घरताज्या घडामोडीमाजी आमदार बाळासाहेब सानपांची ‘घर वापसी’ निश्चित; लवकरच भाजपमध्ये प्रवेश

माजी आमदार बाळासाहेब सानपांची ‘घर वापसी’ निश्चित; लवकरच भाजपमध्ये प्रवेश

Subscribe

शिवसेनेचे शिवबंधन सोडण्याची तयारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट.. महामंडळाची ऑफरही नाकारली; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेमापोटी धरली भाजपची वाट

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली म्हणून भाजपला ‘जय श्रीराम’ करीत शिवसेनेचे शिवबंधन बांधणारे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा भाजप प्रवेश आता निश्चित झाला आहे. त्यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली. महत्वाचे म्हणजे सानप यांना रोखण्यासाठी एखाद्या महामंडळावर वर्णी लावण्याचीही ऑफर शिवसेनेने त्यांना दिली. मात्र ही ‘ऑफर’ सानप यांनी नाकारल्याचे सूत्रांकडून समजते.

Balasaheb Sanap
विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपने युती करुन लढवली; मात्र राष्ट्रवादीतून उमेदवारी करणारे बाळासाहेब सानप यांची शिवसेनेचे खासदार तथा संपर्क नेते संजय राऊत यांनी अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

नाशिकमधील पूर्व मतदार संघात गेले पाच वर्ष आमदार म्हणून काम केलेले आणि भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांना ऐन विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने उमेदवारी नाकारली. त्यांच्या जागेवर मनसेतून भाजपमध्ये प्रवेशित झालेले अ‍ॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी देण्यात आली. सानप यांना उमेदवारी नाकारण्यात तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांचा मोठा हात होता. निवडणुकीपूर्वी महाजन यांची सानपांविषयी नाराजी वाढल्याने त्यांना उमेदवारीपासून वंचीत ठेवण्यात आले. यावेळी सानप यांनी महाजनांवरही अनेक आरोप करीत प्रारंभी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

- Advertisement -

Balasaheb Sanap

मात्र या निवडणुकीत अ‍ॅड. ढिकले यांनी त्यांना पराभूत केल्यानंतर निवडणुकीच्या काहीच कालावधीनंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. त्यानंतर महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा संकल्पही त्यांनी सोडला. त्यासाठी जीवापाड मेहनत घेतली. महापालिकेत शिवसेनेची सत्ता येण्याइतके संख्याबळ नसतानाही सानप यांनी पालिकेतील राजकारणात खळबळ उडवून दिली होती. भाजपचे सुमारे ११ नगरसेवक कवेत घेत त्यांना शिवसेनेच्या बाजूने कौल देण्याच्या मानसिकतेत आणले. पण महाजन यांनी आपला अनुभव पणाला लावत काँग्रेस आणि मनसेच्या नगरसेवकांचे समर्थन मिळवले. त्यामुळे आता शिवसेनेच्या बाजूने कौल देऊनही उपयोग नाही, असे चित्र दिसू लागल्याने संबंधित नगरसेवकांनी भाजपमध्येच राहण्यास पसंती दर्शविली. सव्वा वर्षानंतर नाशिक महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सानप यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. नाशिक शहरातील राजकारणात त्यांचा चांगला दबदबा असल्याने ते ‘चमत्कार’ घडवू शकतात यावर भाजपच्या पदाधिकार्‍यांचा विश्वास आहे. त्यामुळे अंतर्गत मतभेद विसरुन सानप यांनी स्वगृही परतण्यासाठी महाजनांनीच ‘रेड कार्पेट’ अंथरले. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरु झालेत. परंतु मध्यंतरीच्या काळात बबीचआर सोसायटीतील घोटाळ्यात महाजन यांचे कट्टर समर्थक सुनील झवर यांचे नाव आल्याने सानप यांच्या भाजप प्रवेशाला बाधा निर्माण झाली. त्यामुळे काही काळ भाजप प्रवेश लांबणीवर पडला. परंतु काही दिवसांपूर्वी शिवसेना प्रमुखांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावरुन सानप यांच्याशी संपर्क साधत त्यांना निमंत्रण देण्यात आले. त्यानुसार सानप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना एखाद्या महामंडळाचा अध्यक्ष करण्याची ‘ऑफर’ही देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. परंतु ही ऑफर नाकारत सानप यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय ठाकरे यांना सांगितला. भाजप पदाधिकार्‍यांच्या नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही पदाधिकार्‍यांच्या आग्रहाखातर आपण स्वगृही परतणार असल्याचे सानप यांनी सांगितल्याचे कळते. येत्या काही दिवसात सानप यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

- Advertisement -

 

माजी आमदार बाळासाहेब सानपांची ‘घर वापसी’ निश्चित; लवकरच भाजपमध्ये प्रवेश
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -