‘नौकासन’ करून शरीराचा बांधा करा सुडौल

Mumbai

शरीराचा बांधा सुडौल करण्याकरिता नौकासनाविषयी जाणून घेऊया. या आसनात शरीराची स्थिती नौकेप्रमाणे होत असल्याने या आसनास नौकासन असे म्हटले जाते. लठ्ठपणा, बद्धकोष्ठता, मधुमेह, भूक न लागणं, गॅस, अपचन असे पोटाचे अनेक विकार बरे होतात. मात्र हर्निया, पोटावर शस्त्रक्रिया झाली असेल किंवा आतड्यांमध्ये जखम असेल, पेप्टिक अल्सर असेल तर त्या व्यक्तींनी हे आसन करू नये.

‘नौकासन’ केल्याचा फायदा

 1. पाठीच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढवण्यास उपयोग होतो.
 2. पचनाच्या तक्रारींवरही हे आसन अधिक उपयुक्त ठरते.
 3. लठ्ठपणा दूर करण्यासाठी नियमित ‘नौकासन’ करावे.
 4. मधुमेह, भूक न लागणे याकरता हे आसन करावे. त्याबरोबरच जांघ, पोट आणि कंबरेचे स्नायू यांना ताकद देण्यासाठी हे आसन नियमित केल्यास फायदा होतो.
 5. संपुर्ण रक्त पुरवठा उत्तम तसेच सुरळीत करण्यासाठी हे आसन करावे. तसेच हृदय आणि फुफ्फुसं यांना मजबुती मिळण्यास मदत मिळते.
 6. रोज १० मिनिटे ‘नौकासन’ केल्यास शरीर सुडौल बनवून मज्जारज्जूंना स्वस्थ राहण्यास सहाय्य मिळते.

असे करा ‘नौकासन’

 • पोटावर झोपा. आता दोन्ही हात सरळ समोर ठेवा. तुम्ही जसा नमस्कार करता तसे दोन्ही हात एकत्र करा. दोन्ही पायही एकत्र राहतील.
 • आता श्वास घेत हात आणि डोक वर उचला. त्याबरोबरच पायही वरच्या बाजूला उचला.
 • हात आणि पाय जास्तीत जास्त वर उचलल्यानंतर श्वासोच्छ्वास सामान्य ठेवून, जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ आसनाच्या या स्थितीमध्ये थांबा.
 • इथे शरीराची आकृती एखाद्या नावेप्रमाणे होईल. नंतर हळूहळू श्वास सोडत हात आणि पाय दोन्ही जमिनीवर आणा.
 • रोज दोन ते तीन वेळा हे आसन करा.

श्वासस्थिती 

मेरुदंडास मागे बाक देणा-या कोणत्याही आसनामध्ये श्वास रोखून धरण्याची प्रवृत्ती साहजिकपणे होते. म्हणूनच विशेष दक्षता बाळगून श्वासोच्छ्वास जाणीवपूर्वक चालू ठेवावा. रोखून धरू नये.