घरलोकसभा २०१९नाशिकच्या उमेदवारीवरून शिवसेनेत कुरघोडी

नाशिकच्या उमेदवारीवरून शिवसेनेत कुरघोडी

Subscribe

स्वबळाची डरकाळी फोडणार्‍या शिवसेनेने बाणेदारपणा गुंडाळून ठेवल्यानंतर आता उमेदवार निवडीवरून पक्षांतर्गत इच्छुकांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारीची पुन्हा संधी देण्यास अनुकूल वातावरण निर्माण होण्यापूर्वी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी मातोश्रीवर धाव घेऊन खासदारांचे पक्ष वाढीसाठी योगदान नसल्याचा खडा टाकला.

उमेदवार आयात करायचा आणि निष्ठावंत सैनिकांनी फक्त ढाल बनत लढत राहायचे, हे बस झाले आता! असा कणखर बाणा चालवत करंजकर यांनी पक्षश्रेष्ठींसमोर उमेदवारीचे बस्तान मांडले. करंजकर यांच्यामुळे पक्षांतर्गत उठलेला धुराळा खाली बसण्याच्या आत नाशिक बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी परस्पर आपली दावेदारी जाहीर केली. लोकसभेसाठी पक्षाने आपल्याला शब्द दिल्याचे त्यांनी सांगितले खरे, पण नेमका कोणी शब्द दिला, हे उघड केले नाही. पत्रकार परिषद घेऊन आपली उमेदवारी जाहीर करणे हे किती सयुक्तिक ठरते, याची जाणीव पक्षश्रेष्ठींना झाली असेल. पक्षानेच हा आदेश दिला होता, तर पक्ष कार्यालयात त्यांनी ही परिषद का घेतली नाही; किंबहुना पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी याविषयी बोलणे अभिप्रेत होते. मात्र, शिवसेनेच्या नावाने परस्पर उमेदवारी घोषित करून त्यांनी पक्षांतर्गत शिस्तीला गालबोट लावले आहे. शिवसेनेत येण्यापूर्वी भुजबळांशी सख्य राखणारे चुंबळे यांनी भुजबळ अडचणीत येताच त्यांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला.

- Advertisement -

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत स्वकीयांवर हल्ला करुन यश पदरात पाडून घेत त्यांनी आप्तेष्ठांपेक्षा यश-अपयशाला जास्त महत्व दिले. भुजबळ तुरुंगातून बाहेर पडताच शिवसेनेला ’जय महाराष्ट्र’करण्याची तयारी मध्यंतरी त्यांनी दर्शवली होती. मात्र, त्याला मूर्तस्वरुप येण्याआधीच पक्षश्रेष्ठींच्या नावे तिकिट फाडून त्यांनी उमेदवारीच्या नावाने भंडारा उधळला आहे. पक्षादेश शिरसावद्य मानणार्‍या सैनिकांमध्ये आता अंतर्गत लाथाड्यांचे राजकारण सुरू झाले. यामागे नेमके कोणाचे ‘बळ’आहे, याचा शोध पक्षश्रेष्ठींना घ्यावा लागेल. त्यावर वेळीच डॅमेज कंट्रोल केले नाही, तर युतीसोबत लढूनही पक्षाला पराभवाचा सामना करणे अपरिहार्य ठरेल. निवडणुकीपूर्वी स्वबळाची भाषा करायची आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीवरून शोभा करुन घेणे, ’हे वागणं बरं नव्हे’ असेच म्हणण्याची वेळ पक्षावर आली आहे. युतीच्या माध्यमातून ’नांदा सौख्य भरे’ अशी टीका विरोधक करत असताना त्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी पक्षातील बंडाळी रोखण्याचे खरे आव्हान शिवसेनेसमोर उभे ठाकले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -