Breaking: १ कोटींच्या खंडणीसाठी गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

भाजप नेते गिरीश महाजन

भाजपचे नेते आणि राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना एक कोटीच्या खंडणीसाठी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे महाजन यांच्या जी.एम. फाऊंडेशनच्या पुढाकाराने ग्लोबल हॉस्पिटलचे उदघाटन काल (दि. १३) रोजी पार पडले. या उदघाटनाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. या सोहळ्यादरम्यान महाजन यांचे पीए दीपक तायडे यांना मोबाईलवर ही धमकी मिळाली. एक कोटी रुपये दिले नाहीत, तर हॉस्पिटल बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी पलीकडल्या माणसाने दिली. तसेच फोन ठेवल्यानंतर एसएमएसच्या माध्यमातून देखील हीच धमकी पुन्हा देण्यात आली. उदघाटन सोहळा संपल्यानंतर रात्री उशीरा या प्रकणात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दीपक तायडे यांनी पोलिसांना माहिती देताना सांगितले की, दुपारी १ वाजण्याच्या सुमारास धमकीचा फोन आला. पलीकडून बोलणारी व्यक्ती हिंदीत बोलत होती. “गिरीश महाजन को बोल दो, एक करोड दे, नही तो हॉस्पिटल बम्ब से उडा देंगे” एवढे बोलून फोन कट करण्यात आला. त्यानंतर याच मोबाईल नंबरवरुन एक मेसेज आला. ज्यामध्ये ५ वाजेपर्यंत १ कोटी नाही दिले तर हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणू अशा आशयाची पुन्हा धमकी देण्यात आली होती. तायडे यांनी पोलिसांना धमकीबद्दल माहिती देताच पोलिसांनीही कार्यक्रमस्थळावर कडेकोट बंदोबस्त ठेवला.

हे वाचा – भाजपा आमदार आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी; मुंब्र्यातून दोघांना अटक

काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांना देखील धमकीचे फोन येत होते. या धमकीच्या आरोपाखाली मुंब्र्याहून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर त्याआधी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना धमकीचे फोन येत होते. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना धमकीचे फोन आले होते.