कंदिलाची झगमगणारी दुनिया

रंगीबेरंगी कंदिलाने सजली माहिमची कंदिल गल्ली.

Mumbai
mahims kandeel galli is all set for diwali 2019
कंदिलाची झगमगणारी दुनिया

दिवाळी सण म्हणजे दारापुढे लावण्यात येणाऱ्या पणत्या आणि दारासमोर काढण्यात येणाऱ्या विविध रंगानी काढलेल्या रांगोळ्या. तसेच फटाक्यांची आतषबाजी, रोषणाईसाठीच्या दिव्याच्या माळा आणि मुख्य म्हणजे घराची शान वाढवणारा आणि लख्ख प्रकाश पाडणारा पारंपारिक आकाश कंदिल. या आकाश कंदिलामुळे अवघा रस्ता प्रकाशमान होऊन जातो आणि खऱ्या अर्थाने ‘दिवाळी’चा महौल तयार होतो. या आकाश कंदिलाची खरी खासियत पाहायला मिळते ती म्हणजे मुंबईतील माहिम येथे असणाऱ्या ‘कंदिल गल्ली’ मध्ये.

गेल्या अनेक वर्षांपासून जपणारी पारंपरिक कंदिलाची परंपरा या कवळी वाडित अजून ही पाहायला मिळते. सध्याच्या काळात चायना कंपनीची कंदिले बाजारात दाखल झाली असली तरी या वाडित प्रत्येक जण बांबूच्या काठ्यांपासून बनवलेली पारंपरिक कंदिले बनवण्यात दंग झाला आहे. कंदिलाचे विविध प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. अनेक मंडळीने विक्रिसाठी कागदाचे आणि कापडाचे कंदील तयार केले आहेत. तर अनेकांनी कागदाच्या आणि त्यात ही पारंपरिक कंदीलाना जास्त पसंती आहे. यामध्ये आकाश कंदील, मटका कंदील, चांदणी कंदील, कापडी कंदील अशा विविध प्रकारच्या कंदिलाची रेलचेल दिसून येते. सध्या यातील लहान आकाराचा कंदील साधारण २५० ते ३०० रुपयांपर्यंत आहे तर मोठ्या कंदीलाची किंमत ४५० ते ५०० अशी आहे. दिवाळीला अजून ही थोडा अवकाश असल्याने या किंमती कमी असून, दिवाळी दोन ते तीन दिवसांवर आल्यावर त्यांच्या किंमती वाढतील. शिवाय पारंपरिक कंदीलांना एक वेगळा टच पाहायला मिळेल. आम्ही तब्बल १० तास कंदिलाची विक्रि करतो. असे विक्रेते पवन धुरी यांनी सांगितले.

कवळी वाडिची ओळख

मुंबईत कवळी वाडित कंदील बनवण्याची सुरुवात पेडणेकर काकांनी केली. ते वेगवेगळ्या प्रकारचे कंदील बनवत असत. दरवर्षी त्यांच्या घरी दिवाळीकरता पारंपरिक कंदील बनवून विकले जायचे. ते काका दरवर्षी कंदील बनवतात हे पाहून आजुबाजूच्या शेजाऱ्यांनी कंदील बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर पूर्ण कवळी वाडि आणि राववाडिने कंदील बनवण्याची कला जोपासली. त्यामुळे आता प्रत्येक घराघरात कंदील बनवले जातात, यावरून कवळी वाडिची ओळख ‘कंदील गल्ली’ म्हणून नावलौकिक आहे.

आकाश कंदिल

आकाश कंदिल बनवणे हे फार जिकरीचे असते. आकाश कंदिल बनवण्यासाठी बांबुच्या काठ्या, पतंग पेपर, गोल्डन चांदी, क्रेप पेपर, दोरा आणि कात्री, असे साहित्य लागते. हे कंदील बनवण्याकरता प्रथम बांबूच्या काठ्यांना समप्रमाणात खाचा पाडून त्यानंतर चौकोन तयार करावे लागतात. त्यानंतर हे चौकोन मोठ्या काठीला जोडून त्याचा सांगाडा बनवावा लागतो आणि नंतर पतंग पेपर कापून त्यावर लावण्यात येतो. तसेच आपल्याला हवी ती डिझाईन त्यावर देऊन गोल्डन चांदी लावण्यात येते. त्याचप्रमाणे आकाश कंदील वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवण्यात येत असून त्यावर सुंदर, असे नक्षी काम देखील केले जाऊ शकते. यामध्ये रेनबो, चटई, नेकलेस, गालीच्या, पिळाचा पंखा आणि पिळाचे, असे एक ना अनेक डिझाईन या आकाश कांदिलामध्ये बनवू शकतो. यामध्ये जास्तीत जास्त पिळाचे कंदीलाला सर्वात जास्त मागणी असून हे कंदील दिड फूट उंचीचे असून हे बनवण्याकरता तब्बल ४ तास लागत असून या कंदिलाची किंमत ४५० रुपये ते ५०० इतकि असते.

चांदणी कंदील

चांदणी कंदिल हे दोन प्रकारामध्ये बनवण्यात येते. एक म्हणजे कापडापासून तर दुसरे कागदापासून बनववले जाते. हे कंदील बनवताना बांबुच्या छोट्या – मोठ्या काठ्या, पतंग पेपर, रंगीत कापड, दोरा असे साहित्य लागते. प्रथम बांबूच्या काठ्यांना समप्रमाणात खाचा पाडाव्या लागतात. त्यानंतर खाचा पाडून चांदणीच्या आकाराचा सांगाडा तयार करावा लागतो. कापडी कंदील हवे असल्यास कापड वापरले जाते तर कागदी कंदील हवे असल्यास पतंग पेपर वापरण्यात येतो. हे कंदील बनवण्याकरता २ ते ३ तास लागत असून या कंदिलाची किंमत ८०० रुपये इतकि आहे.

त्रिपल मटका कंदिल

मटका कंदिल आणि त्रिपल मटका कंदील, असे दोन प्रकारचे कंदील बनवले जातात. हे कंदील बनवण्यासाठी देखील सामान्य कंदिल बनवण्यासाठीचे साहित्य लागते. हे कंदिल तयार करण्यासाठी बांबुच्या छोट्या – मोठ्या काठ्या, पतंग पेपर, गोल्डन चांदी, क्रेप पेपर, दोरा असे साहित्य लागते. मटका कंदील बनवण्याकरता प्रथम २ इंच पट्टीच्या पुठ्याचा सांगाडा बनवून त्याला खाचा पाडून त्यावर २ बाय २८ इंचाच्या पट्या (करंजी) बनवली जात असून त्या करंज्या पुठ्यावर चिटकवल्या जातात. त्यानंतर आपल्याला हवी ती डिझाईन यावर देऊन गोल्डन चांदी लावण्यात येते. हे त्रिपल मटका कंदील बनवण्याकरता तीन छोटे – छोटे मटके बनवून एकावर एक लावण्यात येतात. तसेच हे मटका कंदील वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवण्यात येत असून त्यावर सुंदर, असे नक्षी काम देखील करण्यात येते. हे कंदील बनवण्याकरता ३ तास लागत असून या मटका कंदिलाची किंमत ३५० ते ४०० रुपये इतकि असते.