ब्रेकिंग न्यूजमधला माणूस!

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

ब्रेकिंग न्यूज काय आहे असं चॅनेलप्रमुखांनी विचारण्याच्या आधीच एकामागोमाग एक धडाधड ब्रेकिंग न्यूज दाखल झाल्या…गेल्या काही दिवसांत वर्तमानपत्रांचा छापखाना धडधडावा तशा ह्या ब्रेकिंग न्यूज धडधडल्या.

…एरव्ही चॅनेलप्रमुखांनी ब्रेकिंग न्यूज काय आहे, असं विचारलं की त्यांच्या हाताखालचे चॅनेलचंपू हडबडायचे…खूप धडपड करून शोधून काढलेली, मिठाईवरच्या चांदीचा वर्ख महागला अशी बातमीही ब्रेकिंग न्यूज म्हणून लावायला लागायची…

…आतासुध्दा, शरद पवार माढामधून निवडणूक लढणार नाहीत ह्या ब्रेकिंग न्यूजला चॅनेलप्रमुखांनी संमती देण्याआधीच दुसरी ब्रेकिंग न्यूज दाखल झाली…पवारांची माघार हा भाजपचा पहिला विजय अशी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आली…

…पुढच्याच सेकंदाला, सुजय विखे-पाटील ह्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला, ही ब्रेकिंग न्यूज दाखल झाली…ताबडतोब बाळासाहेब विखे-पाटलांनी, सुजय विखे-पाटील पवारांच्या वक्तव्याने दुखावले अशी पितृवत्सल बे्रकिंग न्यूज दिली…

…लगेच पवारांच्या एका नातवाने, पवारांनी निवडणुकीतून माघार न घेता निवडणूक लढवावी असं म्हटल्याची बातमी आली…हीसुध्दा ब्रेेकिंग न्यूजच आहे असं चॅनेलप्रमुख म्हणाले…

…काही सेकंदातच, पवारांना वार्‍याची दिशा कळली म्हणून त्यांनी माघार घेतली असं कुणीतरी म्हटलं…आणि चॅनेलप्रमुख म्हणाले ही तर भलतीच बेफाम ब्रेकिंग न्यूज आहे…

…मग पवार सुसंस्कृत हल्ला चढवत म्हणाले, अडवाणी, वाजपेयी कधी ना कधी पराभूत झाले, पण मी कधीच पराभवाची चव चाखली नाही…चॅनेलप्रमुख म्हणाले, ही तर रॉकिंग ब्रेकिंग न्यूज आहे…

…मग पवार म्हणाले, भाजप जास्त जागा मिळवेल, पण मोदी पंतप्रधान होणार नाहीत…चॅनेलप्रमुख म्हणाले, ही तर शंभरनंबरी ब्रेकिंग न्यूज आहे…

…मग पवारांचे कार्यकर्ते म्हणाले, पवार निवडणूक लढवत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशेची भावना दाटून आली आहे…चॅनेलप्रमुख म्हणाले, ही तर अस्सल ब्रेकिंग न्यूज आहे…

…मग पवारांचे विरोधक म्हणाले, तिकिटवाटपावरून पवारांच्या घरातले मतभेद उघड झाले…चॅनेलप्रमुख म्हणाले, ही तर ब्रेकिंग न्यूजमधली ब्रेकिंग न्यूज आहे…

…आता चॅनेलप्रमुखांचे डोळे गरगरले, डोकं भिरभिरलं…ते कपाळावर गुद्दे मारत म्हणाले, सगळ्या ब्रेकिंग न्यूज एकाच माणसाभोवती का गोल गोल फिरताहेत?…

…चॅनेलप्रमुखांचे सहकारी चॅनेलचंपू म्हणाले, ब्रेेकिंग न्यूज त्यांच्याभोवती गोल गोल फिरत नाहीत…ते गोल गोल ब्रेकिंग न्यूज पुरवताहेत…

…चॅनेलप्रमुख म्हणाले, बरोबर आहे तुझं म्हणणं…निवडणूक हा लोकशाहीतला उत्सव आहे, उत्सवात भेटवस्तू देण्याची प्रथा आजही जुनी माणसं पाळताहेत…

-अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here