घरविधानसभा २०१९आमची खुर्ची आम्हाला द्या...

आमची खुर्ची आम्हाला द्या…

Subscribe

saसेनाधिपती- नाही नाही नाही…१३५ पेक्षा खाली आम्ही येणारच नाही, देशात आपण ज्येष्ठ भ्राता असलात तरी महाराष्ट्रात आम्हीच ज्येष्ठ बंधूंच्या भूमिकेत आहोत, हे आपण विसरता कामा नये..देवाधिदेव इंद्र
देव इंद्र- पण, आमच्या केंद्रातल्या तख्तानेच तर आपणास कनिष्ठ भ्राता म्हणून जाहीर केले होते. त्यामुळे आपण आज तरी अनुज भ्राताच आहात, आणि अनुजाने ज्येष्ठांचे ऐकले पाहिजे अशी संस्कारांची शिकवण आहे. आमचे वजन लक्षात घेता विधानसभेच्या सोहळ्यात आपण या ज्येष्ठ बंधुंच्या पाहुण्यांसाठी १५५ खुर्च्या सोडायला हव्यात.
सेनाधिपती- असू देत, असू देत, देव इंद्रा, आपण जरी देवलोकांचे राजे इंद्र जरी असलात तरी दिल्लीच्या तख्तावर विराजमान नमोंचे सल्लागार शहं‘शहां’नी लोकसभेत समसमान खुर्ची वाटपाचे सूत्र ठेवले होते. हे आपण विसरलात काय?
देव इंद्र- नाही, नाही आम्ही काहीच विसरलेलो नाही, मात्र नमो नमोचा उद्धघोष करणार्‍या आमच्या इतर सरदार आणि संस्थांनिकांचाही विचार व्हावा, ज्येष्ठ बंधू म्हणून इतकीच आमची अपेक्षा आहे.
सेनाधिपती- इंद्रदेव, हे असं सारखं-सारखं, आम्ही मोठे-आम्ही मोठे सांगण्याची गरज नाही, आपल्या दरबाराबाहेर संस्थानिक, सरदारांची रांग लागली असेलही, पण म्हणून आमच्या दिवाणखान्याबाहेरही काही इच्छुकांची कमी गर्दी नाही. आपण त्यांना आपल्या दरबारातील ‘शाही’ स्थान देण्यासाठी इच्छूक आहात, पण ते सर्वच आपले मांडलिकत्व पत्करणारे असून त्यांच्यासाठी यथायोग्य खुर्च्यांची तजवीज आपण स्वतः करावी, आमच्या दिवाणखान्यातील खुर्च्यां पळवू नये, हे राजकारण आहे, संगीत खुर्ची नाही, आणि ज्या पाहुण्यांना आपण निमंत्रणे धाडून आपल्याकडे बोलावून घेत आहात, त्यांच्या सोयीची जबाबदारी आपणच घ्यावी, आपल्या पाहुण्यांच्या यजमानपदाचा सोस आम्हाला का?
इंद्रदेव- नाही..नाही…नाही, आपला काहीसा गैरसमज होतोय..
सेनाधिपती- बिल्कूल नाही…देव इंद्रा, आमच्याकडेही बाहेरून आलेल्या पाहुण्यांची गर्दी होत असताना आम्ही त्यांची पाहुणचाराची जबाबदारी तुमच्या खांद्यावर टाकली नाही ना? मग तुमच्या पाहुण्यांसाठी आमच्या दिवाणखान्यातल्या खुर्च्या आम्ही का म्हणून उपलब्ध करून द्याव्यात. तसंचही आमच्याकडे आधीच खुर्च्या कमी आहेत आणि आतातरी आपल्याला बसायला मिळेल या आशेवर कित्येक महिन्यांपासून ताटकळत उभे राहिलेल्यांची आमच्याकडेही गर्दी आहे.
इंद्रदेव- नाही नाही आपण नाराज होऊ नका.
सेनाधिपती- मग, असं करा दोन्हीकडच्या मंडपात कुणाच्या किती खुर्च्या कशा कुठं लावायच्या हे तुम्हीच ठरवा आणि ते ठरवून झाल्यावर आम्हाला बोलवा…
इंद्रदेव- राज्यात आपण दोघेही मोठे आहोत, त्यामुळे त्याग आणि समर्पणाची जबाबदारी आपल्यावरच आहे. तेव्हा आपल्या इतर कनिष्ठ बंधुंसाठी पहिल्या रांगेतल्या १८ खुर्च्या सोडाव्यात अशी आमची अपेक्षा आहे.
सेनाधिपती- निश्चितच सोडाव्यात पण त्या आमच्या रांगेतल्या नाहीत, तर तुमच्या रांगेतल्या सोडल्यात तर बरं होईल.
इंद्रदेव- म्हणूनच आमच्या मंडपातल्या खुर्च्या वाढवता आल्या तर बघा.
सेनाधिपती- म्हणजे, आम्ही १४४ खुर्च्यांचा आग्रह कधीचाच सोडला आहे. आता तुम्ही ११५ खुर्च्याच आमच्या मंडपात देत असाल तर घरच्या मंडळींना आम्हाला खालीच बसवावं लागेल.
इंद्रदेव- मग आपण त्यांना महामंडळांच्या सतरंज्या टाकून देऊच की.
सेनाधिपती- असं, नाही असं खचितच होणार नाही…सोहळ्यात आपणहून सतरंजीवर बसणारे आणि त्यानंतर सतरंजी, मंडप, पाहुण्यांचा पाहुणचार करणारे पाहुणे आता मंडपात राहिलेले नाहीत, त्यांनाही आता पहिल्यांदा खुर्चीच हवी, काहींना तर सिंहासनांची स्वप्ने पडत आहेत. तेव्हा आता पाहुण्यांच्या वाढलेल्या अपेक्षा आपणच ध्यानात घ्याव्यात..आपण जेष्ठ भ्राता आहात त्यामुळे ही जबाबदारी आपलीच आहे.
इंद्रदेव- ठिक आहे, या विषयावर आपण सविस्तर नंतर बोलू तूर्तास आम्हाला रजा द्यावी, आमच्या दरबारात आणखी एका ‘महाराजां’ साठी सिंहासनाच्या उंचीसारख्या असलेल्या आणखी एका आसनाची व्यवस्था करायची आहे…तेव्हा येते आम्ही….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -