घरफिचर्सउपयोग असेल तरच मुलगी हवी का?

उपयोग असेल तरच मुलगी हवी का?

Subscribe

प्रजननाच्या उपयुक्ततेसाठी मुलगी वाचली पाहिजे किंवा काही जाहिराती कर्कशपणे ओरडून सांगत असतात, भावाला राखी बांधण्यासाठी बहीण हवी. लग्नासाठी बायको हवी. थोडक्यात स्त्रीची उपयुक्तता सिद्ध झाली तरच तिचं असणं महत्त्वाचं असं सांगणार्‍या या जाहिराती. प्रजनन आणि पोटपूजन या दोन कारणांसाठी तिचा जन्म प्रामुख्याने स्वागतार्ह. मुलगी वाचवाच्या जाहिरातीत ती कधीही घराचं नाव उंचावण्यासाठी, कार्यकर्तृत्वासाठी किंवा नुसती तिची ती कर्तृत्त्वशून्य का होईना एक सर्वसामान्यपणे जगण्यासाठी नकोच असते.

मुलींचा मृत्यूदर रोखण्यासाठी भारतात पतंप्रधानांनी “बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही मोहीम सुरू केली. मुलींचा जन्मदर वाढावा या अनुषंगाने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, मात्र मुलींचा जन्मदर वाढावा किंवा मुलगी वाचवा या अनुषंगाने करण्यात येणार्‍या जाहिराती पाहिल्या की आपला संदेश नेमका का आहे असा प्रश्नच पडतो. मध्यंतरी अशीच एक जाहिरात पाहण्यात आली. त्यातील मजकूर साधारण असा होता की आज “अगर चाहिए आपको रोटी तो मत मारो बेटी’. यातून काय संदेश जाणार म्हणजे मुलगी हवी तर आहे पण कशासाठी? तर भाकर्‍या थापायला! एक अशीच भित्तीचित्रात रेखाटलेली जाहिरात होती- त्यात म्हटलेलं होतं मुलगी वाचेल तर वंशाला दिवा मिळेल.

- Advertisement -

थोडक्यात प्रजननाच्या उपयुक्ततेसाठी मुलगी वाचली पाहिजे किंवा काही जाहिराती कर्कशपणे ओरडून सांगत असतात, भावाला राखी बांधण्यासाठी बहीण हवी. लग्नासाठी बायको हवी. थोडक्यात स्त्रीची उपयुक्तता सिद्ध झाली तरच तिचं असणं महत्त्वाचं असं सांगणार्‍या या जाहिराती. प्रजनन आणि पोटपूजन या दोन कारणांसाठी तिचा जन्म प्रामुख्याने स्वागतार्ह. मुलगी वाचवाच्या जाहिरातीत ती कधीही घराचं नाव उंचावण्यासाठी, कार्यकर्तृत्वासाठी किंवा नुसती तिची ती कर्तृत्त्वशून्य का होईना एक सर्वसामान्यपणे जगण्यासाठी नकोच असते.

जाहिरातींची रचनाच मुळी उपयुक्ततेच्या अनुषंगाने असल्यामुळे कदाचित त्याचा बहुदा हा परिणाम असेलही, मात्र त्यातही तिच्या कार्यकृतीचा परीघ उंचावेल असं त्याचं स्वरूप का नसतं. ती केवळ पुरूषांच्या म्हणून नव्हे तर समाजाचा भाग म्हणून महत्त्वाची आहे अशी रचना का नसते? पुरूषाला भाकरी थापायला येत नाही म्हणून स्त्री कशाला हवी? त्याचीच रचना अशी का नको- भाकरी तर मी माझी थापून घेईनच पण मीच थापलेली भाकरी वाटून खाण्यासाठी स्त्री हवी ! पुरूषांचा कौटुंबिक आणि सामाजिक सर्वांगीण विकास होण्यासाठी या समाजाची इक्विवॅलंट घटक असणार्‍या स्त्रीसोबतचं शेअरींग हवंय की अशा वेळी त्या स्त्रीचं रूप काहीही असेल. ती बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, मुलगी काहीही. ज्या समाजातलं स्त्रियांचं प्रमाण कमी असेल तिथल्या पुरूषांच्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनात किती गोंधळ असेल. एवढी साधी बाब आपल्याला कळत नाही हेच आपलं दुर्दैव. म्हणजे स्त्रीमुक्तीचा प्रवास हा तिथून सुरू होतो गर्भावस्थेपासून. आपल्याकडे अद्यापही अशी काही गावं, शहरं असतात जिथे मुलींचा जन्मदर पुरूषांच्या जन्मदरापेक्षा फारच कमी आहे.

- Advertisement -

हरयाणा हे त्यातीलच एक. या राज्यात मुलग्यांशी लग्न करण्यासाठी त्यांना बिहार, पश्चिम बंगाल, ईशान्येकडील राज्यांमध्ये जावं लागतं. तिथल्या मुलींना अक्षरश: विकत आणावं लागतं. बरं आपल्याकडे मुलींची संख्या कमी आहे आणि त्याची झळही बसत आहे हे ठाऊक असतानाही काही जण तर भांडताना बायकांना म्हणतात, की जास्त वचवच करू नकोस. दहा हजार फेकेन आणि दुसरी गुलाम आणेन. त्यांच्यासाठी बाईची किंमत ही अशी. म्हणजे गायी -म्हशींचा दरही साठ सत्तर हजार, पण बाई मात्र दहा हजारांच्या घावूक दरात मिळून जाते.

हरयाणाच्या प्रवासात एक अशीच मिझोराममधील मुलगी भेटली. वीस बावीसची होती आणि तीन मुलं होती तिला. तिला सगळे चिनी समजत होते. तिला तिथून विकत आणलं होतं. घरच्या दारिद्य्रामुळे ती विकली गेली. परत कधी तिनं माहेर पाहिलं नव्हतं. तिचा नवरा बरा होता म्हणे. तिच्यासारख्या बर्‍याच जणींची अशी इथं लग्न होऊन आलेल्या. तिथल्या एक कार्यकर्त्या म्हणाल्या, काही वेळा पुरूष इतका हलकट असतो की तो त्याचं मन भरलं की तिला आणखी कुणाला तरी विकतो. किती भयंकर आहे हे. याच हरियाणाने गतवर्षी त्यांच्या शासकीय मुखपृष्ठावर एक घुंघटमधील स्त्रीचा फोटो आणि त्यावर लिहिलं होतं. घुंघट की आणबाण म्हारे हरयाणा की शान. याचा अर्थ काय घुंघटमध्ये राहणं, घुंघटची आणबाणही सांभाळणं, हा त्या हरयाणासाठी मानबिंदू वाटत होता. तोच तसा दिसतही होता. तिथं तरूण विवाहितेपासून जख्ख म्हातार्‍यापर्यंत तुम्हाला बाया घुंघटमध्ये दिसत होत्या. घुंघट का तर? सासू सासर्‍यांचा, दीर आणि अन्य परपुरूषांचा आदर दाखवण्याची ती एक पद्धत.

अशा सर्व परिस्थितीत मुलींना सक्षम करायचं असेल तर काय करावं या अनुषंगाने ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वूमन असोसिएशनच्या ज्येष्ठ नेत्या जगमती सांगवान यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला होता. त्या म्हणाल्या होत्या, मुलींनी खेळांमध्ये यावं. कारण खेळ एक अशी जागा आहे जिथं तुम्हाला स्वत:साठी स्वत:लाच लढावं लागतं. आपल्याकडे सरपंच असो की कुणी मोठ्या हुद्यावर बसवलेली बिझनेसवूमन पण तिच्यावतीने कारभार सांभाळणारा पुरुष तिच्या आगेपिछे असतो आणि ती मात्र नजरकैदेत असते. कुठलाही निर्णय घेण्याचे तिला स्वातंत्र्य नसते. परंतु मैदानी खेळात तसं घडत नाही. तिथं ‘तुमच्या वतीने’ कोणालाही लढता येत नाही. खुदका किरदार खुद ही निभावे. त्यामुळे होतं असं की मुली मैदानात उतरतात. खेळात ऐनवेळेवर निर्णय घ्यावे लागतात. समोरच्याने केलेल्या चालीला आपण खेळी करून उत्तर द्यायचे असते आणि हे खूप कमी सेकंदात घडतं असतं, अशा रितीने जर मुली खेळात निर्णय घेऊ लागतील. स्वत:साठी खेळू लागतील तर त्याचा प्रभाव त्यांच्या खर्‍या आयुष्यातही पडणारच आहे. सांगवान यांचा हा मुद्दा अतिशयच महत्त्वाचा आहे.

उलट आपण साध्या साध्या गोष्टींमध्ये लिंगनिहाय भेदभाव करतो. खोट्या मर्दानगीच्या गप्पांमध्ये पुरूषांना आणि स्त्रियांना अडकवतो आणि त्याचे दुष्परिणामही भोगत राहतो. जाहिराती असतील, सिरीयल्स असतील किंवा प्रत्यक्ष आपलं जगणं आपल्याला ते डोळसपणे पहावं लागेल. स्त्रियांकडे पारंपरिक नजरेतून पाहताना त्याचा कळतनकळत दुष्परिणाम पुरूषांवरही होतोच, कारण तेही याच व्यवस्थेचे बळी आहेत. मुलगी वाचणं आणि स्त्रीमुक्ती होणं हे मूठभर स्त्रियांनी आणि पुरूषांनी कृती करायची गोष्ट नाही तर ती प्रत्येकाच्या घरादारातली गोष्ट आहे. जिथं आपल्या संवेदना जाग्या ठेवून वावरता यायला हवं.

-हिना कौसर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -