घरफिचर्सबँकेतून पैसे काढण्यासाठी सुरक्षित पर्याय कोणता ?

बँकेतून पैसे काढण्यासाठी सुरक्षित पर्याय कोणता ?

Subscribe

विथड्रॉवल स्लिप की चेक !!

बँक व्यवहारात पैसे भरणे व काढणे हे अटळ असे असते. त्यात गोंधळ वा फसवणूक होऊ नये. म्हणून कोणती खबरदारी घेतली पाहिजे, हेच आपण आज पाहणार आहोत. तसे पहिले तर बँकेत पैसे भरणे-काढणे हा अगदी सोप्पा व्यवहार, पण फसवणूक करणारे, घोटाळेबाज आणि भ्रष्टाचारी भुरटे अनेकदा आपल्या असहायतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणूनच आपण योग्य ती खबरदारी घ्यायला पाहिजे. तरच आपले पैसे सुरक्षित राहतील, बघूया नेमके काय काय करायला हवे. बँकिंग व्यवहार कसे अधिक सुरक्षित होतील हे शिकताना आपण अधिक अर्थसाक्षर बनूया.

कोणाला विचारले की, तुम्ही तुमचे बँकेतले पैसे कसे काय काढता? त्यावर अनेकांची अनेकविध उत्तरे येतील. उदाहरणार्थ- तरुण जय म्हणेल -ओह, जस्ट बाय डेबिट कार्ड ! तर अनुराधा म्हणेल – मी बाई एटीएम कार्डनेच पैसे काढते! आणि तात्या म्हणतील – मी तर बुवा, पेन्शनच्या दिवशी थेट बँकेत जाऊन महिन्याच्या खर्चाचे पैसे काढतो !! अशी ज्याची त्याची पद्धत असते. कोणती सोयीची व सुरक्षित ? हे कसे सांगणार?कारण आपल्याला दररोज एकेक घोटाळ्याच्या गोष्टी वाचायला मिळत असतात. ऐकीव गोष्टींमुळे आपण अनेकदा गांगरून जातो. नेमके काय करावे? बँक व्यवहारात पैसे भरणे व काढणे हे अटळ असे असते. त्यात गोंधळ वा फसवणूक होऊ नये. म्हणून कोणती खबरदारी घेतली पाहिजे, हेच आपण आज पाहणार आहोत. तसे पहिले तर बँकेत पैसे भरणे-काढणे हा अगदी सोप्पा व्यवहार, पण फसवणूक करणारे, घोटाळेबाज आणि भ्रष्टाचारी भुरटे अनेकदा आपल्या असहायतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणूनच आपण योग्य ती खबरदारी घ्यायला पाहिजे. तरच आपले पैसे सेफ राहतील, बघूया नेमके काय काय करायला हवे आणि बँकिंग व्यवहार कसे अधिक सुरक्षित होतील हे शिकताना आपण अधिक अर्थ-साक्षर बनूया.

- Advertisement -

पार्श्वभूमी – आजचे बँकिंग विश्व हे अतिशय वेगवान झालेले आहे. पूर्वीचा मिनिटांचा संथ -कूर्मगतीचा वेग आता अस्तित्वातच नाही. जे काही हवे आहे, ते म्हणजे, आज, आत्ता अगदी ताबडतोबीने !! उशीर, दिरंगाई असे लाल फितीत रुतले आणि इतिहासजमा झाले. आजच्या नेट-मोबाईल बँकिंगच्या जगात ‘एक क्लिक’ म्हणजेच सबकुछ, असा समज लोकप्रिय झालेला आहे. कारण तांत्रिकतेने जग छोटे केलेले आहे, ‘उशीर’ हा शब्द आता नाकारला जातो आहे. अशावेळी दैंनदिन पैसे काढणे व भरण्याचे व्यवहार अधिक सुलभ व कमी वेळात केले जात आहेत आणि अजून कमी वेळात व्हावेत अशी ग्राहकांची वाढती अपेक्षा आहे. वेगाबरोबर वेगवान राहण्यासाठी इलेक्ट्रॉनिक-डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर होतो आहे. पैसे भरणे आणि काढणे हे नित्य-बँकिंग व्यवहार तत्परतेने होणे हे तीव्र स्पर्धेचा भाग झालेले आहे.

कॅश विथड्रॉवल -पैसे काढण्यातील सुलभता – गेली अनेक दशके पैसे काढणे ही प्रक्रिया एकाच पद्धतीने चालू आहे, मात्र मोबाईल -इंटरनेट युगाने सेवेची व्याख्या व परिमाणे बदलली. मुळात बँकांना आपली सेवा देताना खर्चात कपात करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे वाटले. अधिक कर्मचारी संख्या कमी करून कॉस्ट कमी करण्याचा नामी उपाय त्यांनी शोधला . म्हणून खातेदारांनी बँकेत न येता त्यांना बाहेरच्या बाहेर बँकिंग-सेवा मिळावी म्हणून यंत्र-तंत्राचा सदुपयोग केला गेला. आणि म्हणूनच गेली अनेकवर्षे नाक्या-नाक्यावर ‘एटीएम बूथस ’ उभे राहिले. बँकांच्या कामकाजाच्या वेळातच व्यवहार करता येतील! ही कालमर्यादा आपोआप गळून पडली. आपल्याला हवे तेव्हा पैसे काढण्याची तीही हवे त्याठिकाणी सुविधा सोयीची होऊन बसली, इतकी की लागेल तेव्हा पैसे काढण्याचे चक्क व्यसनच लागले. म्हणून तर सतत पैसे काढण्यावर काही प्रमाणात निर्बंध आले.

- Advertisement -

पारंपरिक पद्धत – आज जरी आपण डिजिटल बँकिंगचा सर्रास वापर करत असलो, तरीदेखील अनेकदा व अनेक ठिकाणी अजूनही पैसे काढण्यासाठी बँकेच्या आवारात गेल्यावर तिथे मिळणारी ‘विथड्रॉवल स्लिप’ भरून अपेक्षित रक्कम रोखीने काढण्याची सोय होते. पन्नास हजार किंवा तत्सम मोठी रक्कम रु 20,000/- पेक्षा अधिक पैसे काढण्यासाठी बँका ‘चेक’ या साधनाचा वापर करण्याचा आग्रह धरतात. स्लिप वापरून पैसे काढणे हे सोप्पे असते, अगदी अशिक्षित खातेदारालादेखील आपले पैसे सहजपणे काढता येतात. आजारी तसेच वयोवृद्ध व्यक्तीदेखील आपले पैसे काढू शकते. चेक-बूक न घेता बँकेत गेलो आणि बरोबर पासबूक असेल तर आपल्याला अशा स्लिपद्वारे खात्यातील पैसे विनासायास काढता येतात.

चेकने पैसे काढणे – जसे आपल्याला स्लिप वापरून पैसे काढता येतात, तसे त्याच बँकेच्या बेअरर चेकने रोख पैसे काढता येतात. क्रॉस न केलेला चेक म्हणजेच बेअरर. चेक क्रॉस करणे म्हणजे त्यावर दोन समांतर रेषा मारल्या आणि अकाऊंट पेयी असे शब्द लिहिले की, तो चेक खात्यातच टाकावा लागतो. त्याचे पेमेंट बँकेच्या खात्यातूनच मिळते. अपवादात्मक परिस्थितीत क्रॉस केलेला चेक क्रॉसिंग कॅन्सल करून रोख मिळवता येते. अन्यथा नाही. चेकने केलेले व्यवहार हे सुरक्षित असतात. अर्थात चेकवर खोट्या सह्या करणे, रक्कम बदलून वाढवणे, नाव बदलणे, तारीख बदलून खाडाखोड करणे असे अनेक गैरप्रकार होत असतात आणि प्रामाणिक खातेदारांच्या पैशाची अफरातफर केली जात असते. योग्य खबरदारी घेतली तर अशी फसवणूक टाळता येते, म्हणूनच अधिकाधिक अर्थसाक्षरता व डोळस होणे अत्यावश्यक आहे.

स्लिप आणि चेकद्वारे कॅश काढणे – स्लिप असो किंवा चेक ही दोन्ही साधने बँकेतील खात्यातील आपलेच पैसे काढण्याचा अधिकृत मार्ग. स्लिप ही जरी सोयीची असली तरी मोठी रक्कम काढता न येणे ही एक मोठी मर्यादा आहे. अशावेळी चेक-बुकसहित चेक असणे जरुरीचे. चेकच आणखीन एक फायदा असा की, स्वतः बँकेत न जाता आपल्या विश्वासू स्टाफला, कुटुंबातील माणसाला बेअरर चेक दिला की, पैसे काढता येतात. चेकने पैसे काढण्यावर अमुकच वेळा काढता येणे, अतिरिक्त चेकबूकसाठी पैसे मोजायला लागणे अशा काही अंगभूत मर्यादा असल्या तरीही तुलनेने चेक हे माध्यम सोयीचे व सुरक्षित मानले जाते. स्लिप कुणा त्रयस्थाच्या हाती लागली, तर बँकेला कसे कळणार? अनधिकृत व्यक्तीदेखील हाती लागलेल्या स्लिपद्वारे दुसर्‍याचे पैसे नेऊ शकते. हा मोठा धोका आहे. असे समजा चेकबाबत घडले तर चेक-नंबर सांगून होणारे पेमेंट थांबवता येते. अनर्थ टाळता येतो. स्लिपला अशी नंबरची सुविधा नसल्याने बँकेकडे काही कंट्रोल राहत नाही.

म्हणून काही बँकांनी स्लीपचा वापर न करता खातेदारांनी रोकड पैसे काढण्यासाठी फक्त चेकचा वापर करावा असे सांगितले आहे. फ्रॉड किंवा गैरप्रकार होऊ नयेत व बँक-ग्राहकांच्या हिताचे रक्षण व्हावे हा हेतू निश्चित चांगला आहे. पण चेकचा अधिक वापर झाल्यास वाढीव चेकसाठी पैसे देण्याचा भूर्दंड खातेदारालाच सोसावा लागणार ! याचा कोण विचार करणार? मुळात चेक छापणे व अन्य प्रशासकीय खर्च होतात म्हणून चेक वापरण्याबाबत काही मर्यादा येतात. आता तर अनेक खातेदार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपले पैसे /पेमेंट करीत असतात. म्हणून चेकचा वापर तितकासा होत नाही. अधिक प्रमाणात चेकबूक घेणे हे तसे खर्चिकच असते, कारण ठराविक चेकबूक मोफत दिल्यानंतर पुढील चेकबूक्ससाठी पैसे मोजावे लागतात. एकीकडे सरकार चेकचा वापर कमी करा आणि डिजिटल पेमेंट करा, असे सांगत असते. अशावेळी विथड्रॉवल स्लिपऐवजी चेकचा वापर सुरु करणे कितीही सोयीचे व सुरक्षित असले तरीही खर्चिक व बँक कामकाज वाढवणारे असणार आहे. रोखीने होणार्‍या पेमेन्टवर नियंत्रण मिळवण्यासाठी चेकचा वापर सोयीचा आहे, मात्र स्लिप-सिस्टीम कायम बाद होऊ शकेल का? सर्व बँकांना -सर्वच बँक-ग्राहकांना हा बदल परवडणार आहे का? देशाच्या मध्यवर्ती बँकेची नेमकी भूमिका काय असणार आहे?

विथड्रॉवल स्लिप व चेक – भेद
स्लिप- ज्याप्रमाणे आपल्याला खात्यात पैसे /चेक भरताना डिपॉझिट स्लिप भरावी लागते, तशीच पैसे काढताना विथड्रॉवल स्लिप, हे एक सर्व बँकांतील अंतर्गत व्यवहारांसाठी वापरले जाणारे साधन आहे. नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट नव्हे.
चेक – हे एक कायदेशीर साधन आहे, ज्याला नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असे म्हणतात.
स्लिप- स्लिपने पैसे ट्रान्स्फर करता येत नाहीत, फक्त काढता येतात.
चेक- चेकद्वारे खातेदाराला पैसे ट्रान्स्फरदेखील करता येतात.
स्लिप- स्लिपने पैसे काढताना पासबुक सोबत ठेवणे गरजेचे असते.
चेक- बेअरर चेक दिला असेल तेव्हा पासबूक जवळ असण्याची जरुरी नसते.
स्लिप- पे -ऑर्डर किंवा बँकर्स चेक तयार करण्यासाठी काही बँकांत स्लीपचा वापर चालतो.
चेक- पे-ऑर्डर /डिमांड ड्रॅफट घेताना चेकने पेमेंट करता येते.
स्लिप- ज्यांना चेकबूक सुविधा मिळत नाही,त्यांना स्लिप वापरून पैसे काढणे सोयीचे असते.
चेक- चेक असेल तर स्लिप वापरून पैसे काढण्याची गरज नाही.
स्लिप- अशिक्षित/अंध व बालक अशा खातेदारांच्या सोयीसाठी स्लिप वापरता येते.
चेक- चेकचा वापर बहुविध व्यवहार करण्यासाठी करता येतो.
स्लिप आणि चेक दोन्ही साधनांत पुढील बाबी समान असतात –
व्यवहाराची तारीख / नाव / रक्कम -शब्द आणि अक्षरात/स्वाक्षरी
शिवाय दोन्ही साधने ही प्रत्येक बँक आपली स्टेशनरी म्हणून छापते, अनधिकृत साधने चालत नाहीत.

ज्यांच्याकडे डेबिट-क्रेडिट किंवा एटीएम कार्ड्स असतात त्यांना आपल्या खात्यातील पैसे काढण्यासाठी स्लिप किंवा चेकची गरज भासत नाही. आता तर काय इंटरनेट आणि मोबाईलमुळे बँकिंगमधील अनेक व्यवहार जलद व सुकर झालेले आहेत.

आजवर छोटी रक्कम काढण्यासाठी स्लीपचा वापर करणे हे सोयीचे आहे. कारण एकतर सर्व खातेदारांकडे चेक-बूक सुविधा असतेच असे नाही. शिवाय फ्री चेकबूक्स ही मोजकीच असल्याने अधिक वापर केल्यास बँकेला पैसे द्यावे लागतात. म्हणून अनेकजण स्लीपचा अधिक वापर करून स्वतः बँकेत जाऊन पैसे काढणे प्रिफर करतात. पण समजा स्लिप वापरूच नका. कारण त्यामुळे कॅश काढणार्‍यांवर नजर वा नियंत्रण ठेवता येत नसेल व एकूण डेटा चेकनंबर मार्फत अधिक सुरक्षितपणे होऊ शकतील अशी अटकळ असल्यास तशी पद्धत अंमलात येऊ शकते. मात्र सर्वच खातेदारांना चेक घेणे व वापरणे परवडणार आहे का? कोणताही असा महत्वपूर्ण निर्णय घेताना व वास्तवात आणताना वस्तुस्थितीचे भान व आकलन असणे जरुरीचे आहे. कारण सुविधा जरी असंख्य झाल्यातरी वापर, सोय आणि खर्चाचा भार कोण उचलणार हे मुद्दे साहजिकच कळीचे ठरतात. सर्वसामान्य खातेदाराला सुरक्षित व्यवहाराची अपेक्षा असते. अतिरिक्त चार्जेसचा भार त्याला डोईजड झाल्यास तो बँकेच्या विश्वापासून दूर गेला तर ? याचा आवर्जून विचार व्हावा.

आर्थिक शिस्त ही हवीच तरच खातेदार असलेल्या सोयीचा दुरुपयोग करणार नाहीत, पण शिस्तीचा जाच आणि भार वाटायला नको. घोटाळे करू पाहणार्‍या मंडळींना शिरकाव करता येणार नाही अशी अभेद्य तटबंदी बांधलीच पाहिजे. कारण खातेदारांचा पैसा आणि विश्वास हा सुरक्षित व अबाधित रहायला हवा. विथड्रॉवल स्लिपच्या बेसुमार वापरावर नियंत्रण हवे, चेक वापरात आले तर नंबरच्या साहाय्याने पेमेंटचा प्रवास पडताळता येईल व काही गडबड शोधता येईल. पण चेकसाठी पैसे द्यावे लागतील आणि अति-वापर रोखला जाईल. बँकांनी जरी हे ठरवले तरी ग्राहकांचे हित व सोय बघायला हवीच , नाही का? कारण ग्राहक आहेत, म्हणून बँका आहेत !!

-राजीव जोशी -बँकिंग व अर्थ-अभ्यासक 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -