पुरूषांमध्ये वाढतंय प्रोस्टेटच्या आजाराचं प्रमाण

जनजागृती नसल्याने या आजाराकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. तसंच हा प्रोस्टेट आजार वाढल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम होऊ लागला आहे.

Mumbai
Prostate disease in men is increasing
पुरूषांमध्ये वाढतंय प्रोस्टेटच्या आजाराचं प्रमाण

प्रोस्टेट ग्रंथींशी संबंधित आजार हा वयस्कर पुरुषांमध्ये आढळणारा महत्त्वपूर्ण आजार आहे. हल्ली या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पण, या आजाराकडे नसलेल्या जनजागृतीमुळे दुर्लक्ष केलं जातं. बहुतांश जण प्रोस्टेट होण्यासाठी सद्यस्थितीला, काही जण वयाला, हवामानातल्या बदलाला, प्रवासामुळे येणाऱ्या ताणाला, वेगवेगळ्या ठिकाणंच पाणी पिण्याला इ. गोष्टींना कारणीभूत ठरवतात. प्रोस्टेट मोठं झाल्यामुळे ‘लोअर युरिनरी ट्रॅक सिम्पटम्स’ दिसतात. त्यामुळे, व्यक्तीच्या आयुष्यावरही परिणाम होऊ शकतो. प्रोस्टेट ग्रंथींमध्ये झालेल्या वाढीला ‘ बेनियन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया’ (बीपीएच) असं म्हणतात.

अंदाजे पाचपैकी दर २ भारतीय पुरुषांमध्ये बीपीएचमुळे लोअर युरिनरी ट्रॅकची लक्षणं आढळतात. तरीही, बहुतांश जण डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेत नाहीत. जोपर्यंत हे दुखणं गंभीर रूप धारण करत नाही आणि त्यातील अडचणी वाढत नाही तोपर्यंत ते हे दुखणं अंगावर काढतात.

प्रोस्टेटच्या वाढीला वयाच्या तिशीच्या आधी सुरुवात होते. साधारणपणे ८ टक्के पुरुषांमध्ये वयाच्या चाळीशीपर्यंत मायक्रोस्कोपिक बीपीएचची लक्षणं दिसतात. ५० टक्के पुरुषांत ही लक्षणेसाठीपर्यंत दिसून येतात आणि नव्वदीपर्यंत ९० टक्के पुरुषांत ही लक्षणे दिसतात. पन्नास किंवा त्याहून अधिक वय असलेल्या पुरुषांमध्ये बीपीएचचे प्रमाण १४ ते ३० टक्क्यांदरम्यान असते. भारतात ४० ते ४९ वयोगटातील पुरुषांत २५ टक्के, ५० ते ५९ वयोगटात ३७ टक्के, ६० ते ६९ वयोगटात ३७ टक्के, तर ७० ते ७९ वयोगटात ५० टक्के इतकी बीपीएचची लक्षणं असतात.

प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीचे टप्पे –

वयासोबत प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीचे दोन महत्त्वपूर्ण टप्पे असतात. पहिल्यांदा तारुण्यात प्रोस्टेट ग्रंथींचा आकार दुप्पट होतो. प्रोस्टेट ग्रंथींच्या विकासाचा दुसरा टप्पा साधारणपणे २५ व्या वर्षी सुरू होतो आणि बहुतांश पुरुषांमध्ये त्यांच्या मृत्युपर्यंत ही वाढ होत असते.

काय आहेत बीपीएचची लक्षणं?

बीपीएच झालेले रुग्ण सामान्यपणे रात्री वारंवार लघवीला जायला लागते अशी तक्रार करतात. त्याचबरोबर लघवी होण्यात अडचण होते किंवा मूत्राशय अर्धवटच रिकामं होतं अशाही तक्रारी करतात. प्रोस्टेट ग्रंथी मोठ्या झाल्यामुळे ‘लोअर युरिनरी ट्रॅक सिम्पटम्स’ दिसून येतात. या लक्षणांशी जुळवून घेण्यासाठी रुग्ण पाणी आणि इतर द्रव पदार्थ घेणं टाळतो आणि त्याच्या लघवी करण्याबाबत चिंता करतो.

याविषयी अधिक माहिती देताना नायर हॉस्पिटलचे युरोलॉजी विभाग प्रमुख डॉ. हेमंत पाठक यांनी सांगितलं की, “ज्या व्यक्तींना बीपीएचचा त्रास होतो लघवीचा त्रास होईल म्हणून ते लोकं बाहेर जाणं टाळतात. पण, उपचार घेऊन हा त्रास कमी करता येऊ शकतो.”

वाढत्या वयामुळे हा आजार होतो अशी समजूत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकं दुर्लक्ष करतात. पण, रुग्णांमध्ये याबाबत जागृती करून यावर तोडगा काढला जाऊ शकतो. आयपीएसएस स्कोअर कार्ड, अल्ट्रा साउंड आणि पीएसए चाचण्यांचा एकत्रित विचार करून बीपीएचचे निदान केलं जातं असं केईएम हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागप्रमुख डॉ. सुजाता पटवर्धन यांनी सांगितलं.