घरफिचर्सकेतकी गुलाब जूही ... गाण्यांच्या खजिन्याची बसंत बहार

केतकी गुलाब जूही … गाण्यांच्या खजिन्याची बसंत बहार

Subscribe

‘बसंत बहार’चे प्रमुख आकर्षण होते पुरते भारावून टाकणारे संगीत. त्याची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. सर्वच गाणी अगदी आजच्या घटकेलाही ताजीतवानी वाटणारी, चैतन्य देणारी. भारत भूषण, निम्मी, कुमकुम, नायमपल्ली, चंद्रशेखर, श्याम कुमार, लीला चिटणीस आणि ओम प्रकाश इ. कलाकारांच्या या चित्रपटाला संगीत होते शंकर-जयकिशन यांचे.

यंदा थंडी चांगली होती आणि तिचा मुक्काम बराच लांबला आहे. इतका की वसंत पंचमी झाली, तरी अद्यापही हवा गारच आहे. वसंत पंचमी म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दीच म्हणायची. ऋतुराज म्हणतात त्याला. अर्थातच सर्वांनाच प्रिय असलेला हा ऋतू. सृष्टी तिच्या अलंकारांनी पुरेपूर सजते आणि त्या दृश्याने डोळ्यांचे पारणे फिटते. अगदी शहरांमधूनही काही ठिकाणी आपल्याला हे वैभव पाहायला मिळते. वसंत ऋतू म्हणजे आनंद साजरा करण्याचा ऋतू. संगीत, नाच, गाणी यांची रेलचेल असते. सर्वांची मने हर्षभरित झालेली असतात. अशाच वातावरणात अवश्य पहावा असा चित्रपट म्हणजे 1956 साली तयार झालेला ‘बसंत बहार’. खरोखरच सदाबहार चित्रपट. कथा साधारण, कलाकारांची कामे नीटनेटकी म्हणावी अशीच होती. तसे कुणाचे त्याकडे फारसे लक्षही जात नव्हते कारण गाण्यांच्या जादूने संपूर्ण चित्रपटगृह भारले जात असे, जोडीला कुमकुम आणि निम्मी यांच्या नृत्यांचीही साथ होती आणि त्यामुळे समस्त प्रेक्षक अक्षरशः धुंद होऊन गेलेले असत.

- Advertisement -

‘बसंत बहार’चे प्रमुख आकर्षण होते पुरते भारावून टाकणारे संगीत. त्याची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. सर्वच गाणी अगदी आजच्या घटकेलाही ताजीतवानी वाटणारी, चैतन्य देणारी. भारत भूषण, निम्मी, कुमकुम, नायमपल्ली, चंद्रशेखर, श्याम कुमार, लीला चिटणीस आणि ओम प्रकाश इ. कलाकारांच्या या चित्रपटाला संगीत होते शंकर-जयकिशन यांचे.

कन्नड कादंबरीकार तरसु यांच्या ‘हंसगीते’ या कादंबरीवर आधारलेला हा चित्रपट होता आणि तिच्यावरून राजेंद्र कृष्ण यांनी पटकथा-संवाद तयार केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन राजा नवाथे यांचे होते. कथा तशी साधी. नायक गोपाल हा संगीतप्रेमी. त्याला चांगला गायक बनायचे आहे. पण त्याचे वडील, ओम प्रकाश यांचा त्याला पूर्णपणे विरोध आहे. त्याने आपल्याप्रमाणेच ज्योतिषी व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. शेजारी राहणार्‍या दरबारी गायकाचा मुलगा रियाज करताना ते ऐकतात आणि त्यांचा राग आणखीच वाढतो. ते गोपालला म्हणतात बघ, तो कसा वडलांचीच गादी पुढे चालवण्यासाठी प्रयास घेत आहे, तुही तसेच करायला हवेस. माझ्याप्रमाणेच चांगला ज्योतिषी बनायला हवेस, असे सांगून विचारतात संगीतानं काय मिळणार? पण त्यांचे ते सांगणे गोपालला मान्य नसल्याने त्यांचे सतत झगडे होत असतात. गोपालची आई, लीला चिटणीस, मात्र त्यालाच पाठिंबा देते. ती त्याची कड घेते म्हणून वडील तिच्यावरही राग काढतात.

- Advertisement -

दरबारी गायक ठरवण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असते. शेजार्‍याचा मुलगा त्यात भाग घेणार असतो. पण दरबारी गायक असलेले त्याचे वडील म्हणतात गोपाल स्पर्धेत असताना तू काय करू शकशील? गोपाल दरबारी गायकाचा आदर करत असतो. तो म्हणतो मग मी स्पर्धेत उतरतच नाही. पण दरबारी गायक त्याला तयार होत नाही. पण स्पर्धेआधीच गोपालचे शत्रू त्याला पेयातून विषारी पदार्थ देतात. त्यामुळे ऐन स्पर्धेत गोपालचा आवाज जातो. त्याला अपमानित होऊन निघून जावे लागते. नर्तकी गोपी, निम्मीला गोपालबद्दल प्रेम असते. ती त्याच्यात रस घेते. तिच्या प्रयत्नाने आणि एका लहानशा अपघाताने गोपालचा आवाज परत येतो. तो गुरू शोधण्यासाठी फिरतो. त्याला मनमोहन कृष्ण यांच्या रूपाने तो भेटतो. तो गोपालच्या गाण्यावर प्रसन्न होतो… पण अल्पावधीतच तो जग सोडून जातो. गोपाल पुन्हा आपल्या गावी परत येतो. तेथे बरेच काही घडत असते. गोपीला पैसे मिळवायला लावायची तिच्या आईची इच्छा असते. तिला पैसे हवे असतात. त्यासाठी गोपाल दुसर्‍या राज्यातील गायनाच्या स्पर्धेत भाग घेतो आणि आपल्या कौशल्याने विजयी होतो. त्याला पाच हजार मोहराही बक्षीस म्हणून देतात. आता आपली इच्छा पूर्ण होईल अशा अपेक्षेने तो परत येतो. पण .. पुढे काय होते ते प्रत्यक्षच बघायला हवे.

चित्रपट शोकात्म आहे, एवढीच काही जणांची तक्रार असायची, आजही असते. पण त्या काळातील अनेक चित्रपट त्याच पठडीतले असत. आणि कदाचित मूळ कादंबरीत बदल करण्याचीही निर्मात्याची तयारी नसेल. आणि कथेच्या ओघात जे घडते अगदी नैसर्गिकच वाटते. कुठेही ओढून ताणून आणल्यासारखे वाटत नाही. एक गोष्ट मात्र खरी आहे. चित्रपटाचा शेवट नायक नायिकेच्या मरणाने होत असला, तरीही त्याचा प्रभाव जाणवण्याजोगा आहे. अर्थात चित्रपटगृहातून बाहेर पडताना हे सर्व बाजूला राहायचे, किंवा विसरले जायचे म्हणा हवे तर, कारण तेव्हा प्रेक्षकांच्या तोंडी त्यांना आवडलेली गाणीच असायची. तीच त्यांना पुन्हापुन्हा चित्रपट पाहण्यासाठी खेचून आणत. गोपालचा आवाज जातो, त्या काळात तो गायनाऐवजी बासरीचा वापर करतो आणि त्या वादनालाही चांगलीच दाद मिळत असे. विशेषतः मैं पिया तेरी, तू माने या ना माने या गाण्यात तर अफलातूनच.

‘बरसात’पासूनच त्यांना सूर सापडलेला आणि यात तर रागदारीवर आधारलेली गाणी देण्याची संधी त्यांना मिळालेली. तिचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतलेला दिसतो आणि त्यामुळेच हे अजरामर संगीत तयार झाले असावे. त्यातही एका प्रसंगात दोन गायकांच्या चढाओढीच्या प्रसंगासाठी त्यांनी साक्षात भीमसेन जोशी यांच्याकडूनही गाऊन घेतलेलेे. केतकी गुलाब जूही, चंपक बन फूले ऽ हे गाणे त्यावेळी चर्चेचा विषय झाले होते. कारण चित्रपटात मन्ना डे भीमसेन यांच्यावर मात करतो असा प्रसंग आहे. काही संगीतप्रेमींनाही तो आवडला नव्हता.

त्याबाबत मन्ना डे यांनी स्वतःच सांगितलेली कहाणी अशी. ते म्हणाले होते, पंडित भीमसेन जोशींसारख्या शास्त्रीय संगीतातील दर्दी गायकाबरोबर आपण जुगलबंदीत गायचे या कल्पनेनेच मी पुरता हादरून गेलो होतो. आणि कथानकानुसार मी गाण्यात त्यांच्यावर मात करणार हे कळल्यानंतर तर मला दरदरून घाम फुटला होता. मी पुरता अस्वस्थ झालो होतो. त्यामुळे भीमसेनजींबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला, तरी शब्द फुटत नव्हते आणि काय बोलायचे तेही उमगत नव्हते. पण अनुभवी आणि दिलदार पंडितजींनी माझी अडचण ओळखली. ते म्हणाले, अरे, उगाच नसती काळजी करू नको. मीही तुझ्यासारखाच गाणारा आहे. नसते दडपण घेऊ नकोस, अगदी नेहमीसारखाच मोकळेपणाने गा. त्यावर मी कसेबसे म्हणालो. ते ठीक आहे, पण तुम्हाला हरवणे हा प्रकार मला मानवत नाहीय. माझी ती पात्रता नाही.

त्यावर ते म्हणाले, हे बघ, अरे हा चित्रपट आहे आणि तो कथानकानुसारच पुढे जाणार. तू नायकाला आवाज देत आहेस आणि मी त्याच्या प्रतिस्पर्ध्याला. नायक अर्थातच विजयी होणार असंच प्रेक्षकांना वाटणार, निदान त्यांची तशीच अपेक्षा असणार, आणि त्यात वावगे काही नाही, मलाही त्यात काही वावगे वाटत नाहीय. आपले काम आपण चोखपणे करायचे असते, आपल्याला कथेला न्याय द्यायचा आहे एवढेच ध्यानात ठेव. त्यांच्या या बोलण्याने मला धीर आला आणि मी ते दिव्य पार पाडले. कसे? तर आवाज लावून दीर्घकाळ तान घेऊन… ते तुम्ही जाणताच. आणि एवढे होऊनही शेवटी मला राहवलं नाही, मी अगदी मनापासून त्यांची माफी मागितली!

नंतर एकदा मन्ना डे यांनी कोणाला तरी मुलाखत देताना असे सांगितले होते की, भीमसेनजींना त्यावेळी कसे वाटले असेल, याची कल्पना मला ‘पडोसन’ या चित्रपटातील किशोर कुमार बरोबरच्या जुगलबंदीत आली! त्यावेळी तो नायकासाठी, सुनील दत्तसाठी गात होता तर मी त्याचा प्रतिस्पर्धी होतो. दाक्षिणात्य नृत्यशिक्षकाची भूमिका वठवणार्‍या मेहमूदसाठी. अर्थात ती जुगलबंदीही चांगलीच लोकप्रिय झाली होती… आठवा… एक चतुर नार करके सिंगार …
महंमद रफी, मन्ना डे, लता मंगेशकर यांनी शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांची गाणी अक्षरशः अजरामर केली आहेत. सर्वच गाणी कर्णमधूर आणि सहज गुणगुणता येण्याजोगी. ती लोकांना आवडली नसती तरच नवल! खरे तर यातील गाणी सांगितली की तुम्हीही नकळत ती गुणगुणू लागाल, कारण त्यांचे सदाबहारपण. बघा तर. मैं पिया तेरी, तू माने या ना माने, जा जा रे जाऽऽ बालमवा, कर गया रे ऽ मुझपे जादू (लता मंगेशकर), नैन मिले चैन कहाँ, दिल है वही तू है जहाँ, ये क्या किया सैंया सावरे (लता मंगेशकर- मन्ना डे), बडी देर भयी, कब आओगे मेरे राम, दुनिया न भाए मुझे (महंमद रफी) भयभंजना वंदना (मन्ना डे) आणि केतकी गुलाब जूही, चंपक बन फूले ऽ ऋतु बसंत ..(भीमसेन जोशी आणि मन्ना डे).
तर असा हा बसंत बहार. त्यापूर्वी काहीकाळ येऊन गेलेल्या बैजू बावरा या संगीतप्रधान चित्रपटातही भारत भूषणने काम केले होते. चित्रपटांचं संगीत आणि नायिका यांच्याबाबतीत तो नशिबवानच होता!

– आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -