रणजी ट्रॉफी विदर्भाच्या मेहनतीचे फळ

Mumbai
रणजी ट्रॉफी

रणजी स्पर्धेत लागोपाठ दोनदा जेतेपद पटकावणार्‍या मुंबई, दिल्ली, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र या संघांपाठोपाठ आता विदर्भाचे नावही आदराने घेतले जाईल. गेली सहा दशके चाचपडत खेळणार्‍या विदर्भाला अचानक सूर कसा गवसला असा सवाल अनेक जण करत असले तरी विदर्भाच्या या यशाचे गमक आहे ते अथक सराव, कुशल डावपेच आणि योजनांची यशस्वी अंमलबजावणी या त्रिसूत्रीत, यशाच्या या त्रिसूत्रीसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक चंदू पंडित आणि सुनील हेडाऊ यांच्या निवड समितीप्रमाणेच वसीम जाफर, गणेश सतीश या दोन ‘पाहुण्या’ खेळाडूंसह कर्णधार फैझ फझल व त्याच्या तरुण, तडफदार संघ सहकार्‍यांना द्यावे लागेल.

सलग दुसर्‍यांदा रणजी स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचा पराक्रम फैझ फझल आणि त्याच्या वैदर्भीय सहकार्‍यांनी केला तेव्हा जामठाच्या व्हिसीए स्टेडियमवर उत्सवी वातावरण होते. गेल्या वर्षी विदर्भाने इंदूरच्या होळकर स्टेडियमवर माजी विजेत्या दिल्लीला हरवून रणजी करंडकावर प्रथमच आपले नाव कोरले तेव्हा विदर्भाचा विजय फ्लुक होता, अशी टीका काही कुत्सित समीक्षकांनी केली होती. यंदा जामठाच्या घरच्या खेळपट्टीवर खेळताना विदर्भाने सौराष्ट्रावर ७८ धावांनी विजय मिळवून आपला विजय फ्लुक नव्हता हेच दाखवून दिले. रणजी स्पर्धेत लागोपाठ दोनदा जेतेपद पटकावणार्‍या मुंबई, दिल्ली, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र या संघांपाठोपाठ आता विदर्भाचे नावही आदराने घेतले जाईल. गेली सहा दशके चाचपडत खेळणार्‍या विदर्भाला अचानक सूर कसा गवसला असा सवाल अनेक जण करत असले तरी विदर्भाच्या या यशाचे गमक आहे ते अथक सराव, कुशल डावपेच आणि योजनांची यशस्वी अंमलबजावणी या त्रिसूत्रीत, यशाच्या या त्रिसूत्रीसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक चंदू पंडित आणि सुनील हेडाऊ यांच्या निवड समितीप्रमाणेच वसीम जाफर, गणेश सतीश या दोन ‘पाहुण्या’ खेळाडूंसह कर्णधार फैझ फझल व त्याच्या तरुण, तडफदार संघ सहकार्‍यांना द्यावे लागेल.

‘रणजी करंडक पटकावणे ही काही सोपी गोष्ट नाही. ४-५ दिवसांचे सामने ते देखील ११ जिंकणे हे काही फ्लुक नव्हते तरीदेखील कुणाला आमचा पहिला विजय ‘फ्लुक’ वाटत असेल तर आम्ही ते खोटे ठरवले आहे. दोन वर्ष कडक शिस्तीचा अवलंब करत आम्ही सराव केला तसेच वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीचे ध्येय समोर ठेवून जेतेपदाकडे वाटचाल केली‘, असे कर्णधार फैझने बोलून दाखवले.

दीड वर्षांपूर्वी नेमकं सांगायचं तर ७ ऑगस्ट 2017 रोजी चंदू पंडितची गाठ व्हिसीएचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य यांच्याशी पडली. त्यावेळी झालेल्या चर्चेत तीन प्रकारच्या खेळाडूंबाबत आम्ही बातचीत केली. काही जणांना नुसतं खेळायचं असतं तर काही जणांना ‘संघासाठी’ खेळायचं असतं. तिसर्‍या प्रकारच्या खेळाडूंना ‘वरच्या दर्जाचे’ क्रिकेट खेळायचे असते. त्यानुसार आम्ही योजना आखून संघ बांधणीसाठी सुरुवात केली. असे मनोगत चंदूने पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

डावपेच, शिस्त आणि प्रशिक्षणाची अनोखी पद्धत ही प्रशिक्षक चंदूची वैशिष्ठ्ये क्रिकेट जगतात सर्वश्रुत आहेत. यातून कधी-कधी वादंग माजले आहेत, परंतु प्रशांत वैद्य यांना त्याची पूर्ण कल्पना होती. विदर्भ क्रिकेट असोसिएशनला चंदू सारख्या कडक व करड्या शिस्तीच्या प्रशिक्षकाची गरज होती. वैद्य यांनी चंदूला ‘फ्री हँड’ दिला अन त्याचे परिणाम दीड वर्षांत स्पष्ट झाले आहेत. केवळ रणजी, इराणी नव्हे तर १९ वर्षांखालील युवकांसाठी कूचबिहार व विनू मंकड स्पर्धेतही विदर्भाने जेतेपद पटकावून चौफेर यश संपादन केले. यंदाही विदर्भाच्या युवकांनी कूचबिहार करंडकाच्या अंतिम फेरीत धडक मारली असून, सोमवारपासून त्यांचा अंतिम मुकाबला होईल तो उत्तर प्रदेशशी.

चंदू पंडित यांची गणना यशस्वी प्रशिक्षकांमध्ये केली जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखालील संघांनी (मुंबई, विदर्भ) गेली चार वर्षे रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत मुसंडी मारली असून, त्यापैकी तीनदा ते विजते ठरले आहेत. (२०१५-१६) (मुंबई), (२०१७-१८, २०१८१९) (विदर्भ), स्वतः खेळाडू म्हणून पंडित यांचा मुंबई रणजी विजेत्या चमूत समावेश होतो (१९८३-८४, १९८४-८५) त्यांच्याच प्रशिक्षक पदाच्या कारकिर्दीत मुंबईने (२००२-०३, २००३-०४, २०१५-१६) रणजी करंडक पटकावला होता. २०११-१२ च्या मोसमात पंडित यांच्याकडे राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या मेटॉर, डिरेक्टर ऑफ क्रिकेटची सूत्र होती.

यंदाच्या मोसमात आदित्य सरवटे, अक्षय वखरे या फिरकी जोडगोळीला घवघवीत यश लाभले. आदित्यने आपली छाप पाडताना अंतिम लढतीत ‘सामनावीर’ किताब पटकावला. ५७ धावात ११ बळी, शिवाय मोक्याच्या क्षणी ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत केलेल्या ४९ धावा विदर्भासाठी मौल्यवान ठरल्या. अंतिम लढतीचा आदित्य सरवटे हाच निर्विवाद मानकरी. रणजी स्पर्धेत बळीचे शतक, १००० धावांचा टप्पा अशी ‘दुहेरी’ कामगिरी करून आदित्यने एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीचे लक्ष निश्चितच वेधून घेतले असणार. २९ वर्षीय आदित्यच्या डावखुर्‍या फिरकीची जादू इराणी चषकाच्या सामन्यात दिसावी, अशी अपेक्षा आहे. निवड समिती सदस्य जतीन परांजपे हा त्यांच्या जमान्यातील शैलीदार डावखुरा फलंदाज म्हणून प्रसिद्ध असला तरी त्याला डावखुर्‍या फिरकीची निश्चित जाणकारी आहे. आदित्यला उत्तम साथ लाभली ती ऑफस्पिनर अक्षय व वरवरेची. अक्षयने यंदाच्या मोसमात ३४, तर आदित्यने ५५ मोहरे टिपून प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली, गेल्या मोसमात रजनीश गुरबानीच्या तेज, वेगवान मार्‍याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. दिल्लीविरुद्धच्या अंतिम लढतीत त्याने हॅटट्रिक नोंदवली होती.

या कामगिरीमुळे भारतीय ‘अ’ संघांचे दरवाजे गुरबानीला उघडले गेले. यंदाच्या रणजी मोसमात मात्र गुरबानीला अपेक्षित यश मिळाले नाही. याबाबत पंडित यांना आपली नाराजी लपविता आली नाही. विदर्भाच्या संघाला उमेश यादवचे पुनरागमन स्फूर्तिदायक ठरले. वायनाडला केरळ विरुद्धच्या उपांत्य लढतीत उमेशच्या तेज, तिखट मार्‍यापुढे मल्याळी फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली. अंतिम फेरीत व्हिसीएच्या फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर उमेशला यश लाभले नाही, परंतु तेज, तिखट मार्‍यांचा प्रसाद सौराष्ट्राच्या फलंदाजांना खासकरून स्नेल पटेलला बसला. ृ जिगरी स्नेलने शतक फटकावले, परंतु त्याला मेडिकल चेकअपसाटी हॉस्पिटलात जावे लागले ही बाबही लक्षात घ्यायला हवी. सौराष्ट्राच्या या छोट्या चणीच्या यष्टीरक्षक, फलंदाजाची इराणी चषक सामन्यासाठी शेष भारत संघात निवड झाली आहे.

वसीम जाफरने यंदाच्या मोसमात 1000 धावांचा टप्पा पार केला. रणजी स्पर्धेत दोनदा अशी कामगिरी करणार्‍या 41 वर्षीय जाफरचे सातत्य वाखाणण्याजोगे. कर्णधार फझल जाफरला ‘किंग’ म्हणतो. त्याच्या ‘किंग साईस’ धावांमुळे विदर्भाची कामगिरी उंचावली आहे. जाफरप्रमाणेच कर्नाटकाचा गणेश सतीश हा विदर्भाचा ‘पाहुणा’ खेळाडू. गणेशने जेतेपदात आपला खारीचा वाटा उचलला. जाफर, गणेश या सिनियर्सना फैझ फझलची उत्तम साथ लाभली.

ऑफ सीझन ट्रेनिंगचा आम्हाला पुष्कळ फायदा झाला असे नमूद करताना कर्णधार फैझ फझलने प्रशिक्षक पंडितांसह सपोर्ट स्टाफ, खेळपट्टीची निगराणी राखणारे माळी तसेच व्हिसीए पदाधिकार्‍यांचे आभार मानले. अंतिम लढत आटोपल्यावर व्हिसीए स्टेडियमवरील जल्लोषात खेळाडूंचे कुटुंबीय, तसेच पाठीराखे यांचाही उल्लेख करणे आवश्यक आहे. ‘लिफ्ट द कप अर्गन फैझ’ असे फलक घेऊन फैझच्या पाठीराख्यांनी विदर्भाचा विजय साजरा केला.

-शरद कद्रेकर