. इंडिया टीव्हीवरील ‘आप की अदालत’ या कार्यक्रम सारखे सडेतोड मुलाखतीचे कार्यक्रम लोकप्रिय झाले होते. त्यावेळी प्रत्येक ताजी बातमी ही ब्रेकिंग न्यूज नसायची. कम्युनिकेशनची मर्यादित साधने असल्यामुळे त्यावेळच्या पत्रकारितेमध्ये आजच्यासारखी घिसाडघाई किंवा धांदल उडालेली दिसत नव्हती.

प्रिंस प्रकरणापासून भारतीय वृत्तवाहिन्यांनी बिंडोकपणाचा कळस गाठण्यास सुरुवात केली. जुलै २००६ मध्ये हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथे एका ६० फूट बोअरवेलमध्ये ५ वर्षांचा प्रिंस पडला होता. या घटनेचे अनेक वृत्तवाहिन्यांनी सलग ५० तास लाईव्ह कव्हरेज दिले होते. सबंध भारतामधून या कव्हरेजला पसंती मिळाली. भारतीय जवानांनी ३० तास बचाव कार्य करून प्रिंसला जिवंत बाहेर काढले होते. आज टीआरपी हा शब्द लोकांच्या तोंडात बसला तो त्या घटनेपासून. लोकांनी प्रिंस वाचण्यासाठी अक्षरशः प्रार्थना करायला सुरुवात केली होती. भावनेचा हा खेळ वृत्तवाहिनीच्या व्यवस्थापनाला कळल्यानंतर अशाच प्रकारच्या बातम्या देण्यामध्ये वृत्तवाहिन्यांची स्पर्धा सुरू झाली. मूळ प्रश्नांपासून फारकत घेऊन लोकांना आवडणार्‍या किंवा लोक पाहत असलेल्या बातम्यांना महत्त्व देण्याचा हा काळ सुरू झाला होता. बातम्यांसाठी तोपर्यंत वर्तमानपत्रांवर अवलंबून असणारा प्रेक्षक हळूहळू वृत्तपत्रांकडून टीव्ही वृत्तवाहिन्यांकडे वळू लागला.

आज भारतीय वृत्तवाहिन्या या जनसामान्यांमध्ये थट्टेचा आणि शिव्यांची लाखोली वाहण्याचा विषय बनलेल्या आहेत. २०१३ साली दिल्लीमधील अण्णा हजारे यांचे आंदोलन कव्हर करण्यापासून माध्यमांच्या वार्तांकनाकडे संशयाने पाहण्यास सुरुवात झाली. त्याआधी देखील अनेक प्रकरणात माध्यमांनी एखादा अजेंडा घेऊन काम केल्याची उदाहरणे दिसत होती. मात्र, त्यावेळी वृत्तवाहिन्यांमध्ये स्पर्धा होती. मात्र, मतभेद नव्हते. एखादी बातमी आपापल्या पद्धतीने कव्हर केली जात होती. मात्र, मागच्या दोन महिन्यांपासून सुशांत प्रकरणात काही वृत्तवाहिन्यांनी ईडी, सीबीआय आणि एनसीबीच्या सोबत आपला स्वतंत्र तपास सुरू केल्याचे दिसत आहे. या तपासाचा निकाल रोज संध्याकाळी प्राईम टाईममध्ये दिला जातो. आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय दिल्याच्या अर्विभावात स्टुडिओतील अँकर तोंडातून वाफेचा मारा सोडत असतो. लोकांना या गोष्टीचा तिटकारा जरूर आला आहे. मात्र, या भंपकपणाचा अद्याप ठळकपणे कुणी विरोध केलेला नाही. सुशांत आत्महत्या प्रकरण आता नव्या दिशेने कलाटणी होताना दिसत आहे. त्यात आज तक या वाहिनीने या प्रकरणातील एक पार्टी रिया चक्रवर्ती हिची मुलाखत घेतली. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत कुणीही माध्यमांसमोर जाऊन आपली बाजू मांडू शकतो. मात्र, रिपब्लिक नावाच्या वाहिनीने स्वतःच निर्णय देत आज तकने देश विरोधी आणि बेकायदेशीर कृत्य केल्याचा भास निर्माण केला आहे.

देशात सध्या कोरोनासारखा जीवनमरणाचा गंभीर प्रश्न आ वासून उभा असताना भारतीय माध्यमे मात्र वास्तवापासून दूर जाऊन वेगळ्याच प्रश्नात लोकांना व्यस्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या वर्तमानपत्र घराघरात पोहोचत नाहीयेत. याचा व्यावसायिक फायदा निश्चितच वृत्तवाहिन्यांना होतोय. मात्र, आपल्या वाचकांना सजग, जागृत विचार देण्याऐवजी वृत्तवाहिन्या त्यांची दिशाभूल करताना दिसत आहेत. याआधीही तुकडे तुकडे गँग, देशद्रोही, पाकिस्तानचे चमचे अशी विशेषणे एका विचारधारेच्या लोकांवर लावण्यात वृत्तवाहिन्यांनी धन्यता मानली होती. यावर्षी कोरोनाचे संक्रमण होत असताना तबलिगी जमातीला याबाबत जबाबदार धरण्यात आले होते. लोकांना खरी बातमी आणि उपाय सुचविण्याऐवजी हल्लीच्या वृत्तवाहिन्या लोकांचा संभ्रम वाढविण्यातच अधिक महारत मिळवत आहेत.

लोकशाहीसाठी ही घातक गोष्ट का आहे? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. माध्यमांमुळेच आतापर्यंत लोकांमधील एका गटाचे प्रश्न लोकांच्या बहुसंख्य गटाला कळत होते. त्यातून मोठा दबाव निर्माण होऊन छोट्या गटांना न्याय मिळत होता. माध्यमांनी एकांगीपणे वार्तांकन केले तर लोकांचे मूळ प्रश्न दाबण्याचा धोका निर्माण होतोय. सोशल मीडिया किंवा इंटरनेटवरील इतर माध्यमे जरी मदतीला असली तरी मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये जी ताकद आणि विश्वासार्हता आहे, ती इतर माध्यमांमध्ये नाही. त्यामुळे माध्यमांनी निष्पक्ष होण्याची गरज आहे. मात्र, व्यावसायिक कारणे, राजकीय पक्षांशी असलेले आर्थिक लागेबांधे यामुळे माध्यमांमध्ये भंपकपणा, बटबटीतपणा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच आजवर एकत्र असलेला हा मीडिया आता एकमेकांवरच तुटून पडल्यामुळे गँग्ज ऑफ वासेपूरसारख्य्या गँग्ज ऑफ मीडियाच्या टोळ्या झाल्याच्या ऐकिवात आल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये.