नाटक रुजवण्याची धडपड

देशव्यापी नाटक संस्कृतीविषयी चर्चा करत असताना महानगरांपलीकडे असलेली छोटी शहरे आणि गावांमधली परिस्थिती हा आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. खेदाची गोष्ट म्हणजे या परिस्थितीला उत्तर देऊ शकेल अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारे धोरण आपल्या सरकारी अजेंड्यात दिसत नाही. सरकारी पातळीवर जरी या आघाडीवर तितकासा उत्साह दिसत नसला, तरी वैयक्तिक पातळीवर मात्र देशभर असेही रंगकर्मी आहेत जे आपापल्या परीने नाटकसंस्कृती वर्धिष्णु व्हावी याकरता काया वाचा मने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा असली तरी नुसतेच रडत बसण्यापेक्षा कृतीशील योगदान देऊन ते आपला खारीचा वाटा उचलत आहेत.

मी जेव्हा प्रत्यक्ष नाटक करायला सुरूवात केली ते वर्ष १९९७ चे होते. तिथपासून ते आजवर दरम्यानच्या तेवीस वर्षात माझ्या सुदैवाने मला या क्षेत्रातल्या दिग्गज लोकांसोबत काम करायची संधी मिळाली. मराठी ही जरी माझी मातृभाषा असली तरी तिच्यापेक्षा जास्त काळ मला अमराठी रंगभूमीवर वावरायची संधी मिळाली. त्याचं प्रमुख कारण हे की, जडणघडणीच्या काळात म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मला अशा मंडळींचा सहवास लाभला जे रंगभूमीकडे देशातल्या एका महत्वाच्या प्रादेशिक भाषेच्याच मक्तेदारीचा प्रांत म्हणून पाहत नव्हते. नाटक संवादांच्या आधाराने सादर होते. साकार होते. मग ते संवाद ज्या ज्या भाषेतून लिहिले जातात, त्या त्या सगळ्या भाषा या नाटकाच्या आणि पर्यायाने आपल्या भाषा आहेत, असा संस्कार आमच्यावर झाला होता आणि आजही तो टिकून आहे. साहजिकच मग मराठीशिवाय हिंदी आणि बुंदेलखंडी (या दोन भाषांमधील नाटके मी प्रत्यक्ष केली असल्याने त्यांचा उल्लेख प्रामुख्याने केला) भाषेत नाटक करणार्‍या मंडळींचा सहवास आणि संपर्क माझ्याबाबतीत वाढता राहिला. यानिमित्ताने देशभर हिंडणे हे ओघाने आलेच. प्रदेशा-प्रदेशातील विविध भाषांमध्ये सादर होणारी नाटके पाहता आली. काहींच्या तालमीत सामील होत प्रत्यक्ष प्रयोगाचा भाग होता आले.

ही पार्श्वभूमी सांगण्याचे एक कारण म्हणजे, या निमित्ताने जाणवलेले एक प्रमुख वैशिष्ठ्य ते हे की, या सगळ्या नाट्यविषयक उपक्रमांत सामील होणारी बहुतांश कलावंत मंडळी देशभरातल्या नाट्यविषयक अभ्यासक्रम शिकवणार्‍या कुठल्या ना कुठल्या संस्थांची पदवीधर होती. दिल्लीचे राष्ट्रीय नाट्य विद्यालय, उत्तर प्रदेशातली भारतेंदु नाट्य अकादमी, गोव्यातली गोवा कला अकादमी, एनएसडीची रेपर्टरी ही काही चटकन आठवतील अशी या संस्थांची उदाहरणं. प्रशिक्षणासाठी निवड करण्याआधी जवळपास प्रत्येक उमेदवाराला एक सामायिक प्रश्न या संस्थांकडून विचारला जातो. तो म्हणजे इथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर तुम्ही काय करणार ? या प्रश्नातच या संस्थांना निवड झालेल्या उमेदवारांकडून प्रशिक्षणोत्तर असलेली अपेक्षा डोकावते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या प्रत्येक पदवीधराने आपापल्या मूळ गावी किंवा शहरात जाऊन त्या त्या ठिकाणी आपल्या प्रशिक्षणाचा उपयोग करत थिएटर करायचं (नाटकाचा प्रसार करायचा म्हणू हवं तर) जेणेकरुन त्या गावात किंवा शहरात रंगभूमीविषयक काम वाढीस लागेल. पर्यायाने संपूर्ण देशात एक व्यापक अशी नाटकसंस्कृती तयार होत राहील. नाट्यप्रशिक्षण देणार्‍या संस्थांनी उमेदवारांशी हा केलेला एक अलिखित करारच असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण या अलिखित कराराचे पालन किती उमेदवारांकडून केले जाते ही काही संशोधनाची बाब उरली नाहीय.

दर दहा पदवीधरांमागे किमान आठ जण पुढे मुंबईची वाट धरतात जिथे त्यांना त्यांच्या प्रशिक्षणाचा उपयोग करत नाटक, मालिका आणि सिनेमांमधून काम करायचं असतं. अर्थात यात गैर काहीच नाहीय. प्रत्येकाकडून तशी अपेक्षा करणं खरंतर गैर होईल. कारण प्रशिक्षणाच्या दरम्यान ज्या सोयीसुविधा या संस्थांकडून उमेदवारांना पुरवल्या जातात, त्यातल्या दशांशानेसुद्धा प्रशिक्षणोत्तर बाहेरच्या व्यावहारिक जगात मिळत नाहीत. असं असताना पूर्ण वेळ रंगकर्म करण्याची चैन त्यांना कशी परवडेल ? अगदी उदाहरण द्यायचे झाले तर उपलब्ध माहितीनुसार, राष्ट्रीय नाट्य विद्यालय एका प्रशिक्षणार्थीमागे त्याची तीन शैक्षणिक वर्षे मिळून सरासरी पंचवीस ते पन्नास लाख रुपये खर्च करते. त्यात प्रशिक्षणार्थींना दरमहा मिळणारा भत्ता, त्यांच्या राहण्याची सोय, त्यांच्या आहाराची सोय, त्यांच्या प्रकल्पांना दिलेले अर्थसाह्य, त्यांना प्रशिक्षण देणार्‍या शिक्षकांचे मानधन वगैरे अशा अनेक बाबी समाविष्ट असतात. तेच प्रशिक्षणार्थी आपले प्रशिक्षण संपवून बाहेरच्या जगात पाऊल ठेवतात तेव्हा केवळ नाटकाच्या जीवावर महिना पाच हजार रुपयेसुद्धा कमवू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. मुंबईची व्यावसायिक रंगभूमी या परिस्थितीला अपवाद असेल. पण या लेखातून आपण देशव्यापी नाटक संस्कृतीविषयी चर्चा करत असताना महानगरांपलीकडे असलेली छोटी शहरे आणि गावांमधली परिस्थिती हा आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू ठेवला आहे. खेदाची गोष्ट म्हणजे या परिस्थितीला उत्तर देऊ शकेल अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारे धोरण आपल्या सरकारी अजेंड्यात दिसत नाही.

सरकारी पातळीवर जरी या आघाडीवर तितकासा उत्साह दिसत नसला, तरी वैयक्तिक पातळीवर मात्र देशभर असेही रंगकर्मी आहेत जे आपापल्या परीने नाटकसंस्कृती वर्धिष्णु व्हावी याकरता काया वाचा मने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा असली तरी नुसतेच रडत बसण्यापेक्षा कृतीशील योगदान देऊन ते आपला खारीचा वाटा उचलत आहेत. अशाच एका रंगकर्मीने काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातल्या गोरखपुरला म्हणजे त्याच्या मूळ शहरातील नाटक करणार्‍या मुलांकरता एक अवकाश (space) निर्माण केला आणि त्याचे अगदी समर्पक नाव ठेवले….‘आवास थिएटर’.

कृष्णगोपाळ यादव हे लखनौच्या भारतेंदु नाट्य अकादमीचे पदवीधर स्नातक आहेत. अभिनयाच्या विधेतील आपले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनीसुद्धा इतरांप्रमाणे मुंबईची वाट धरली. जवळजवळ वीस वर्षे मुंबईत अभिनेता, दिग्दर्शक आणि डबिंग आर्टिस्ट म्हणून ते काम करत आहेत. पण मूळ पिंड हा नाटकाचा असल्याने त्याविषयीचे चिंतन आणि त्यादृष्टीने काही भरीव काम करण्याची कृष्णगोपाळ यांची तळमळ मी स्वत: पाहिली आहे. ‘आवास थिएटर’ हे त्यांच्या याच तळमळीचे पर्यवसान आहे. भारतेंदु नाट्य अकादमीतून बाहेर पडल्यानंतर आणि नाटकाच्या निमित्ताने देशभर फिरत असताना, त्यांना नाटक करू पाहणार्‍या तरूण मुलांची एक अडचण सगळीकडे सारखीच जाणवली. आणि ती म्हणजे नाटकाचे अव्यावसायिक प्रयोग सादर करण्यासाठी आपली हक्काची अशी एक जागा उपलब्ध नाहीय. महाराष्ट्रात तळकोकणातील कणकवलीमध्ये वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने असाच एक अवकाश निर्माण केला आहे. संस्थात्मक पातळीवर अशी मोजकी काही उदाहरणे आहेत. पण कृष्णगोपाळ यादव यांचे विशेष यासाठी की, कुठल्याही मदतीची वाट न पाहता, गोरखपुरला आपल्या राहत्या घराचा काही भागच त्यांनी नाट्यावकाश म्हणून रूपांतरित केला.

मुंबईत नाटककार डॉ. शंकर शेष यांच्या मुलांनीसुद्धा आपल्या राहत्या घरीच एक थिएटर विकसित केले आहे. कृष्णगोपाळ यादवांची या अवकाशाच्या निर्माणामागची प्रेरणा काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी जे बोलणं झालं, त्यात ते म्हणतात, आपल्या देशात गांभीर्याने रंगकर्म करणार्‍यांची कमतरता नक्कीच नाहीय. कमतरता आहे ती त्यांच्या कामाला लोकांसमोर ठेवण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत त्याची. ज्या जागा आहेत त्यासुद्धा एकाधिकारशाहीतून काही ठराविक मंडळींनाच उपलब्ध केल्या जातात. या संदर्भातला मुंबईचा अनुभव गाठीशी होताच. कुठल्याही अव्यावसायिक रंगकर्मीसाठी हा आयुष्यभराचा संघर्ष आणि दुखणं आहे आणि ते संपूर्ण देशात सगळीकडे सारखंच आहे. या संघर्षाची तीव्रता किमान मी जिथे राहतो तिथल्या विभागापुरती का होईना कमी करणं माझ्या हाती आहे. त्यातूनच ‘आवास थिएटर’ या इंटिमेट नाट्यावकाशाची निर्मिती मला करावीशी वाटली. अव्यावसायिक पद्धतीने काम करणारे रंगकर्मी हे मला अत्यंत हुशार पण बेरोजगार माणसांची वर्कफोर्स वाटत आले आहेत. म्हणूनच ‘आवास थिएटर’ बेरोजगार रंगकर्मींचा हक्काचा रंगमंच व्हावा या इच्छेपोटी हा सगळा प्रपंच केला.

कृष्णगोपाळ यादवांसारख्या मायक्रो लेव्हलवर काम करणार्‍या रंगकर्मींची संख्या वाढती राहिली तर, आपल्या देशातील नाटकसंस्कृती जोपासण्यात वैयक्तिक पातळीवरच्या योगदानाचा वाटा मोठा असेल यात कोणाचे दुमत असू शकेल?

-समीर दळवी