शेतकरी महिलांनो आरोग्य सांभाळा

Mumbai
farmer lady

शेतकर्‍याला शेतीकामात लाख मोलाची साथ लाभते ती घरातील महिला वर्गाची. घरातील कामे आटोपून लागलीच त्याच्या मागे तिही शेती कामासाठी दिवसाचे १४ ते १८ तास काम करते. जनावरांचे गोठे साफ करणे, दूध काढणे, जनावरांना चारा व पाणी देणे इत्यादी कामे तसेच शेतीतील पूर्व मशागतीपासून धान्य घरात येईपर्यंत, धान्य साठवणूक, वाळवणी आणि विविध हंगामांत गृहोपयोगी पदार्थ तयार करण्यासारखी कामे महिला वर्षानुवर्षे करतात. हे सर्व करत असताना शेतकरी महिला स्वतःच्या आरोग्याकडे, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

शेती कामे, अवजारे यांचा आरोग्यावर परिणाम
आजही खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग शेतीसाठी पारंपरिक अवजारे, हत्यारांचा वापर करत आहे. ही पारंपरिक अवजारे वजनाने जड असल्याने त्यामुळे पाठीचा मणका, पायांच्या स्नायूंवर व गुडघ्यावर ताण येतो. मणक्यांना आजारामुळे जसे डिस्कस्लीप होणे, चक्कर किंवा अंधारी येणे, हातांची बोटे न वळणे, सांधे आकडणे, मान वळवण्यास त्रास होणे, उठ-बस करण्यास त्रास होणे इत्यादी आजार शेतकरी महिलांना होतात.

आहाराकडे होणारे दुर्लक्ष अनारोग्याला निमंत्रण
सकस आहाराचा अभाव व अस्वच्छतेमुळे आजार उद्भवतात. वारंवार शिळे अन्न खाणे, अपुरे, अपौष्टिक व अवेळी जेवण, वारंवार उपवास करणे, इत्यादींमुळे शेतकरी महिलांमध्ये कुपोषण होऊन अशक्तपणा, रक्तक्षय, गलगंड, पित्ताच्या तक्रारी, अल्सर, कंबरदुखी, पाठदुखी, हाडे सच्छिद्र व ठिसूळ होणे (ऑस्टिओपोरॅसिस) इत्यादी आजार उद्भवतात. अपौष्टिक आहारामुळे गर्भावस्थेत व स्तनदा मातांमध्ये अशक्तपणा, रक्ताक्षय, रांतांधळेपणा, गर्भपात तसेच प्रसूतीत बालमृत्यू व कुपोषित बालकांचा जन्म यासारख्या भीषण समस्या उद्भवतात.

असे सांभाळा आरोग्य
मोड आलेली कडधान्ये, ताजी फळे व भाजीपाला याचा आहारात समावेश करावा. आहारात प्रक्रियायुक्त सोयाबीन, लिंबू, दूध, दही, शक्य असल्यास मांस, मासे, अंडी तसेच मिश्रधान्य व कडधान्य यांचा वापर करून सकस आहार घ्यावा. आजारांची भीषणता व त्यांचा स्वतःवर, कुटुंबावर व समाजावर होणारा विपरित परिणाम लक्षात घेऊन महिला शेतकर्‍यांनी जागरुक रहावे. ताप, सर्दी, खोकला, त्वचेचे आजार, संधिवात आदी आजारांकडे दुर्लक्ष न करता जवळच्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये तपासणी करावी, उपचार घ्यावेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here