महापुरात ४० बळी, दोन बेपत्ता

154 कोटींची तातडीची आपत्कालीन मदत जाहीर

Mumbai
महापुर

मागील एक आठवड्यापासून कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून यात सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. या सर्व जिल्ह्यांमधील पुरामुळे आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापुरातील महापुरात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून एकजण बेपत्ता आहे. सांगलीत 19 जणांना प्राणास मुकावे लागले असून सांगलीतही एकजण बेपत्ता आहे. तर ब्रह्मनाळमध्ये आज 5 मृतदेह सापडल्याचे दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

कोल्हापुरात 2 लाख 45 हजार 229 जणांचे स्थलांतर करण्यात आले असून सांगलीत 4 लाख 41 हजार 845 जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सांगलीत पाणी ओसरायला सुरुवात झाली असून सांगलीतील पाण्याची पातळी 56 फुटावरून 53 फुटावर आल्याचेही त्यांनी सांगितले.

देशभरात पुराचे थैमान
महाराष्ट्रास गुजरात, कर्नाटक आणि केरळ या राज्यांनाही पुराचा फटका बसला आहे. आजपर्यंत गुजरातमध्ये २२, कर्नाटकमध्ये ३५ तर केरळमध्ये ५७ जणांचा बळी या पुरात गेला आहे. या पाश्वर्र्भूमीवर हवामान विभागाने दक्षिणेतील राज्यांमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे लष्कराच्या बचाव पथकांना देखील मदतकार्य वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सांगलीत पाणी पातळी घसरतेय
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आणि धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने आता सांगलीत महापूर ओसरू लागला आहे. एका तासामध्ये एक इंच इतकी पाणी पातळी कमी होत आहे. सांगलीत सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी ५४ फूट ६ इंच इतकी आहे.

सांगलीतील अनेक उपनगरांमध्ये अजूनही पाणी आहे, तर विस्तारित भागातील पाणी ओसरले आहे. तर सांगलीतल्या मराठा समाज भवन, स्टँड रोड, जय मातृभूमी चौक, सिव्हिल ते एस टी स्टँड रोडे इथे तीन फूट पाणी होते. पूर ओसरायला सुरुवात झाली असली तरी रोगराई थोपवण्याचे खरे आव्हान असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पुणे-बेंगळूर महामार्ग बंदच
मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे गेल्या सहा दिवसांपासून पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ठप्प आहे. पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतूक सुरू करण्यासाठी रविवारी सकाळी चाचणी घेण्यात आली. त्यासाठी पाण्याचा टँकर पोकलेनसह पाठवला. महामार्गावरील साचलेल्या पाण्यातून हा टँकर गेला. मात्र पाण्याला वेग असल्याने महामार्गावरून वाहतूक सुरू करणे सुरक्षेचे नसल्याचे जाणवल्याने महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. उद्या सोमवारी पुराचे पाणी ओसरल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरू होईल, अशी शक्यता जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केली.

कोल्हापुरात हळूहळू पूर ओसरतोय
कोल्हापुरातील रस्त्यावरून वाहणारे पाणी संथ गतीने कमी होत आहे. शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत पाण्याची पातळी अर्धा ते पाऊण फूटाने कमी झाली, अद्यापही तीन ते साडे तीन फूट पाणी महामार्गावर आहे. पाण्याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच कोल्हापूरला बोटीतूनच सर्व अत्यावश्यक सेवा पुरवण्यात येणार असल्याचेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.