घरफिचर्सआक्कीतीचं आळं, बेंदराला खावी फळं

आक्कीतीचं आळं, बेंदराला खावी फळं

Subscribe

शेतकरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शेतीच्या कामांना प्रारंभ करतात म्हणून या सणाला ‘आखेती’ असेही म्हणतात. या दिवशी बी बियाणी नीटनेटकी केली जातात. शेतीत नागरणी केली जाते. बागायती शेती असेल तर आळं केलं जातं. म्हणून अनेक भागांत अशी म्हण प्रचलित आहे की, ‘अकितीला आळं तर बेंदराला फळं’. या दिवशी जर बियाने पेरलं तर जूनमध्ये येणार्‍या बेंदूर सणापर्यंत फळधारणा होते.

महाराष्ट्रात परंपरागत आंबे खाण्यास सुरू करण्याचा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी महाराष्ट्रातील बहुतांश घरात आमरस व पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. मराठी वैशाख महिन्याचा तिसरा दिवस, अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो. यावेळी शेतशिवारात चारोळी पिकलेली असतात. तोरणं पिकून संपत आलेली असतात व करवंद नुकतीच पिकायला सुरुवात झालेली असतात. आंब्याखाली पाड पडण्यास सुरुवात होतात. वैशाख उन्हाची झळ कमी करण्यासाठी यात सर्व रानमेवा सोबतीला असतो. याच महिन्यात उसाचा रस मोठ्या प्रमाणात प्यायला जातो. अक्षय तृतीयाला सोने खरेदी करण्याबरोबरच वस्तू, अन्न, बी-बियाणे दान केले जातात. असा हा अक्षय तृतीया कृषीसंस्कृतीमधील महत्त्वाचा सण आहे.

- Advertisement -

अक्षय तृतीया ही विदर्भ व खानदेशात अखातीज किंवा आखीजी म्हणून साजरा केला जातो. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात यालाच अकिती म्हटले जाते. शहरी भागात या दिवशी सोने, नवीन गोष्टी खरेदी केली जातात. गुजराती लोक यालाच अखातरी म्हणतात. प्रदेशनिहाय नावे जशी वेगवेगळी आहेत, तशीच त्या-त्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. मात्र आमरस व पुरण पोळी हे बहुतांश ठिकाणी बनवला जातो. या दिवशी पितरांना पुजले जाते. खानदेशात मुलींना माहेरी बोलावून आणून त्यांचे लाड केले जातात. चांगले जेवण बनवून खायला घातले जाते. झोका बांधून दिला जातो. गाणी म्हणत झोका झुलवला जातो. भंडारा जिल्ह्यातील जिया चावरे हिने सांगितले की, हा सण त्यांच्यासाठी दिवाळीपेक्षा मोठा आणि महत्त्वाचा असतो.

कुमुदिनी पंचभाई यांनी त्यांच्या अखीजीची आठवण सांगितली. माहेरी आलेल्या मुलींना झोक्यावर बसवून गाणी म्हटली जातात, त्यातील एक गाणं त्यांनी म्हणून दाखवलं.

- Advertisement -

आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फुटना झुयझुय पानी व्हायं वं ||
झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं, कसाना बाजार वं||

अकोले तालुक्यातील विजया पाडेकर ही तिच्या आईकडून अक्षय तृतीयाबद्दल समजून घेत होती. विजयाचे आईने अक्षय तृतीयाच्या त्यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या. आई-बाबा पाण्याच्या तुटवड्यामुळे शेतीत नाही; पण घरापुढे किंवा बाजूला छोटीशी परसबाग करायचे, त्यात घोसाळे, दोडके, घेवडा, कारली असे वेलवर्गीय भाज्या लावत, याला पाणी डोक्यावर दूरवरून आणत व घरातील सांडपाणी पण टाकत असत. या दिवशी लावलेल्या वेलींना उत्पादनही चांगले येत. या परसबागेलाच आळण असे म्हणत.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी परिसरात काही शेतकरी याच दिवशी बी, बियाणे यांची पूजा करतात. पूर्वी सर्वांच्या घरी हे केलं जायचं, अशी माहिती शेती परिवार कल्याण संस्थेचे कार्यकर्ते संजय शेंडगे यांनी सांगितली. त्यांच्या आठवणीनुसार या दिवशी ‘होंडी’ या ज्वारीची पेरणी केली जायची. जालन्यातील दत्ता वाडेकर यांनी गावातील जाणकार महिलांशी बोलताना कळले की, अक्षय तृतीया या दिवशी घरातील सर्व पेरणीचे बियाणे नीट करून ठेवले जायचे. त्यांची उगवण क्षमता तपासण्यासाठी घराच्या जवळच्या परसबागेत थोडे थोडे बियाणे लावले जायचे. यामधून जे चांगले उगवून आले, अशाच बियाणाची निवड शेतीत पेरण्यासाठी केली जात असे. सध्या ही प्रथा खूपच कमी लोक पाळतात.

अक्षय म्हणजे, नष्ट न होणारे. अक्षय तृतीया दिवशी घेतलेली गोष्ट वाढत वाढत जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त, त्रेतायुग व कृतयुगाची सुरुवात. असे या दिवसाची महती पुरणाच्या आधारे सांगितली जाते. मात्र शेतकरी समुदायासाठी हा सण शेतीकामासाठी योग्य वेळ मानला जातो. शेतकरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शेतीच्या कामांना प्रारंभ करतात म्हणून या सणाला ‘आखेती’ असेही म्हणतात. या दिवशी बी बियाणी नीटनेटकी केली जातात. शेतीत नागरणी केली जाते. बागायती शेती असेल तर आळं केलं जातं. म्हणून अनेक भागांत अशी म्हण प्रचलित आहे की, ‘अकितीला आळं तर बेंदराला फळं’. या दिवशी जर बियाने पेरलं तर जूनमध्ये येणार्‍या बेंदूर सणापर्यंत फळधारणा होते. उंदड पीक देणारा म्हणून पेरणीचा मुहूर्त मानला जातो.

ग्रामीण भागात बलुते-अलुते यावर आधारित गावगाडा सुरू होता तेव्हा बलुतं म्हणजे धान्य याच दिवशी दिली जायची. शेती व शेती औजाराशी निगडित समूहांना शेतकरी त्यांच्या कामाचा मोबदला धान्य रुपात या दिवशी दिला जायचा.

भगीरथ राज्याने अक्षय तृतीया याच दिवशी गंगा पृथ्वीवर आणल्याची गोष्ट सांगितली जाते. म्हणजे कधीकाळी पावसाची सुरुवात या महिन्यामध्ये होत असण्याची शक्यता आहे.

बियाणं उगवण क्षमता अभ्यास-अक्षय तृतीया सणानिमित्त येत्या वर्षात शेतीत कोणती पिकं घ्यायची आहेत, त्यापैकी कोण-कोणतं बियाणं घरात उपलब्ध आहे, याचा अंदाज घ्यावा. मोठ्या प्रमाणात पेरलं जाणारं बियाणं हे खात्रीशीर असणे खूप महत्त्वाचे असते. दुबार पेरणी ही शेतकर्‍यांना खूप महागात पडणारी गोष्ट आहे. शेतीत घातलेलं बियाणांचं नुकसान तर होणारच, याहून महत्त्वाचे म्हणजे पेरणीचा हंगाम निघून जातो. यामुळे जी बियाणं शेतीत पेरायची आहे, त्यातील शंभर दाणे एका गोणपाटावर ओळीने मांडत त्याची गुंडाळी करावी. असे शंभर बी झाल्यावर गोणपाटाची गुंडाळी पाण्याने भिजवून ठेऊन द्यावे. बियाणे प्रकारानुसार ही गुंडाळी तीन ते आठ दिवसांनी उघडून बघावी. तोपर्यंत त्यावर रोज थोडे थोडे पाणी शिंपडत राहावे. मटकी, मुग, चवळी, असे कडधान्य ३ दिवसांत अंकुरतात. साळी, गहू, यांना आठवडाभर लागू शकतो. आपल्या अंदाजानुसार बियानानुसार गोणपाटाची गुंडाळी उघडावी. त्यातील अंकुरलेल्या बियांची संख्या मोजून पहावी.

शंभरमधील नव्वदहून अधिक बियाणे उगवले असतील तर ते बियाणे शेतीत पेरण्या योग्य आहे असे समजावे. अशाच बियाणांची निवड करून ठेवावी. ही तपासणी दुकानातून विकत आणलेल्या बियानांचीही करता येते. बियाणे कंपनी आपल्या पाकिटावर त्यातील बियाणांची उगवण टक्केवारी दिलेली असते. आपण घरी केलेल्या बियाणे तपासणीमध्ये जर पाकिटावर दिलेल्या टक्केवारीपेक्षा कमी टक्के बियाणे अंकुरल्याचे आढळून आल्यास, संबंधित बियाणे कंपनी विरोधात कायदेशीर कारवाईसुद्धा करता येते. त्यामुळे शेतकर्‍यांनी याबद्दल जागरूक व्हायला हवं.

उगवण क्षमता तपासण्यासाठी सध्या बाजारात जेर्मिनेशन पेपरदेखील उपलब्ध आहेत. एका पेपरची किंमत चार रुपये याप्रमाणे त्याचे दर आहेत. एक कागद तीन चार वेळा वापरता येतो. उगवण क्षमता तपासणी हे या विकतच्या कागदातच केलं पाहिजे, असं काही नाही. साधं कापड, वृत्तपत्राच्या रद्दीतही ही तपासणी करता येते. नाहीतर वृत्तपत्र कोणत्या कामी येणार? अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपल्या शेती संस्कृतीचा महत्त्वाचा सण म्हणून या बियाणं तपासण्याची प्रथा पुन्हा सुरू

करायला हवी. असे निरीक्षण, नोंदी, अभ्यास होऊ लागला तर कदाचित शेतीला चांगले दिवस येतील.
मिश्र पाट्याचं बियाणं- पाटा म्हणजे शेतीत पेरलेल्या ओळी. मिश्र पाटा म्हणजे अनेक प्रकारची धान्य एकत्र करून पेरलेल्या ओळी. असा मिश्र पाटा आता आपल्या शेतीतून हद्दपार होत आहे. या पाट्याचे अनेकार्थाने महत्त्व आहे. त्याबद्दल सविस्तर पुढील लेखात वाचू शकाल. मात्र या पाट्यात पेरता येतील अशी बियांची जमवाजमव करून ठेवणे गरजेचे आहे. एकदा का मृगाचा पाऊस सुरू झाला की मग बियाणे मिळणे कठीण जाते. पेरणीचे दिवस यासाठी टाळून चालणार नाहीत. त्यासाठी पुढील वीस प्रकारची बियाणे जमवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. १. मका, २. मऊ ज्वारी, ३. बाजरी, ४. चवळी, ५. भेंडी, ६. काकडी, ७. शेलनी (काकडीवर्गीय एक प्रकार), ८. वाळूक, ९. दोडका, १०. पारस दोडका(गिलके/चोपड/घोसावळे), ११. दुधी भोपळा, १२. कारले, १३. भादली(तृणधान्य), १४. राळा, १५. गोल्या (ज्वारी), १६. गुंजावाळी (ज्वारी), १६. तूर, १७. मुग, १८. उडीद, १९. कारळा, २०. तीळ, २१. अंबाडी.

फळं हवी असती तर आळं करा- परसबागेत, गॅलरीत, गच्चीवर, कुंड्यांमध्ये जिथे शक्य होईल तिथे अक्षय तृतीया दिवशी दोडका, घोसावली, डांगर, भोपळा, कारली, वाल, घेवडा अशा वेलवर्गीय बियाणांची लागवड करावी. घरातील सांडपाणी, भाजीपाला व तांदूळ धुतलेलं पाणी टाकून या वेली वाढवत राहावं. जूनमध्ये येणार्‍या बेंदूरपर्यंत या वेली फळांनी लगडलेल्या असतील.

– (लेखक ‘पर्यावरण शिक्षण’ विषयाचे अभ्यासक आहेत.)

-बसवंत विठाबाई बाबाराव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -