घरफिचर्समायमहानगर ब्लॉगहा तर ‘पीओपी’ उत्सव!

हा तर ‘पीओपी’ उत्सव!

Subscribe

सर्वांची दु:ख दूर करून सर्वांना सुखी कर अशी प्रार्थना लाडक्या बाप्पाला करत त्याला गणेशभक्तांनी साश्रूनयनांनी निरोप दिला. पुण्या-मुंबईच्या रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने गर्दी केली. सरकारी नियम आणि शिक्षेच्या दट्ट्याला घाबरत का होईना, पण आवाजाची पातळी बर्‍यापैकी कमी ठेवली, पण एकीकडे बाप्पाला सर्वांची दु:ख दूर कर अशी प्रार्थना करतानाच दुसरीकडे त्याच दु:खासाठी किंवा त्रासासाठी कारणीभूत ठरणार्‍या गोष्टी मात्र आपण अगदी सर्रासपणे करत आहोत. ‘इको फ्रेंडली गणेशा’ ही कुठलीतरी चंद्रावरची संकल्पना आणि अजिबात अस्तित्वात येऊ न शकणारी फक्त कल्पनाच आहे, अशा आविर्भावात लाखो गणेशभक्तांनी ‘दरवर्षीप्रमाणे’ यंदाचाही गणेसोत्सव साजरा केला. लाखो टन पीओपी नदी, समुद्र किंवा ओढ्याच्या पाण्यात स्वाहा केले. मोठमोठ्या मंडळांच्या मोठमोठ्या गणेशमूर्ती समुद्रात विसर्जन झाल्या. त्यामुळे मंडळांच्या देखाव्यांमधून दिसणारे पर्यावरण प्रेम प्रत्यक्ष कृतीत मात्र दिसले नाही. याचा अप्रत्यक्ष परिणाम पर्यावरणावर होत असताना त्याचे ना कुणाला सोयरं आहे आणि ना कुणाला सुतक!

एकट्या मुंबईचा विचार केला तर यावर्षी मुंबईत एकूण १ लाख ९६ हजार ४८३ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आणि त्यातल्या फक्त ३३ हजार ९२५ मूर्तींचे विसर्जन हे मुंबई महानगरपालिकेकडून बांधण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आले. म्हणजे, जवळपास १ लाख ६३ हजार मूर्तींचे विसर्जन हे मुंबईच्या तलाव, नदी आणि समुद्रात झाले आहे. गेल्या वर्षी हाच आकडा १ लाख ८८ हजारांच्या घरात होता आणि हा आकडा फक्त मुंबईतला आहे. मुंबईप्रमाणेच मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजर्‍या होणार्‍या पुण्यात हा आकडा अजून मोठा असेल. त्याव्यतिरिक्त राज्याच्या इतर भागांमध्ये देखील गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आणि गंभीर बाब म्हणजे यातल्या बहुतांश मूर्ती या पीओपीच्या आहेत.

- Advertisement -

मुळात पर्यावरणाचा आणि आपला काही संबंध आहे, हा विचारदेखील सामान्यजनांना शिवतो की नाही? अशी शंका येण्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पर्यावरण तज्ज्ञांनी असंख्यवेळा आवाहन करूनदेखील घरामध्ये दरवर्षी येणारी मूर्ती न चुकता पीओपीचीच असते. ती मूर्ती अधिक आकर्षक, अधिक मजबूत आणि सर्वात जास्त म्हणजे स्वस्त असते अशी अनेक कारणे दिली जातात, पण पीओपीची मूर्ती खरेदी करून आपण त्याबदल्यात पर्यावरणाची किती मोठी किंमत चुकवतो याविषयी फारसे कुणी गंभीर असल्याचे दिसत नाही. जिथे जनसामान्यांच्या घरगुती गणपती मूर्तींची ही तर्‍हा, तिथे मंडळांविषयी काय बोलावे? मूर्तीच्या उंचीवरून, तिच्यावरच्या दागदागिन्यांवरून, मूर्तीपुढच्या लवाजम्यावरून आणि त्यात कर्णकर्कश्श्य आवाजात अधिकाधिक चालणार्‍या मिरवणुकांमधून गणेशमंडळांची प्रतिष्ठा कमी किंवा जास्त होत असते. मग त्यात कितीही पैसा खर्च झाला, कितीही पर्यावरणाचे नुकसान झाले तरी त्याची तयारी या मंडळांची असते. उलट, अशा मंडळांनीच जर सामाजिक भावनेतून आधी मंडळांचाच गणपती शाडू मातीचा बसवला, तर त्याचा परिणाम आपोआप त्या त्या भागातल्या लोकांवर होण्याची शक्यता अधिक असते. मात्र, गणेश मंडळे असे काही करण्याच्या भानगडीत फारसे पडत नाहीत. त्यांच्यासाठी मूर्तीच्या उंचीवर त्यांच्या किर्तीची उंची अवलंबून असते!

मुळात, मोठमोठ्या गणेश मंडळांच्या माध्यमातून एखादा विचार लोकांपर्यंत पोहोचवणे बरेच सोपे असते. कारण, या मंडळांना आणि त्यांच्यात विराजमान होणार्‍या (पीओपीच्या!) बाप्पांना मानणार्‍या भक्तांची संख्या फार मोठी असते. त्यामुळे तिथून सुरुवात झाली, तर हळुहळू भक्तगण देखील त्या गोष्टीचे अनुकरण करू शकतील. मात्र, ही मंडळे आपल्याच धुंदीत आणि झगमगाटात अडकली असल्यामुळे त्यांच्याकडून अशाप्रकारची अंमलबजावणी होताना दिसत नाही. याबाबतीत पुण्यातले मानाचे गणपती वेगळे ठरत असले, तरी ज्या मुंबईचा समुद्र आणि तिथला पाऊस मुंबईची दरवर्षी तुंबई करतो, त्या मुंबईतली मोठमोठी गणेश मंडळे मात्र अजूनही बाप्पाची किती उंचीची मूर्ती, बाप्पाला किती किलो सोनं, बाप्पाला किती मोठी देणगी आणि बाप्पाला किती आकर्षक देखावा याच चक्रात अडकली आहेत. आता तर अनेक ठिकाणी मंडळांमधली स्पर्धा घराघरांत पोहोचली आहे. हल्ली घरगुती गणेश मूर्तींची उंची देखील दरवर्षी वाढू लागली आहे आणि गंभीर बाब म्हणजे या मूर्ती पीओपीच्या आहेत.

- Advertisement -

पीओपीच्या मूर्ती साचेबद्ध असतात. त्या बनवणे सोपे असते आणि म्हणूनच त्या स्वस्त असतात. त्यांचे साचे आखीव-रेखीव असतात. म्हणूनच त्या दिसायला देखील अधिक आकर्षक असतात, पण शाडूच्या मातीची किंवा साध्या मातीची मूर्ती बनवणे कठीण काम असते. त्यांचा एक साचा नसल्यामुळे ती मूर्ती बनवण्यासाठी वेळ लागतो. त्यांचे रंग, त्यांच्यावरचे नक्षीकाम हे पीओपीच्या मूर्तींपेक्षा कठीण असते आणि म्हणून त्यांची किंमत पीओपीच्या मूर्तींपेक्षा जास्त असते, पण साध्या चहा-नाष्ठ्यावर सहज शे-दोनशे खर्च करणार्‍यांकडून शाडूच्या मातीच्या मूर्तीसाठी किमतीचे कारण जेव्हा सांगितले जाते, तेव्हा संभाव्य धोक्याबद्दल ते अजिबात गंभीर नसल्याचे जाणवते.

दरवर्षी मुंबईची तुंबई होण्यामध्ये समुद्रात टाकलेल्या भरावामुळे समुद्राचे पाणी शहरात शिरण्याचे एक महत्त्वाचे कारण दिले जाते आणि ते बर्‍याच अंशी खरेदेखील आहे. मुंबई नावाची ही सात बंदरे एक शहर म्हणून अस्तित्वात येण्याच्या प्रक्रियेमध्ये मुंबईचा समुद्र मोठ्या प्रमाणावर बुजवला गेला. तिथे मोठा भराव टाकण्यात आला आणि परिणामी समुद्रात भरतीच्या वेळी जागा नसल्यामुळे ते पाणी शहरात वाट मिळेल तिथे पसरू लागते. कालौघात आणि अनेक पर्यावरण संरक्षक स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या प्रखर विरोधानंतर हा प्रत्यक्ष भराव टाकणे कमी झाले आहे, पण आधी सिमेंट-काँक्रीट आणि वाळूचा असलेला हा भराव आता पीओपीचा झाला आहे. कधीही विघटन न होणारे पीओपी आपण समुद्राच्या, नदीच्या पाण्यात टाकत आहोत. अशा वेळी अनेकदा गणपती बाप्पांबद्दलच्या भावनांचा मुद्दा उपस्थित केला जातो, पण विसर्जनानंतर दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी समुद्राच्या किंवा नदीच्या किनारी आपण पाहिले, तर साश्रूनयनांनी विसर्जित केलेल्या आपल्या बाप्पांकडे आपल्यालाच पाहवणार नाही इतकी विदारक परिस्थिती तिथे दिसून येते. मुंबई महानगरपालिकेने जरी अशा गणेशमूर्तींचे ‘मूर्तीदान’ करून त्यांच्या विल्हेवाटीची जबाबदारी स्वतंत्र संस्थेवर टाकली असली, तरी महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर पीओपी जलसाठ्यांमध्ये सोडले जात आहे.

मुळात पर्यावरण हा विषय प्रशासन किंवा राजकारण्यांच्या अखत्यारीतला आणि म्हणून त्यांच्याच जबाबदारीचा असल्याचा गैरसमज किंबहुना सोयीस्कर गैरसमज सर्वांनीच करून घेतला आहे. खरंतर प्रशासन काय किंवा सरकार काय, कितीही नियम बनवले, तरी ते पाळण्याची जबाबदारी ही ते नियम ज्यांच्यासाठी बनवले, त्या सामान्य नागरिकांचीच असते. प्लास्टिकबंदीचा नियम करून देखील विक्रेत्यांकडे सर्रासपणे प्लास्टिकच्या पिशव्या मागणारे ग्राहक आणि त्यांना देण्यासाठी या प्लास्टिकच्या पिशव्या ठेवणारे विक्रेते हे याच सामान्यजनांच्या वर्गातले असतात. त्यामुळे प्लास्टिकमुक्त व्यवसायाप्रमाणेच पीओपीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. त्यासाठी मोठ्या मंडळांनी लोकांपुढे आदर्श घालून द्यावा लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, घरगुती बाप्पांना विराजमान करणार्‍या सामान्यजनांनी पीओपीचा अट्टाहास सोडून मातीच्या मूर्तींकडे वळावे लागेल. अन्यथा फक्त गणेशाला विघ्नहर्ता म्हणून काही उपयोगी नाही. कारण आपल्यासमोरची ही ‘विघ्नं’ आपणच तयार करत आहोत!

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -