घरमहाराष्ट्र२२०० विद्युत सहाय्यक दीड वर्षे मानधनाविना

२२०० विद्युत सहाय्यक दीड वर्षे मानधनाविना

Subscribe

महावितरणच्या यंत्रणेत राज्यभरात कार्यरत असणार्‍या विद्युत सहाय्यकांची थकलेले मानधन दीड वर्षे उलटल्यानंतरही मिळालेले नाही. तब्बल २२०० विद्युत सहाय्यकांचा थकीत मानधनाचा प्रश्न हा ऊर्जामंत्री, मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांनी आश्वासन देऊनही गेल्या दीड वर्षात सुटलेला नाही.

त्यामुळे आता ऊर्जा विभागात झालेली खांदेपालट पाहता हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा विद्युत सहाय्यकांमार्फत केली जात आहे. महावितरणने २१८६ विद्युत सहाय्यकांची नियुक्ती करताना केलेल्या उशिरामुळे या विद्युत सहाय्यकांचे मानधन थकीत आहे. या विद्युत सहाय्यकांच्या थकबाकीपोटीचे जवळपास ४८ कोटी रूपये महावितरणकडून देणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

पण विद्युत सहाय्यकांनी आणि कर्मचार्‍यांनी वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटलेला नाही. याआधीचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनीही विद्युत सहाय्यकांना ही थकबाकी देणार असल्याचे कबूल केले होते. पण १८ महिन्यांपासून ही थकबाकी देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्युत सहाय्यकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

महावितरणच्या विद्युत सहाय्यकांना अनेक महिने या मानधनाची वाट पहावी लागली आहे. मुळातच या विद्युत सहाय्यक पदासाठीचे मानधन कमी आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांना थकबाकी तातडीने मिळायला हवी, अशी मागणी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष अण्णा देसाई यांनी केली आहे. महावितरणच्या यंत्रणेत विजेच्या संबंधित देखभाल दुरूस्तीच्या तक्रारींपासून ते वीज बिलाची थकबाकी वसुली अशा अनेक कामांमध्ये विद्युत सहाय्यक मदत करतात. त्यामुळे यंत्रणेतील अशा महत्वाच्या कर्मचार्‍याच्या मानधनाचा प्रश्न महावितरण प्रशासनाने सोडवावा अशी मागणी त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -