सिझेरियन प्रसूती – समज, गैरसमज

Mumbai

पहिली प्रसूती सी-सेक्शन शस्त्रक्रियेने झाली असेल तर दुसरे मूलही सी-सेक्शन प्रसूतीनेच होते, असा महिलांचा गैरसमज आहे. दरवर्षी भारतात सी सेक्शन शस्त्रक्रियेने ६.६ दशलक्ष बाळांचा म्हणजे आयर्लंडच्या लोकसंख्येएवढ्या बाळांचा जन्म होतो. बीएमसी पब्लिक हेल्थच्या अहवालानुसार भारतात हॉस्पिटलमध्ये होणार्‍या प्रसूतीमध्ये वाढ होण्याबरोबरच सिझेरियन सेक्शन करून होणार्‍या प्रसूतींमध्येही वाढ झाली आहे.

यासंदर्भात २२,१११ प्रसूतींचे विश्लेेषण केल्यानंतर ४९.२% प्रसूती सार्वजनिक वैद्यकीय केंद्रांमध्ये झाल्या, ३१.९% प्रसूती खासगी वैद्यकीय केंद्रांमध्ये झाल्या तर १८.९% प्रसूती घरी झाल्या. सार्वजनिक वैद्यकीय क्षेत्र आणि खासगी क्षेत्रात झालेल्या प्रसूतींमध्ये सी-सेक्शन प्रसूतींचे प्रमाण अनुक्रमे १३.७% व ३७.९% इतके होते. यातून असे दिसून येते की, खासगी वैद्यकीय केंद्रांमध्ये होणार्‍या सी-सेक्शन प्रसूतींचे प्रमाण सार्वजनिक वैद्यकीय क्षेत्राच्या तुलनेने तिप्पट होते.

एकदा सिझेरियन झाल्यावर नेहमी सिझेरियनच करावे लागते यामध्ये अलीकडच्या काळात फारसे तथ्य राहिलेले नाही. पहिली प्रसूती सी-सेक्शन शस्त्रक्रियेने झाली असेल तर दुसरे मूलही सी-सेक्शन प्रसूतीनेच होते, असा महिलांचा गैरसमज आहे. एखादी माता पुन्हा सामान्यपणे (व्हीएबीसी) प्रसूत होऊ शकते किंवा नाही यासंदर्भात पती व पत्नीचे समुपदेशन करण्यात येते. व्हीएबीसीला टोलॅक (ट्रायल ऑफ लेबर आफ्टर सिझेरिअन) असेही म्हणतात. अर्थात, व्हीएबीसी करताना काही घटक लक्षात घेणे गरजेचे असते. तरुण, सुदृढ महिलेची पहिली प्रसूती सी-सेक्शनने झाली असेल तरी ती दुसर्‍या खेपेला सहज सी-सेक्शन प्रसूती करू शकते. सक्रिय जीवनशैली, सामान्य प्रकृती (विशेषतः रक्तदाब) आणि गर्भाची योग्य स्थिती (डोके खालच्या बाजूस) हे सामान्य प्रसूतीचे द्योतक असतात.

व्हीएबीसी कधी शक्य आहे?
सिझेरियन शस्त्रक्रियेमध्ये तुमचे डॉक्टर तुमच्या पोटाला आणि गर्भाशयाला छेद देतात आणि बाळाचा जन्म होतो, तर आधीच्या सिझेरियनमध्ये आडवा छेद कमी दिला असेल तर गर्भाशय फाटण्याची शक्यता कमी असते.

व्हीएबीसी कधी करू नये?
बाळ पायाळू स्थितीत असेल
बाळाचा आकार मोठा असेल
बाळाच्या नाडीच्या ठोक्यांचा वेग कमी होत असेल
गर्भाशयाला प्लॅसेन्टाने कव्हर केले असेल
पहिल्या प्रसूतीच्या वेळी ज्या महिलांची प्लॅसेन्टा कमी असेल

व्हीएबीसी यशस्वी होण्याची शक्यता खालील घटक ढोबळपणे वाढवतात –
आधीच्या सिझेरियन प्रसूतीमध्ये गर्भाशयाला आडवा छेद कमी दिला असेल.
सामान्य आकाराचे बाळ सामावून घेण्यासाठी पुरेसा श्रोणीभाग.
एकच भ्रूण असलेली गर्भावस्था.
बाळ पायाळू असल्यामुळे किंवा इतर वैद्यकीय समस्येमुळे पहिली प्रसूती सिझेरियन शस्त्रक्रिया केली असेल आणि या गरोदरपणात ती परिस्थिती नसेल, म्हणजे तीच लक्षणे पुन्हा दिसत नसतील.

-डॉ. अनु विज, स्त्री रोगतज्ज्ञ