घरफिचर्सजीना यहाँ,मरना यहाँ!

जीना यहाँ,मरना यहाँ!

Subscribe

‘जीना यहाँ, मरना यहाँ, इस के सिवा जाना कहाँ’. माणसाच्या जगण्याचं एकूण सार साध्यासरळ शब्दांत सांगून टाकणारी ती ओळ कवी शैलेंद्रंच्या तोंडून ऐकताच राजसाहेबांचे डोळे चमकले. राजसाहेबांची तब्येत खरंच खूप खूश झाली. त्यांनी ही ओळ सिनेमाला सुरुवात करण्याच्या आधीच पक्की करून टाकली.

राज कपूर ‘मेरा नाम जोकर’ची जुळवाजुळव करत होते. सर्कशीतल्या जोकरच्या म्हणजे विदुषकाच्या जीवनाची कैफियत राज कपूरना आपल्या त्या सिनेमातून मांडायची होती. कोणत्याही नवीन सिनेमाचा प्रकल्प हाती घेतला की राज कपूर त्यात पूर्ण हरवून जायचे. त्यांचा कोणताही नवा सिनेमा हा त्यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी सिनेमा असायचा…आणि सर्कशीतल्या जोकरच्या आयुष्याचा जीवनपट सिनेमातून उलगडून दाखवणं ही त्यांच्यासाठी फारच विलक्षण गोष्ट ठरली होती. त्याची कथा, पटकथा, संवाद, त्यातल्या दृश्यांचं चित्रीकरण, त्यातली गाणी, त्या गाण्यांचे शब्द याबद्दलचे विचार त्यांच्या मनात त्या काळात फेर धरू लागले होते. अहोरात्र त्याच विचारात राजसाहेब गर्क होते…आणि अशा विचारचक्रात असतानाच त्यांनी कवी शैलेंद्रंशी या सिनेमाच्या कथेचा विषय काढला आणि आपला हा सिनेमा रूपेरी पडद्यावर कशा पध्दतीने पुढे सरकेल याबद्दल गहन चर्चा केली.

- Advertisement -

जोकरचं काम असतं सर्कस पहायला आलेल्या प्रेक्षकांना पोट धरून हसवणं. त्यासाठी त्याला रंगीबेरंगी कपडे घालावे लागतात. विचित्र मुखवटा चेहर्‍यावर धारण करावा लागतो. प्रसंगी शारीरिक कसरती कराव्या लागतात. अधेमधे कोलांट्या उड्याही माराव्या लागतात. अजब हालचाली कराव्या लागतात. एकूण काय तर जोकरचं काम करणारा माणूस कितीही शहाणासुरता असला तरी त्याला तमाम प्रेक्षकांसमोर स्वत:ला स्वत:हून जोकर ठरवावं लागतं. त्याच्या हास्यास्पद गोष्टींवर तर लोक हसतातच; पण त्याने रडण्याचा अभिनय केला तरी लोक हसतात. सर्कशीबाहेरच्या जगात त्याची जोकर ही प्रतिमा जोकर म्हणूनच लोकांच्या मनात राहते. त्याच्या मनात दडलेलं दु:ख उफाळून कधी बाहेर आलं तर लोक त्याच्या डोळ्यात दाटलेल्या आसवांनाही हसतात. त्याच्या दु:खाचे भाव नैसर्गिकरित्या डोळ्यांत दाटले आणि तो खराखुरा रडला, धाय मोकलून रडला तरी लोक त्याला हसत राहतात.

त्याचं जितंजागतं रडणं स्वीकारायला लोक तयार होत नाहीत. जोकरलाही त्याच्या वैयक्तिक जीवनात काही व्यथावेदना असू शकतात हे कुणाला मान्य नसतं. त्याच्या प्रत्येक कृतीसोबत त्याचं रडणंही आपल्याला हसण्यासाठीच असतं अशी लोकांची धारणा असते…आणि अशी सगळी परिस्थिती असूनही त्याला तसंच जगावं लागतं. आपल्या खर्‍याखुर्‍या रडण्यालाही लोकांचं हसणं अपेक्षित धरूनच तो आपलं जीवन कंठत असतो…आणि आपलं हेच जगणं स्वीकारत या दुनियेत आपल्याला इथेच जगायचं आहे आणि इथेच मरायचं आहे याची खुणगाठ मनाशी बांधतच तो आपलं जगणं जगत राहतो…जोकरच्या जीवनाची ही दर्दभरी कहाणी राज कपूर ‘मेरा नाम जोकर’च्या निमित्ताने कवी शैलेंद्रना सांगत असतानाच शैलेंद्रंच्या मनात एक ओळ सहज म्हणून चमकली आणि ती त्यांनी राज कपूरना बसल्या बैठकीत तिथल्या तिथे सांगून टाकली. ती ओळ होती – ‘जीना यहाँ, मरना यहाँ, इस के सिवा जाना कहाँ.’

- Advertisement -

माणसाच्या जगण्याचं एकूण सार साध्यासरळ शब्दांत सांगून टाकणारी ती ओळ कवी शैलेंद्रंच्या तोंडून ऐकताच राजसाहेबांचे डोळे चमकले. राजसाहेबांची तब्येत खरंच खूप खूश झाली. त्यांनी ही ओळ सिनेमाला सुरुवात करण्याच्या आधीच पक्की करून टाकली.

पण राजसाहेबांचं दुर्दैव असं की कवी शैलेंद्र या जगात पुढे राहिले नाहीत. ते अकस्मात निघून गेले. त्यामुळे राजसाहेबांसमोर एक अशी समस्या उभी राहिली की ‘जिना यहाँ, मरना यहाँ, इस के सिवा जाना कहाँ’ हा जो मुखडा शैलेंद्र लिहून गेले त्यासाठी त्या मुखड्याला साजेसे आणि तसेच समर्पक अंतरे लिहिणार कोण?

राजसाहेब हे तसे कसबी कलाकार, दिग्दर्शक, निर्माते होते. त्यांनी त्यासाठी तशाच तोलामोलाच्या कवी-गीतकारांशी संपर्क साधला. त्या सर्व कवी-गीतकारांनी राजसाहेबांच्या हाकेला ओ देऊन शैलेंद्रंच्या त्या मुखड्यासाठी अंतरे लिहून राजसाहेबांना दाखवले; पण त्यांच्यापैकी कुणाचंच लिखाण राजसाहेबांच्या पसंतीला उतरलं नाही. शैलेंद्रंनी किती साध्यासरळ शब्दांत तो मुखडा लिहिला आहे, अगदी तशाच शब्दांंत मला त्यासाठी अंतरेही लिहून हवे आहेत, अशी राजसाहेबांनी पूर्वसूचना देऊनही त्यांना भावेल असा एकही अंतरा कुणीही गीतकार लिहू शकला नाही. या सगळ्या प्रकारामुळे राजसाहेब खरंच निराश झाले. या समस्येवर कसा तोडगा काढावा हे त्यांना काही सुचत नव्हतं. या विचारात ते बरेच अस्वस्थ होते. त्यांचा तो एकूण खिन्न चेहरा पाहिला आणि शैलेंद्रंचा मुलगा शैली शैलेंद्रच्या मनात कालवाकालव झाली.

तो दबकत दबकत राजसाहेबांच्या पुढ्यात उभा राहिला…आणि त्याने भीत भीत राजसाहेबांना विचारलं, साहेब, मी लिहू पुढचे अंतरे?…शैलेंद्रंच्या मुलाचा हा प्रश्न राजसाहेबांना चक्रावून टाकणारा होता. सर्वप्रथम त्याने पुढे येऊन केलेल्या या धाडसी प्रश्नाचं राजसाहेबांना कौतुक वाटलं. जिथे प्रतिभावंत कवी-गीतकारांना शैलेंद्रंचे ते शब्द पुढे नेणं जमलं नाही तिथे शैलेंद्रंचा हा मुलगा काय करणार, असा विचार राजसाहेबांच्या मनात आला.

शैली शैलेंद्रंनी राजसाहेबांना तो प्रश्न विचारल्यानंतर काही काळ खूप शांततेत गेला; पण पुढच्याच क्षणी राजसाहेबांनी शैली शैलेंद्रला ते गाणं लिहिण्याची परवानगी देऊन टाकली. सगळ्यांनाच गाणं लिहायला सांगितलं तसं यालाही गाणं लिहायला सांगून पाहूया, असा विचार राजसाहेबांच्या मनात आला. झालं, शैली शैलेंद्रंनी दोनेक दिवस घेतले आणि गाणं लिहून आणलं…‘ये मेरा गीत, जीवन संगीत, कल भी कोई दोहराएगा, जग को हसाने बहरूपिया, रूप बदल फिर आयेगा, स्वर्ग यही, नर्क यहाँ, इस के सिवा जाना कहाँ…’

राजसाहेबांनी ते शब्द वाचले…आणि आनंदाने त्यांचा चेहरा फुलला.
ते शैली शैलेंद्रला म्हणाले, मी ज्यांच्या शोधात होतो ते हेच शब्द. मला मिळाले शैलेंद्रच्या मनातलं ते गाणं…खूप आभारी आहे मी तुझा!

…आपल्या कवीमनाच्या वडिलांना अभिप्रेत असलेलं गाणं शैली शैलेंद्रने लिहिलं…आणि पुढे ते शंकर-जयकिशनच्या संगीत-दिग्दर्शनाखाली मुकेशच्या आवाजात रेकॉर्डही झालं…
…ज्या गाण्याने ‘मेरा नाम जोकर’चा संपूर्ण डोलारा सांभाळला हे सांगायला नकोच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -