घरफिचर्सतेवर मगन

तेवर मगन

Subscribe

‘तेवर मगन’ ही खुद्द कमल हासन आणि चंद्र हासन यांची ही निर्मिती होती. कथा कमल हासनने तयार केली होती. त्यासाठी इंग्रजीतील ‘गॉडफादर’ आणि कन्नडमधील ‘काडू’ यांचा आधार त्याने घेतला होता. त्याला पात्रयोजनेबाबत अनेक सूचना केल्या गेल्या. पण त्याने कुठलीच मानली नाही.

दोन समर्थ अभिनेते एकत्र आले की, प्रेक्षकांना ती एक मेजवानीच वाटते. अनेक चित्रपटांतून आपण हे पाहिले आहे. त्यात पुन्हा त्यापैकी प्रत्येकाचे कट्टर चाहते असतात आणि आपल्याच हीरोने कशी बाजी मारली आहे, ते पटवून देण्याचा ते प्रयत्न करत असतात. पूर्वी कुणी कुणाला खाल्ले आहे, असे म्हटले जात असे. खरं तर ते अभिनेते कथा आणि दिग्दर्शकानुसार काम करत असतात. पण चाहत्यांना ते मान्य नसतं. कारण असं की, कित्येकदा दिग्दर्शक सांगतो, त्यापेक्षाही बरेच काही ते करून जातात. दिग्दर्शक त्यांचे हे सामर्थ्य ठाऊक असल्याने, त्यांना अशी मोकळीक देतो. कारण त्याला काहीही झाले तरी, याचा फायदा चित्रपटालाच आहे हे ठाऊक असते.

- Advertisement -

काही वेळा हे दोन अभिनेते प्रसंग खुलवताना त्यात स्वतःची अशी जराशी भर घालतात, एखादा शब्द वा वाक्य असते. पण त्यानं परिणामकारकता एकदम वाढते. त्यातही अभिनेत्यांच्या समोर त्यांचा समकालीन असला, तर नकळतच स्पर्धा निर्माण झाल्यासारखे वाटते. पण जर तो नव्या पिढीतील असेल तर मग त्यांच्यातील जुगलबंदीला वेगळीच उंची लाभते. म्हणजे पृथ्वीराज कपूर आणि दिलीप कुमार यांचा मुगल-ए-आझम. त्यानंतर जवळपास वीस-बावीस वर्षांनी आलेल्या ‘शक्ती’मध्ये दिलीप कुमार समोर अमिताभ बच्चन होता आणि हीदेखील वडील मुलगा यांच्यातील द्वंद्वाची कथा होती. शक्तीनंतर दहा वर्षांनी तमिळ भाषेतील दोन सुपर स्टार एकत्र असलेला एक चित्रपट आला, ‘तेवर मगन’. म्हणजे तेवरचा मुलगा. त्याने दक्षिणेत चांगलीच हवा निर्माण केली होती आणि त्याला यशही चांगले मिळाले. नंतरच्या काळात त्यावर आधारित चित्रपट अनेक भाषांत आले. हिंदीमध्येही ‘विरासत’ची निर्मिती झाली.

‘तेवर मगन’ ही खुद्द कमल हासन आणि चंद्र हासन यांची ही निर्मिती होती. कथा कमल हासनने तयार केली होती. त्यासाठी इंग्रजीतील ‘गॉडफादर’ आणि कन्नडमधील ‘काडू’ यांचा आधार त्याने घेतला होता. त्याला पात्रयोजनेबाबत अनेक सूचना केल्या गेल्या. पण त्याने कुठलीच मानली नाही. दिलीप कुमारला पेरिया तेवरच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले. पण चित्रपटात खूप हिंसाचार आहे, या कारणाने त्याने नकार दिला. मग कमल हासनने शिवाजी गणेशन यांना विचारण्याचे ठरवले. ते नाही म्हणतील असे त्याला बर्‍याच जणांकडून सांगण्यात आले होते. तरीही तो विश्वासाने त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी तत्काळ होकार दिला. एवढेच नाही तर त्यांच्या चित्रीकरणाचा भाग त्यांनी फक्त सात दिवसांत पूर्ण केला.

- Advertisement -

चित्रपटाची कथा दोन सावत्र भावांतील, खरे तर चुलता, त्याचा मुलगा आणि पुतण्या यांच्या वैराची आणि त्यामुळे गावकर्‍यांना सहन कराव्या लागणार्‍या त्रासाची आहे. पेरिया तेवरचा मुलगा शक्तीवेल लंडनहून शिक्षण संपवून परततो. पण येताना तो आपली मैत्रिण भानू (गौतमी) हिला आणतो. पेरियाला हे आवडत नाही. कारण त्यांच्या घराण्यात लग्नासाठी मोठ्यांनी मुलगी पसंत करण्याची परंपरा. ती शक्तीने मोडली आहे. त्याने त्याबाबत आपली नाराजी प्रकट केली तरी तिच्याशी नीटपणे वागतो. शक्ती चेन्नईत हॉटेल्स उभी करायचा बेत करतो. पण पेरियाला त्याने गावकर्‍यांचे जीवन सुधारण्यासाठी येथेच राहून प्रयत्न करावे असे वाटत असते. गावाचा प्रमुख असलेल्या पेरियाला चांगलाच मान असतो. चिन्ना तेवर त्याचा विकलांग सावत्र भाऊ. माया तेवर हा पुतण्या. त्या दोघांचाही पेरियावर प्रचंड राग आहे.त्यांच्या दीर्घकालीन झगड्याचे चटके गावकर्‍यांना बसत आहेत. शक्य नसूनही सतत ते दोघे पेरियाची बरोबरी करण्याचा असफल प्रयत्न करत असतात.

शक्ती आपल्या मैत्रिणीसह बालपणीच्या आठवणींना उजाळा देत विविध ठिकाणी जातो. तेथे एका देवळाला कुलूप लावलेले त्यांना दिसते. ते मायाच्या आज्ञेवरून बंद करण्यात आले आहे. शक्ती ते नोकर-सहकारी असलेल्या एसाकीला तोडण्यास सांगतो. ही बातमी मायाच्या कानावर जाते आणि तो पेटून उठतो. गावात दंगल माजवतो. पेरिया ती शमवण्यासाठी माफी मागण्याचा विचार करतो, पण शक्ती त्याला मी आणि एसाकीने माफी मागायला हवी असे सांगतो. तो एसाकीला बघायला जातो तेव्हा शिक्षा म्हणून त्याचा हात मायाने तोडला आहे, हे त्याला दिसते. वातावरण शांत करण्यासाठी शक्ती पेरियाच्या परवानगीने तक्रार करतो आणि सरकारकडून देऊळ खुले करण्याची परवानगी मिळवतो. अपमानित झालेला माया भाडोत्री गुंडांच्या मदतीने पेरियाच्या पाठीराख्यांच्या भागाला पाणीपुरवठा करणारे धरण बॉम्बच्या सहाय्याने फोडतो. एका गावकर्‍याने एका गुंडाला तिकडे जाताना बघितलेले असते, पण त्याबाबत तो विचारही करत नाही. धरण फुटल्यानंतर एकच हलकल्लोळ होतो व अनेकांचा मृत्यू ओढवतो. शक्तीला बॉम्ब ठेवणारा गुंड दिसतो आणि पाठालाग करून तो त्याला पकडतो. पण गुंड त्याच्या कुटुंबियांच्या काळजीमुळे मायाबाबत काहीच बोलत नाही.

आता माया आपल्या जमिनीतून जाणार्‍या हमरस्त्याचा भाग बंद करतो. पंचायत बसते. विरुद्ध पुरावा नसल्याने माया आता पेरियावरच त्याने आपल्या कुटुंबियांवर हल्ले केल्याचा आरोप करतो. याबदनामीने पेरिया खचून जातो आणि त्याला हृदयविकाराचा झटका येऊन तो मरण पावतो. त्या रात्रीच उशीरा शक्ती आपल्या वडिलांची जागा घेतो आणि गावाचा प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारतो.

गावकरी हमरस्ता बंद झाल्याने लांबचा वळसा पडतो म्हणून शक्तीकडे तक्रार करतात. जमीनमालक परमशिवमला त्यांचे दुःख दिसते. पण तो मायाचा मामा असल्याने त्याला मायाचीच भीती वाटते. कारण त्याच्या मुलीचे-पंचवर्णमचे (रेवती) लग्न ठरले आहे. त्यात त्याला बाधा नको. पण शक्ती स्वतःच तिचे लग्न ठरवतो. परमशिवम सर्वांसाठी रस्ता मोकळा करतो. पण लग्नाच्या दिवशी मायाच्या भीतीने नवरा मुलगा पळून जातो. परमशिवम काळजीत पडतो, पण अखेर शक्ती स्वतःच त्याच्या मुलीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतो आणि त्याला बदनामीपासून वाचवतो. भानू परतते आणि तिला सत्य कळते. ती दुःखी झाली तरी परिस्थिती समजून घेते व परत जाते. शक्तीही सारे विसरतो.

संतापलेला माया गावच्या जत्रेत बॉम्ब ठेवतो आणि त्यात दोन्ही बाजूंच्या अनेक गावकर्‍यांचे प्राण जातात. आता मायाला अद्दल घडवण्यासाठी शक्ती सज्ज होतो. तो कुटुंबियांना आणि चिन्ना आणि त्याचे निष्पाप कुटुंबीय यांनाही दूर पाठवतो. ते कृतज्ञतेने मायाचा ठावठिकाणा सांगतात. शक्ती त्याला पोलिसांच्या स्वाधीन व्हायला सांगतो. द्वेषापोटी तो नकार देतो व सार्‍यासाठी शक्तीलाच जबाबदार ठरवतो आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. नंतर झालेल्या त्यांच्या अटीतटीच्या झटापटीत शक्तीकडून माया मारला जातो. सर्व खेडूत शक्तीवरील प्रेमामुळे आम्ही मायाच्या मृत्यूची जबाबदारी आमच्यावर घेतो असे सांगतात. पण शक्ती कुणाचेही न ऐकता पोलिसांच्या स्वाधीन होतो. आता तरी हा दीर्घकाळचा कलह संपेल या आशेने.

साधारण अडीच तासांचा हा चित्रपट प्रेक्षकांना जागीच खिळवून ठेवतो. कुठेही कंटाळवाणा न होता, प्रसंगांमागून प्रसंगांची मालिका सुरू राहते. प्रेक्षक बघत राहतात आणि चित्रपटाचा शेवट मात्र त्यांना सुन्न करून जातो. शिवाजी गणेशन यांच्या अखेरच्या चित्रपटांपैकी हा असावा. पण त्यातही पेरियाच्या भूमिकेत त्यांनी दाखवलेले बारकावे ध्यानात राहण्याजोगे. शक्तीने परदेशातून येताना बरोबर मैत्रिण आणल्याचे त्यांना मान्य नाही, पण मुलाला सांभाळून घेण्यासाठी ते तिच्याशी नीट वागतात हे त्यांनी अचूक दाखवले आहे. त्याचप्रमाणे शक्तीवर कितीही रागावले तरी त्याच्याबद्दलचे प्रेम काही त्यांना लपवता येत नाही हे त्यांच्या मुद्रेवरून स्पष्ट जाणवते. त्यांची अभिनयशैली काहीशी जुन्या धाटणीची असली, तरी ती कुठेही आक्रस्ताळी होणार नाही याची खबरदारी ते घेत असल्याचे जाणवते. कमल हासनने शक्ती समर्थपणे उभा केला आहे. माया तेवर नासरने प्रेक्षकांना चीड येईल, असा उभा केला यातच त्याचे यश आहे. काका राधाकृष्णन यांचा चिन्नाही प्रभाव पाडतो. एसाकीच्या भूमिकेत वडिवेलूने जान आणली आहे. दोन्ही नायिकांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे इतकेच. कारण त्यांना फारसे काम नाही.

या चित्रपटाची कहाणी सांगण्यासारखी आहे.1980 मध्ये मुक्ता श्रीनिवासन यांना शिवाजी गणेशन आणि कमल हासनला घेऊनच ‘गॉडफादर’वर आधारित चित्रपट करायचा होता. पण सारा भर शिवाजी गणेशन यांच्यावरच द्यावा लागेल म्हणून त्यांनी तो बेत रद्द केला होता. अखेर कमल हासनने स्वतःच सात दिवसांत कथा लिहून पूर्ण केली. सुरुवातीला तिचे नाव ‘नामवर’ असे होते, पण नंतर ते ‘तेवर मगन’ असे झाले. दिग्दर्शनासाठी कमलने मल्याळम दिग्दर्शक भारतन यांना पाचारण केले. त्यांनी केलेला हा अखेरचा तमिळ चित्रपट. त्यांची निवड किती सार्थ होती हे चित्रपट पाहताना कळते.

पी.सी. श्रीराम यांचे छायाचित्रण ही जमेची बाजू. त्यांनी निसर्गाचे सौंदर्य अचूक दाखवले आहे. प्रसंगातील गांभीर्याला साजेशी प्रकाश योजना तर आहेच, पण या बरोबरच कलाकारांच्या अभिनयातील सर्व बारकावे नीटपणे दिसतील याचीही काळजी घेतल्याने ते अधिकच प्रभावी झाले आहे. चित्रपटाचे बरेच चित्रण पोलाची येथे झाले होते आणि बाकीचे चेन्नई आणि ऊटीला. पोलाचीतील सुलुक्कल येथील मरिअम्मन देवळातही काही चित्रण झाले. हिंसाचाराला गौरवले म्हणून या चित्रपटावर टीकाही करण्यात आली होती. तर तेवर जमातीचा हिंसाचाराशी संबंध जोडल्यानेही काहीजण रागावले होते. चित्रपटात नऊ गाणी असून संगीत इलाया राजा यांचे आहे.

वैराचा अंत वैराने होणे शक्य नाही, तर तो कोणत्या ना कोणत्या प्रकारे संपुष्टात आणल्यानेच करता येतो हे कोणत्याही प्रकारची टिप्पणी वा भाषणबाजी न करता व प्रचारकी न होता, हा चित्रपट आपल्याला सांगून जातो. कमल हासनला अनेकदा पाहिले असेल, पण शिवाजी गणेशन यांना तमिळ चित्रपटसृष्टीत एवढे का मानले जाते हे हा चित्रपट पाहताना उमगते. तसे ते एकाच हिंदी चित्रपटामध्ये ‘राखी’मध्ये दिसले होते. तेवढ्यासाठी तरी हा चित्रपट बघायला हरकत नाही. चित्रपटाची मूळ प्रिंट उपलब्ध नाही, पण कॅसेटवर उपलब्ध असल्यानेच ही ठेव शाबून राहिली आहे.

.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -