घरलोकसभा २०१९जागा ‘संरक्षित’ करण्याचे भामरेंसमोर आव्हान

जागा ‘संरक्षित’ करण्याचे भामरेंसमोर आव्हान

Subscribe

शिव‘सैनिकां’च्या नाराजीने चुरस वाढणार

धुळे मतदार संघात युतीकडून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आघाडीकडून आमदार कुणाल पाटील निवडणूक रिंगणात आहेत. विजयासाठी युती व आघाडीने रणनिती आखली आहे. निवडणूक प्रचार शिगेला पोहोचल्याने मतदार संघात चुरस निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डॉ. भामरे हे विश्वासू खासदार असून भाजपचे हायप्रोफाइल नेते असल्याने त्याचा फायदा निवडणुकीत होणार आहे. डॉ. भामरेंना हरवण्यासाठी भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. धुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा केवळ एकच नगरसेवक विजयी झाल्याने डॉ. भामरेंना हरवण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारापासून दूर राहात आहेत.

डॉ. सुभाष भामरे आणि आमदार कुणाल पाटील यांचे मतदारसंघात प्रचार दौरे व सभा सुरू झाल्या आहेत. दोघे एकमेकांपेक्षा कसे सरस आहेत, हे मतदारांना पटवून सांगत आहेत. युतीचे उमेदवार डॉ. भामरे असले तरी अद्याप शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले नाहीत. धुळे महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली असली प्रत्यक्षात शिवसेनेच्या १४ जागा कमी झाल्या असून एकच नगरसेवक निवडून आल्याने भाजपचा बाण शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आसुसलेली शिवसेना युती धर्म पाळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवजयंतीनिमित्त आमदार कुणाल पाटील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यास आले होते, त्यावेळी शिवसेना पदाधिकार्‍यांना त्यांना पुष्पगुच्छ देऊन उमेदवारी शुभेच्छा दिल्या. या घटनेची मतदारसंघात आजही जोरदार चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

आघाडीचा उमेदवार विजयी करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हेवेदावे विसरून एकत्र आले आहेत. मात्र, महायुतीचे उमेदवार डॉ. भामरेंच्या विजयासाठी आज भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आल्याचे दिसत नाहीत. आमदार अनिल गोटे यांनी भाजपचा राजीनामा दिला असून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आमदार गोटेंना मानणारे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांमध्ये विभागणी झाली आहे. तसेच डॉ. भामरेंविरोधात आमदार गोटेंनी प्रचार सुरू केल्याने त्याचा मतदानावर परिणाम होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १६ फेब्रुवारीला सभा आयोजित करण्यात आली. पंतप्रधानाच्या स्वागतासाठी धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी हजेरी लावली. मात्र, त्यांना भाजपच्या पदाधिकार्‍यांनी डावलले. अखेर नाराज दादा भुसे यांनी सभेस उपस्थित न राहणे पसंत केले. त्यामुळे दादा भुसे डॉ. भामरेंच्या प्रचार उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले दिसत नाहीत.

राहुल शेवाळे काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष आहेत.तेही धुळे मतदार संघातून इच्छुक होते. पक्षाने त्यांना डावलल्याने ते काहीही नाराज झाल्याची चर्चा आहे. यामुळे मालेगावबाह्य मतदार संघात त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील तीन व नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. २००४, २००९ व २०१४ मध्ये सलग तीनवेळा भाजपला कौल मिळाला आहे. सद्य:स्थितीत धुळे शहर व शिंदखेदा विधानसभा मतदारसंघात भाजप, धुळे ग्रामीण व मालेगांव मध्य मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा आहे. मालेगांव बाह्यमध्ये शिवसेना व बागलाण विधानसभा मतदाससंघात राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. सर्वाधिक मुस्लीमबहुल मालेगांव व धुळे शहरात आहेत. भाजप सरकारबद्दल मुस्लीम समाजात नाराजी असल्यामुळे हा समाज दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -