घरफिचर्सशिवसेनेची स्वबळाची समस्या !

शिवसेनेची स्वबळाची समस्या !

Subscribe

उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर सत्ता आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्याचा निर्धार केला. इतर राज्यांतील प्रादेशिक पक्षांची बहुमताची सत्ता येऊन त्यांचे मुख्यमंत्री झाले, पण शिवसेनेला ते का जमले नाही, असा प्रश्न शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी उदयाला आलेल्या शिवसेनेचा ५२ वा वर्धापनदिन नुकताच साजरा झाला. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर सत्ता आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्याचा निर्धार केला. इतर राज्यांतील प्रादेशिक पक्षांची बहुमताची सत्ता येऊन त्यांचे मुख्यमंत्री झाले, पण शिवसेनेला ते का जमले नाही, असा प्रश्न शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी उपस्थित केला. शिवसेनेचा मुख्य मुद्दा हा मराठी माणूस होता, पण अधिक व्यापक होण्याच्या नादात तो हातून सुटत गेला. त्यामुळे त्यांना राज्यातील सगळ्या मराठी लोकांची साथ मिळू शकली नाही.

शिवसेनेचा ५२ वा वर्धापनदिन सोहळा गोरेगाव येथील नेस्को संकुलात नुकताच साजरा करण्यात आला. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेनेची स्वबळावर सत्ता आणून आपला मुख्यमंत्री बसविण्याचा निर्धार करत शिवसैनिकांना त्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले. याच वर्धापनदिन सोहळ्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की, आज ५२ वर्षे झाली तरी महाराष्ट्रात शिवसेनेची स्वबळावर सत्ता का येऊ शकली नाही? ते म्हणाले, यावर आपण विचार केला पाहिजे. मला वाटते की, आपण सगळेजण संघटितपणे कामाला लागलो तरी आपली स्वबळावर सत्ता येऊ शकते. इतर राज्यांमध्ये स्वतंत्रपणे स्थापन झालेल्या पक्षांची सत्ता आली. त्यांचे मुख्यमंत्री झाले. ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस, चंद्राबाबू यांचा टीडीपी, अशी अनेक उदाहरणे मनोहर जोशी यांनी दिली.

- Advertisement -

शिवसेनेची स्थापना मुळात महाराष्ट्रातील भूमीपुत्र मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी झालेली होती. मराठी माणसांसाठी शिवसेनेने विविध लढे दिले. त्यात प्रामुख्याने नोकर भरतीत मराठी माणसांवर होत असलेला अन्याय हा प्रमुख मुद्दा होता. शिवसेनेने भूमीपुत्रांसाठी रस्त्यावर उतरून प्रसंगी दबाव आणून अनेक मराठी तरूणांना नोकरीत भरती होण्यास मदत केली. शिवसेनेचा उगम मुंबईत झाला. त्या पक्षाचा पाया मुंबईत आहे. देशाची राजधानी मुंबई आहे. मुंबईचे व्यवहार ठप्प पडले की, त्याची दखल देशपातळीवरून घेतली जाते. मुंबई बंद यशस्वी करून दाखवून शिवसेनेने वेळोवेळी आपले शक्तीप्रदर्शन केले. त्यातून शिवसेनेचा प्रभाव वाढत गेला. पुढे शिवसेनेचे आमदार, खासदार निवडून येऊ लागले. शिवसेनेकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे खंबीर नेतृत्त्व होते. त्यामुळे शिवसेनेचा महाराष्ट्रात दबदबा निर्माण झाला. पालिका पातळीवर शिवसेनेची सत्ता येऊ लागली होती. त्यांनी पहिला झेंडा ठाणे पालिकेवर फडकवला. पण पुढे राज्य पातळीवर आपल्या मर्यादा पडत आहेत, हे शिवसेनेच्या लक्षात येऊ लागले.

दुसऱ्या बाजूला भाजप राज्यात आपला विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत होता.पण राज्यात मराठा लॉबी आणि काँग्रेसचा असलेला पारंपारिक पगडा पाहता राज्यातील सत्ता हवी असल्यास आपल्या एकट्याच्या बळावर ती मिळणार नाही. याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनाही सहकाऱ्याची गरज होती. त्यातूनच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या पुढाकारातून शिवसेना आणि भाजपची युती झाली. पुढे युतीच्या माध्यमातून राज्यातील निवडणूक लढवण्यात आली. १९९५ साली युतीचे सरकार राज्यात आले. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. १९९९ साली विधानसभा निवडणुकीत युतीचा पराभव झाला. त्यावेळी काँग्रेस आणि नव्याने स्थापन झालेला शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. खरे तर काँग्रेसमधून काढल्यानंतर शरद पवार यांनी वेगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केलेली होती. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात प्रचार केला होता. तरीही त्यांनी सत्ता स्थापन केली. ती सत्ता पुढे पंधरा वर्षे राहिली.

- Advertisement -

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेचा फायदा भाजप आणि शिवसेनेला झाला. तो पुढे विधानसभा निवडणुकीत आपल्याला मिळावा, असे शिवसेनेला वाटत होते. पण यावेळी भाजप मुख्यमंत्रीपदाची संधी सोडायला तयार नव्हता. कारण मोदींची लाट आहे याची त्यांना कल्पना होती. पण त्यातूनच युती तुटली. शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत दोन्हीही पक्षांना बहुमत मिळाले नाही. शिवसेनेने राज्यातील जनतेला बहुमताचे आवाहन करून भाजप सोबत आम्ही कधीही जाणार नाही, असे सांगितले होते, तरीही शिवसेनेला बहुमत मिळाले नाही.

हिंदुत्त्व हा आमचा मुद्दा आहे, असा शिवसेनेचा दावा असला तरी या संघटनेची स्थापना मराठी माणसांसाठी झालेली होती. हिंदुत्त्व हा विषय भाजपचा होता. पण पुढे जेव्हा शिवसेनेचा विस्तार विशेषत: मुंबईमध्ये अमराठी लोकांमध्ये करण्याची वेळ आली तेव्हा त्यांना आपल्या मर्यादा जाणवू लागल्या. त्यातूनच मग हिंदुत्त्वाचा मुद्दा घेऊन भाजपसोबत स्पर्धा सुरु झाली. आमचे हिंदुत्त्व हे पहिल्या धारेचे आणि भाजपचे दुसèया धारेचे असाही दावा शिवसेनेकडून करण्यात येऊ लागला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या ५२ व्या वर्धापनदिनी पुन्हा स्वबळाचा निर्धार केला आहे. तसा त्यांनी तो २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत केला होता. विविध राज्यांमध्ये स्वतंत्रपणे स्थापन झालेल्या प्रादेशिक पक्षांनी त्यांच्या राज्यात सत्ता स्थापन केली आणि त्यांचे मुख्यमंत्री पदारुढ झाले. त्याचे एक मुख्य कारण होते. ते म्हणजे त्यांनी आपल्या प्रादेशिक मुद्यावरून कधीही लक्ष कमी करून राष्ट्रीय पातळीवर जाण्याची धडपड केली नाही. शिवसेनेने हिंदुत्त्वाचा विषय घेऊन अधिक व्यापक होण्याची धडपड चालवली. त्यामुळे त्यांचा मूळ मराठी माणसाचा विषय मागे पडला. त्यामुळे ना धड प्रादेशिक ना धड राष्ट्रीय अशी शिवसेनेची अवस्था होऊन बसली. त्यामुळे राज्यात स्वत:च्या पक्षाची सत्ता आणता आली नाही.

आताही शिवसेनेला राष्ट्रीय पातळीवर विस्ताराचे वेध लागलेले आहेत. त्यांनी अन्य राज्यांमध्ये उभ्या केलेल्या उमेदवारांची डिपॉझिट्स जप्त होतात, तरीही शिवसेना त्यापासून काही बोध घ्यायला तयार नाही. शिवसेनेने सुरुवातीपासून आपले सर्व लक्ष मराठी माणूस या मुद्यावर केंद्रित केले असते, तर राज्यात सर्वत्र त्यांना शिरकाव करता आला असता. त्यामुळे राज्यात त्यांची स्वबळावर सत्ता स्थापन झाली असती, पण त्यासाठी लागणारा संयम शिवसेनेला दाखवता आला नाही. त्यामुळे सध्या त्यांची अवस्था ना घर का ना घाट का,अशी होऊन बसली आहे.


-जयवंत राणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -