ह्योच मुख्यमंत्री पाहिजे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानात शपथ घेतली. आज २८ एप्रिलला त्यांची पाच महिन्यांची कारकिर्द पूर्ण होतेय. या छोट्याशा काळात उद्धव ठाकरेंनी राज्याच्या जनमाणसाच्या मनावर पकड मिळवल्याचे चित्र दिसतंय. ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदावर आरूढ होणं, पुढे तीन पक्षांच्या मातब्बरांना घेऊन विधानसभा चालवणं आणि आता करोना सारख्या संकटात राज्याचा गाडा चालवणं... या गोष्टींची चर्चा जर २०१९ साली कुणी केली असती, तर त्याला भल्याभल्यांनी मुर्खात काढलं असतं. पण हे आता होताना आपण पाहतोय. एखाद्या वेबसिरीजमध्ये प्रत्येक एपिसोडनुसार नवनवीन रहस्ये उलगडत जातात. तसा प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणाने मागच्या सहा-सात महिन्यांत पाहिलाय आणि पुढेही याचे काही भाग आपल्यासमोर येणार आहेत.

Mumbai
minister uddhav thackarey
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लेखाच्या शीर्षकावरून कै. दादा कोंडके यांच्या १९८० सालच्या ‘ह्योच नवरा पाहिजे’ या चित्रपटाची आठवण होण्याची शक्यता आहे. पण तसे काही नाही. दादांचा चित्रपट आणि मुख्यमंत्री यांचा संबंध लावण्याचे कारण सोशल मीडिया. सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील कोट्यवधी जनता घरात आहे. अर्थातच बसल्या जागेवर मतप्रदर्शन करण्याचे साधन म्हणजे सोशल मीडिया. नुसतं उद्धव ठाकरेंचे नाव टाकले तरी अनेक रिझल्ट धडाधड येतात. काही समर्थन करणारे तर काही विरोध करणारे. मात्र, पहिल्यांदा सामान्य माणूस (म्हणजे ज्याचा कोणत्याही राजकीय पक्षांशी, विचारधारेशी, डाव्या-उजव्यांशी संबंध नाही) सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या बाजूने व्यक्त होताना दिसत आहे. अनेकांच्या व्यक्त होण्यातून ‘ह्योच मुख्यमंत्री पाहिजे’ अशी भावना प्रकट होताना दिसत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानात शपथ घेतली. आज २८ एप्रिलला त्यांची पाच महिन्यांची कारकिर्द पूर्ण होतेय. या छोट्याशा काळात उद्धव ठाकरेंनी राज्याच्या जनमाणसाच्या मनावर पकड मिळवल्याचे चित्र दिसतंय. ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदावर आरूढ होणं, पुढे तीन पक्षांच्या मातब्बरांना घेऊन विधानसभा चालवणं आणि आता करोनासारख्या संकटात राज्याचा गाडा चालवणं… या गोष्टींची चर्चा जर २०१९ साली कुणी केली असती, तर त्याला भल्याभल्यांनी मुर्खात काढलं असतं. पण हे आता होताना आपण पाहतोय. एखाद्या वेबसिरीजमध्ये प्रत्येक एपिसोडनुसार नवनवीन रहस्ये उलगडत जातात, तसा प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणाने मागच्या सहा-सात महिन्यांत पाहिलाय आणि पुढेही याचे काही भाग आपल्यासमोर येणार आहेत.

उद्धव ठाकरेंवर सध्या स्तुतीसुमने उधळली जात असली तरी सहा महिन्यांपूर्वी मात्र लोकांची मते वेगळी होती. २४ ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला. तेव्हा चित्र अगदी स्पष्ट होतं. भाजप अधिक शिवसेना स्पष्ट बहुमत. भाजप कार्यालयात जल्लोष होत होता.‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे फडणवीसच पुन्हा आले, या आनंदात भाजप कार्यकर्त्यांनी फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअपवर अक्षरशः धिंगाणा घातला. दुपार होईपर्यंत उद्धव ठाकरेंनी पहिला बॉम्ब टाकला आणि सत्तेत अर्धा अर्धा हिस्सा मागितला. थेट मुख्यमंत्रिपदासहीत. भाजपने सुरुवातीला शिवसेनेचे नेहमीचे नखरे म्हणून दुर्लक्षित केले. इथेच भाजप फसले. नेहमीप्रमाणे मातोश्रीची पायरी चढून मांडवली केली असती तर कदाचित आज चित्र वेगळे झाले असते. पण म्हणतात ना, राजकारणात कधीच काही सरळ होत नसतं. त्याप्रमाणे पुढचा महिनाभर जोरात राजकीय तमाशा रंगला. इथे तमाशा शब्द वापरण्याचं कारण की, यामध्ये सगळे रस ठासून भरले होते. करमणूक होती, नाट्य होतं, धाकधूक होती, टेन्शन होतं आणि वीर रस (आमदारांना धरून धरून आणलं) देखील होता. वेबसिरीज किंवा चित्रपटासाठी लागणारा सर्व मसाला होता.

२८ नोव्हेंबर रोजी जेव्हा मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. तेव्हा अनेकांना ती शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी चूक वाटली होती. काहींनी तर ही राजकीय आत्महत्या असल्याचंही म्हटलं. ज्यांनी कधीही साधं नगरसेवकाचं पद भूषविलं नाही, ते उद्धव ठाकरे २८८ आमदाराचं सभागृह आणि पाच विभागात विभागलेला, ३६ जिल्ह्यांचा आणि ३५० तालुक्यांचा, १२ कोटींच्या आसपास लोकसंख्या असलेला हा महाराष्ट्र कसा पेलतील? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते, पण कुरुक्षेत्रावर श्रीकृष्ण जसा अर्जुनाचे सारथ्य करत होता, तसे राज्याच्या राजकारणातील भीष्माचार्य मानले जाणारे शरद पवार उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले होते. पवारांच्या आशीर्वादानेच उद्धव ठाकरेंनी ही रिस्क घेतल्याचे बोलले गेले. पवार गाईड हातात घेऊन उद्धव ठाकरेंनीही राज्यासमोरील प्रश्न सोडविण्याचा विडा उचलला खरा. मात्र, सहा महिने पूर्ण होता होता अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न आल्यामुळे आता पवारांसहीत सर्वच बुचकळ्यात पडले आहेत.

उद्धव ठाकरे हे विधानसभेला उभे राहिले नव्हते. त्यामुळे विधान परिषदेवर त्यांना नियुक्त करावे लागणार आहे. २०१० साली राज्यात काँग्रेसचे सरकार असताना पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीतून राज्यात आणण्यात आलं होतं. तेव्हा त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली. ठाकरेंच्या बाबतीतही तसेच नियोजन होते. २४ एप्रिल रोजी विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ संपला. त्या रिक्त जागेवर मार्च महिन्यात निवडणूक जाहीर होणे गरजेचे होते, तर ६ जून रोजी राज्यपाल नियुक्त १२ जागा रिकाम्या होत आहेत. त्याच्याआधी धनंजय मुंडे परळीतून निवडून आल्यामुळे त्यांच्या विधानसभा सदस्य नियुक्त जागेवर संजय दौड तर यवतमाळ स्थानिक स्वराज संस्था निर्वाचित जागेवर दुष्यंत चतुर्वेदी यांची नियुक्ती करण्यात आली. या दोन्ही जागेवर ठाकरेंची निवड करणे जमले असते. पण तो नियोजनाचा भाग नसावा. कुणाला माहीत होतं तेव्हा, की करोना येईल आणि गेम पलटून टाकेल.

२८ मे २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा टाईम संपतोय. विधान परिषदेत त्यांची नियुक्ती झाली नाही तर त्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. राज्यपालांकडे ९ एप्रिलला मंत्रिमंडळाने ठाकरेंची शिफारस राज्यपाल नियुक्त जागेवर केली आहे. मात्र, त्याला काही उत्तर राज्यपालांकडून गेलेले नाही. हे सरकार कोसळणार अशी पुन्हा एकदा दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आणि त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले.

करोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात सुरू झाल्यापासून ठाकरेंची प्रतिमा उजळून निघालीये. देशात सर्वात आधी मॉल्स, थिएटर, जिम, स्विमिंग पूल बंद करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला होता. २२ मार्चचा जनता कर्फ्यू लागण्याआधीच महाराष्ट्रात भादंवि कलम १४४ म्हणजेच जमावबंदीचा कायदा लागू झाला होता. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील अर्ध्यातच स्थगित करण्यात आले होते. २४ मार्च रोजी जेव्हा मोदींनी लाईव्ह येऊन लॉकडाऊनची घोषणा केली, त्याच्याआधीपासून ठाकरे लाईव्ह येत होते. लोकांना धीर देत होते. त्यांच्या बोलण्यात कुठेही नाटकीपणा, लिखित भाषणाचे वाचन नव्हते. ते अडखळत होते, मुद्दे आठवत होते. पण मनापासून बोलत होते. ठाकरेंच्या घराण्याला लाभलेली वक्तृत्वाची जादू उद्धव यांच्यामध्ये दिसत नाही. तरीही त्यांनी उच्चारलेल्या वाक्यांनी लोकांच्या मनात घर केलं.

करोनाच्या संकटाच्या काळात ज्याप्रकारे उद्धव ठाकरे यांनी परिस्थिती हाताळली, त्याची दखल राज्यातील जनतेने घेतली आहे. मागच्या वीस वर्षांत कोणत्याही मुख्यमंत्र्यांला मिळाली नाही, तेवढी प्रसिद्धी ठाकरेंनी मिळवली आहे. आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांना पक्षाचा, महाराष्ट्रातील एखाद्या विभागाचा शिक्का असायचा. पण ठाकरेंनी शिवसेनेच्या विचारधारेला मुरड घातल्याचे दिसते. मुंबईचे असल्यामुळे त्यांचा झुकाव संपूर्ण राज्याच्या बाजूने दिसतो. पालघर लिंचिंग प्रकरणात तर त्यांनी जी प्रगल्भता दाखवली त्याचेही कौतुक सामान्यांनी केले आहे. आजपर्यंत जे लोक शिवसेनेच्या हिंदुत्ववादावर टीका करत होते, तेही आता उद्धव ठाकरेंचे जाहीर कौतुक करताना दिसतात.

मधल्या काळाता ट्विटरवर #UddhavResign आणि #MaharashtraWithCM् असे परस्पर विरोधी हॅशटॅग ट्रेंड होताना दिसले. ठाकरेंचा राजीनामा मागणारा हॅशटॅग भाजपकडून वापरला गेला होता. मात्र, ठाकरेंच्या समर्थनात जो हॅशटॅग वापरला गेला त्यात मुख्यत्वे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर सामान्य नेटीझन्सचा खूप मोठा सहभाग दिसून आला. विशेष म्हणजे #UddhavResign या हॅशटॅगमध्ये कॉपी पेस्ट कटेंट अधिक दिसत होता. याचा अर्थ हा कटेंट कुणीतरी देऊ केला होता. मात्र #MaharashtraWithCM् या हॅशटॅगमध्ये लोकांची स्वतःची मते दिसून आली. वर सांगितल्याप्रमाणे ज्यांचा राजकारणाशी मतदानाशिवाय संबंध नाही, त्याही लोकांनी उद्धव ठाकरे हेच बेस्ट सीएम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजकारणाची हवा कुठेही वाहत असली तर जनता मात्र ह्योच मुख्यमंत्री पाहिजे, असे म्हणताना दिसतेय.