घरमहाराष्ट्रशिवसेना-भाजपात रस्सीखेच, तर काँग्रसला उमेदवारच सापडेना

शिवसेना-भाजपात रस्सीखेच, तर काँग्रसला उमेदवारच सापडेना

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष कामाला लागले असून, आता कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार द्यायचा याची जोरदार चाचपणी सुरू आहे. मात्र उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये शिवसेना-भाजपाची ताकद पाहता या मतदारसंघातील 6 जागांवर कोणते उमेदवार द्यायचे असा प्रश्न सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पडला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर-पश्चिम मतदारसंघात युतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघात शिवसेना-भाजपा युतीचे पारडे जड मानले जात आहे. या मतदार संघामध्ये शिवसेनेचे 3, तर भाजपाचे 3 आमदार असून शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर हे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून आले होते.

युती न झाल्यास भाजपा-शिवसेनेमध्ये कडवी झुंज –

- Advertisement -

सध्या शिवसेना-भाजपा युती होणार असे जरी दोन्ही पक्षाकडून सांगितले जात असले तरी या मतदारसंघामध्ये शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षाचे नेते स्वतंत्रपणे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. जर येत्या काळात शिवसेना भाजपा युती तुटली आणि हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले तर मात्र या मतदारसंघामध्ये अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. आणि जर युती झाली तर युतीच्या उमेदवाराचा विजय सोपा मानला जात आहे. या मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून भाजपच्या उज्वला मोडक, गोरेगावमधून शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई, अंधेरीमधून मुरजी पटेल हे निवडणूक लढण्यास इच्छुक असून, जर युती झाली नाही तर उज्वला मोडक या रवींद्र वायकर यांच्यासमोर तर मुरजी पटेल हे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या समोर उभे राहण्याची शक्यता आहे. या मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षांपासून भाजपा-शिवसेनेच्या काही इच्छुकांनी तयारी केली असून, जर युती झाली तर या इच्छुकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या इच्छुक उमेदवांनी युती होऊ नये अशी भावना ’आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केली.

काँग्रेस-राष्ट्रवादी संभ्रमात
एकीकडे या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना-भाजपामध्ये रस्सी खेच सुरू असताना या मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र संभ्रमात आहेत. माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनानंतर या मतदारसंघात काँग्रेसची पुरती वाताहात झाली असून, माजी मंत्री सुरेश शेट्टी हे देखील सध्या राजकारणात सक्रिय नाहीत. तसेच या मतदारसंघातमध्ये लोकसभा निवडणुकीत संजय निरूपम यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी देखील या मतदारसंघाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातील विधानसभेच्या सहा जागांवर कोणता उमेदवार द्यावा असा प्रश्न आता काँग्रेसच्या नेत्यांना पडला आहे.

- Advertisement -

2014 च्या पूर्वी या मतदारसंघातील सहा मतदारसंघापैकी वर्सोवा, अंधेरी पश्चिम, दिंडोशी आणि अंधेरी पूर्व या चार मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकी मध्ये काँग्रेसचा सुफडा साफ झाला आणि शिवसेना-भाजपाचे सहा आमदार या मतदारसंघामध्ये निवडून आले. तेव्हापासून आजपर्यंत या मतदारसंघात काँग्रसचे नेते फिरलेच नाही, अशी भावना इथल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

मुस्लिम-दलित मते कुणाला?

या मतदारसंघातमध्ये मुस्लिम आणि दलित अशी एकूण 15 टक्के मते असून, जर वंचितने आपले उमेदवार या मतदारसंघात दिले तर या मतांची देखील विभागणी होऊन याचा फायदा शिवसेना-भाजपाच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर या मतदारसंघामध्ये काही मनसेची देखील मते असून, जर मनसेने उमेदवार दिला नाही तर त्याचा थेट फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे.

उत्तर-पश्चिम मतदरासंघातील विद्यमान आमदार –

जोगेश्वरी (पूर्व) – रविंद्र वायकर ( शिवसेना)
गोरेगाव – विद्या ठाकूर (भाजपा)
दिंडोशी – सुनिल प्रभू (शिवसेना)
अंधेरी पूर्व – रमेश लटके ( शिवसेना)
अंधेरी पश्चिम – अमित साटम ( भाजपा)
वर्सोवा – भारती लव्हेकर (भाजपा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -